Friday 9 February 2024

सांस्कृतिक कार्य विभाग व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने जालना शहरात 13 फेब्रुवारीपासून भव्य महासंस्कृती महोत्सव जालनेकरांनी महासंस्कृती महोत्सवाचा अवश्य लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ सांस्कृतिक कार्यक्रमांसह मनोरंजक कार्यक्रमांची मेजवानी स्थानिक कलावंतही सादर करणार कार्यक्रम प्रसिध्द कलावंतांचा राहणार सहभाग

 





 

जालना, दि. 9 (जिमाका) :- जालना शहरात  भव्य महासंस्कृती महोत्सव कार्यक्रमातंर्गत दि. 13 ते 17 फेब्रुवारी 2024 या कालावधीत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये स्थानिक कलाकारांची सांस्कृतिक मेजवानी, कवीसंमेलन, संस्कृती महाराष्ट्राची, एकांकिका, महाराष्ट्राची लोकगाणी आदींसह कला व मनोरंजनाच्या भरगच्च कार्यक्रमांचा समावेश असणार आहे. जालना शहरातील जेईएस महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित या महोत्सवाचा जिल्हयातील सर्व रसिकांनी आवर्जून लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.

सांस्कृतिक कार्य विभाग व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महासंस्कृती महोत्सवाबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद पार पडली. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. बैठकीस अपर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार उपस्थित होत्या. जिल्हाधिकारी यांनी पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवातील कार्यक्रमांबाबत सविस्तर माहिती यावेळी दिली.

महोत्सवातील कार्यक्रमांची रुपरेषा पुढील प्रमाणे आहे. मंगळवार, दि.13 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 6.00 वा.  केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते महासंस्कृती महोत्सवाचे उदघाटन होईल. यावेळी राज्याचे गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्यासह लोकप्रतिनिधी  उपस्थित राहतील. यावेळी प्रसिध्द सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांचा कलाअविष्कार कार्यक्रम होईल. त्यानंतर "गर्जा महाराष्ट्र माझा" हा कार्यक्रम होणार आहे. या  कार्यक्रमात गण, गवळण, वासुदेव, शेतकरी नृत्य, डोंबारी नृत्य, कोळी नृत्य, वाघ्या- मुरळी, गोंधळ, लावणी, जोगवा, धनगर गीत, दिंडी, ठाकर, महाराष्ट्र गीत प्रसिध्द कलावंत  सादर करतील. रात्री 9.30 वा.  संत साहित्यावर आधारी मोगरा फुलला हा कार्यक्रम सन्मिता शिंदे व संच सादर करणार आहेत.  

बुधवार दि. 14 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता जालना काव्यरंग कार्यक्रमा अंतर्गत स्थानिक कवींची काव्य रसिकांसाठी  मेजवानी राहणार आहे.  त्यानंतर  जालना नाटयरंग अंतर्गत "मेजवानी  एकांकिका"सादरीकरण होणार असून यात सादरकर्ते  सतीश लिंगडे  आणि संच (रा. जालना) हे राहतील. सायंकाळी  06:30  वा. गणेश रंगमंच- मुंबई प्रस्तुत  महाराष्ट्राचा लोकमेळा कार्यक्रमातंर्गत जालन्याचे भूमीपूत्र डॉ. गणेश चंदनशिवे आणि सहकारी हे कार्यक्रम सादर करणार आहेत.

गुरूवार दि. 15 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी  5:00  ते 6:30 या वेळेत आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे प्रख्‍यात सिनेनाट्य अभिनेता राजकुमार तांगडे व संभाजी तांगडे हे उपस्थित राहतील. यावेळी सेम टु सेम बट डिफ्रंट - एक सांगितीक प्रवास हा कार्यक्रम कैलास वाघमारे, जान्हवी श्रीमानकर सादर करणार आहेत. तर सायं. 6:30  वा. रामानंद कल्याण प्रस्तुत महाराष्ट्राची लोकगाणी हा कार्यक्रम शाहीर रामानंद उगलेशाहीर कल्याण उगले हे सादर करतील.

 

शुक्रवार दि.  16 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 5  ते 6:30 या वेळेत जालना लोकरंग या कार्यक्रमातंर्गत स्थानिक कलाकार सांस्कृतिक  कार्यक्रम सादर करणार आहेत. सायंकाळी  6:30  वा. हास्य रंगांची उधळण: एक सांस्कृतिक ठेवा या कार्यक्रमातंर्गत चला हवा येऊ द्याची टीम  कार्यक्रम सादर करणार आहेत.  निवेदक म्हणून प्रसिध्द अभिनेते सिध्दार्थ झाडबुके हे काम पाहतील.

शनिवार   दि. 17 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी  5  ते 6:30 या वेळेत  जालना लोकरंग कार्यक्रमात प्रसिध्द भारुडकार  व विविध शाहीर कार्यक्रम सादर करणार आहेत. सायंकाळी  6:30  वा. समारोप कार्यक्रमातंर्गत वंदे मातर हा राष्ट्रभक्तीपर गीते, भिमगीतांचा, शिवगीतांचा व नृत्यांचा जोशपूर्ण कार्यक्रम होईल. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण प्रसिद्ध सिनेअभिनेत्री अलका कुबल तसेच सुप्रसिध्द पार्श्वगायिका साधना सरगम, सुप्रसिध्द गाय वैशाली माडे, प्रा. राजेश सरकटे  व संच, गायक रवींद्र खोमणे, मुनव्वर अली हे राहणार आहेत.

दरम्यान, कार्यक्रमाच्या पूवसंध्येला म्हणजे दि. 12 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5.00 वाजता जालना शहरातील मामा चौक ते जेईएस महाविद्यालयापर्यंत विद्यार्थ्यांची भव्य रॅली निघणार आहे. या रॅलीत सर्वांनी सहभागी व्हावे. महासंस्कृती कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहेत. तरी सर्व कार्यक्रमांचा जालनेकरांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.

-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment