Thursday 24 September 2020

बदनापुर व भोकरदन तालुक्यातील शेतपीकाच्या नुकसानीची जिल्हाधिकाऱ्यांकडून पहाणी शेतपीकाच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा -- जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांचे निर्देश

 



        जालना, दि. 24(जिमका)नुकत्याच झालेल्या पावसामुळे बदनापुर व भोकरदन तालुक्यात झालेल्या शेतपीकाच्या नुकसानीची जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी प्रत्यक्ष शेतीला भेट देऊन पहाणी करत झालेल्या नुकसानीचे  तातडीने पंचनामे करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

        या पाहणीवेळी आमदार नारायण कुचे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बाळासाहेब शिंदे, तहसिलदार श्रीमती छाया पवार, कृषी अधिकारी श्री ठक्के यांच्यासह मंडळ अधिकारी व शेतकरी उपस्थिती होते.

            जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी बदनापुर तालुक्यातील बावणे पांगरी, तुपेवाडी तर भोकरदन तालुक्यातील तपोवन येथील शेतीला भेट दिली.  यावेळी शेतामध्ये पेरणी केलेल्या कापुस पिकाबरोबरच शेडनेटचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन नुकसानीचे पंचनामे तातडीने करुन अहवाल सादर करण्याच्या सुचना करत अहवाल प्राप्त होताच नुकसान भरपाईसाठी अहवाल शासनाला सादर करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी यावेळी सांगितले.

महसुल विभागाचा घेतला आढावा

माझे कुटूंब, माझी जबाबदारी अभियान यशस्वीपणे राबवा

            भोकरदन विभागातील महसुल विभागाचा आढावा जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांकडून घेतला.  यावेळी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री बिनवडे म्हणाले, कोविड-19 विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपुर्ण राज्यामध्ये माझे कुटूंब, माझी जबाबदारी अभियान राबविण्यात येत आहे.  जालना जिल्ह्यातही हे अभियान काटेकोरपणे राबवुन ही मोहिम यशस्वी करण्यासाठी यंत्रणांनी अधिक सक्षम व गतीने काम करावे.  भोकरन भागामध्ये अवैधरित्या गौणखनिजाचे उत्खनन व वाहतुक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी.   त्याचप्रमाणे विभागाला देण्यात आलेली महसुली वसुलीचे उद्दिष्ट पुर्ण होईल, याची सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी.  फेरफारची प्रलंबित असलेली प्रकरणे येत्या १५ दिवसांमध्ये पुर्ण करण्याबरोबरच संगणकीकृत 7/12 चे अहवाल तातडीने पुर्ण करण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी उपस्थित महसुल विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

राजुर येथे होत असलेल्या डेडेकेटेड कोव्हीड केअर सेंटरच्या कामाचा आढावा

         कोरोना विषाणुने बाधित झालेल्या रुग्णांना जिल्ह्याच्या ठिकाणी उपचारासाठी न येता त्यांच्या तालुक्यामध्येच तातडीने उपचार मिळावेत यादृष्टीकोनातुन संपुर्ण जिल्ह्यात तालुक्याच्या ठिकाणी सर्व सोयी-सुविधांनीयुक्त डेडीकेटेड कोव्हीड केअर सेंटर उभारणीवर भर देण्यात येत असुन  राजुर येथे 10 आय.सी.यु. 50 ऑक्सीजन बेडची सुविधा असलेल्या सेंटरच्या कामाची पहाणी करत हे सेंटर लवकरात लवकर सुरु व्हावे यादृष्टीकोनातुन वेगाने कामे पुर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

            यावेळी अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, उप विभागीय अधिकारी शिवकुमार स्वामी, तहसिलदार संतोष गोरड, वैद्यकीय अधिकारी डॉ. पाटील यांच्यासह नायब तहसिलदार, मंडळ अधिकारी, तलाठी आदींची उपस्थिती होती.       

*******  

No comments:

Post a Comment