Monday 26 February 2024

जालन्यात 1 ते 5 मार्च दरम्यान भव्य कृषी प्रदर्शन कलश सिड्स मैदान, मंठा चौफुली येथे कृषी प्रदर्शनाचे आयोजन सर्व शेतकऱ्यांनी कृषी प्रदर्शनाला अवश्य भेट द्यावी ---जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

 


 

     जालना, दि. 26 (जिमाका) -कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा यांच्या विद्यमाने जालना शहरात दि.1 ते 5 मार्च 2024 या पाच दिवसाच्या कालावधीत  कृषी महोत्सवाचे आयोजन कलश  सिड्स मैदान, मंठा चौफुली येथे करण्यात आले आहे. या प्रदर्शनास जिल्ह्यातील जास्तीतजास्त शेतकरी बंधू -भगिनींनी अवश्य भेट द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.

 

कृषी विषयक विकसित तंत्रज्ञान व शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे, शेतकरी, शास्त्रज्ञ आणि संशोधन विस्तार, शेतकरी विपणन साखळी सक्षमीकरण, समूह, गट संघटित करून स्थापित शेतकरी उत्पादक कंपन्यांची क्षमता बांधणी करणे, शेतकऱ्यांच्या उत्पादनास योग्य भाव मिळावा, ग्राहकांना उच्च दर्जाचा माल मिळावा याकरिता शेतकरी ते ग्राहक थेट विक्री श्रृंखला विकसित करणे, कृषी विषयक परिसंवाद, व्याख्याने यांच्या माध्यमातून विचारांच्या देवाणघेवाणींद्वारे शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करणे, विक्रेता-खरेदीदार संमेलनाच्या माध्यमातून बाजाराभिमुख कृषी उत्पादनास व विपणनास चालना देणे या योजनेचे प्रमुख उद्देश आहेत.

    कृषी महोत्सवातील कृषी प्रदर्शन हा महत्त्वाचा घटक असून यामध्ये शासकीय दालन, विविध कंपन्यांचे स्टॉल्स, खाद्य पदार्थांचे स्टॉल्स, प्रात्यक्षिके यांचा समावेश आहे.

  या सोबत जालना जिल्हयातील पिक परिस्थितीवर आधारित  बांबू लागवड, रेशीम लागवड , मोसंबी लागवड व सीताफळ, तूर सोयाबीन लागवड या सारख्या  विविध पिकावर मार्ग दर्शन करण्यासाठीं  चर्चा सत्र व कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे .

लोककला , शालेय विद्यार्थ्याचं कला दर्शन देखील होणार आहे.

महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम यांचे आयोजन केले आहे याच काळात तृण धान्य आधारित पाक कला स्पर्धा व खरेदीदार विक्रेता संमेलन आयोजित करण्यात येणाऱ आहे. 1.5 टन वजनाचा रेडा हे  हया प्रदर्शनाचे विशेष आकर्षण असणार आहे.

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment