Wednesday 23 September 2020

घनसावंगी ग्रामीण रुग्णालयास जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांची भेट रुग्णालयात तातडीने डेडीकेटेड कोव्हीड केअर सेंटर सुरु करा तहसिल कार्यालयात घेतला महसुल विभागाचा आढावा

 



        जालना, दि. 23 – जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दि. 23 सप्टेंबर रोजी घनसावंगी येथील ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन या ठिकाणी डेडीकेटेड कोव्हीड केअर सेंटर तातडीने सुरु करण्याचे निर्देश दिले.

          यावेळी अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, तहसिलदार संजय देशमुख, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दोडके, मुख्याधिकारी श्री मांडुरगे, डॉ. जुजगर, डॉ.पवार, डॉ. तौर, डॉ. शिंदे, पोलीस निरीक्षक श्री बंटेवाड,उप अभियंता                   श्री चव्हाण, श्री शिंगणे आदी उपस्थित होते.

             जिल्हाधिकारी श्री बिनवडे म्हणाले, कोरोना विषाणुने बाधित झालेल्या रुग्णांना जिल्ह्याच्या ठिकाणी उपचारासाठी न येता त्यांच्या तालुक्यामध्येच तातडीने उपचार मिळावेत यादृष्टीकोनातुन संपुर्ण जिल्ह्यात तालुक्याच्या ठिकाणी सर्व सोयी-सुविधांनीयुक्त डेडीकेटेड कोव्हीड केअर सेंटर उभारणीवर भर देण्यात येत असुन घनसावंगी येथील रुग्णांनादेखील तातडीने उपचार मिळावेत यादृष्टीकोनातुन 25 ऑक्सिजन बेड व 5 व्हेंटीलेटरची सुविधा असेलेले सेंटर तातडीने सुरु करण्यात यावे. या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी, जेवण यासह आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा मिळतील तसेच कोणाचीही तक्रार येणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश देत रुग्णालयाची आवश्यक ती डागडुजी त्वरेने करुन घेण्यात यावीया सेंटरसाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यात येईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले

         जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी तहसिल कार्यालय,मंठा येथे महसुल विभागाचा सविस्तर आढावा घेऊन उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले,  नुकत्याच झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतपीकांचे नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी विम्याची रक्कम भरली आहे अशा शेतकऱ्यांची माहिती विमा कंपनीला देण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत प्रशासनाने पोहोचावेनजरअंदाज पैसेवारीसंदर्भात  ग्रामपंचायतनिहाय आढावा बैठका घेण्यात याव्यातशिवारफेरी, पीकपहाणीचे कामकाज पुर्ण करुन पीक प्रात्यक्षिकाचे कामही गतीने करण्यात यावेघनसावंगी तालुक्यात महसुलाचे उद्दिष्ट पुर्ण होईल, याकडे सर्व संबंधितांना लक्ष देण्याच्या सुचना करत कोरोनाच्या काळामध्ये प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्याने स्वत:ची काळजी घेण्याबरोबरच स्वच्छतेचे पालन करणे, मास्कचा वापर करणे, सातत्याने हात धुणे तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे आदीबाबत जनतेमध्ये जनजागृती करण्याच्या सुचना करत जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी महसुल वसुली, पीएम किसान, किसान सौर कृषी योजना, प्रलंबित फेरफार, नुकसानीचे पंचनामे, पीककापणी प्रयोग, महाराजस्व अभियान, जमाबंदी आदीबाबतही सविस्तर आढावा घेऊन उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांना सुचना केल्या.

           यावेळी अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, तहसिलदार संजय देशमुख, नायब तहसिलदार गौरव खैरनार, संदीप मोरे यांच्यासह मंडळ अधिकारी, तलाठी आदींची उपस्थिती होती.                                     

*******  

No comments:

Post a Comment