Saturday 26 September 2020

पावसाने नुकसान झालेल्या शेतीपिकांचे तातडीने पंचनामे करावेत - कृषिमंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

 





 

    जालना दि. 26 (जिमाका) -जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतपिकाचे झालेल्या नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना मिळण्यासाठी नुकसान झालेल्या शेतीपिकाचे तातडीने पंचनामे करून अहवाल शासनास सादर करण्याचे निर्देश राज्याचे कृषी  व माजी सैनिक कलयाण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले.  जिल्हाधिकारी कार्यालयात पावसामुळे झालेल्या शेतीपिकांचे नुकसान तसेच कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनेसंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मार्गदर्शन करताना मंत्री श्री भुसे बोलत होते.  या बैठकीस जिल्हा परीषद अध्यक्ष उत्तम  वानखेडे, आमदार कैलास गोरंट्याल, आमदार बबनराव लोणीकर, आमदार नारायण कुचे, माजी आमदार संतोष सांबरे, भास्कर अंबेकर, जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे, जिल्हा परीषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नानासाहेब चव्हाण.

       कृषिमंत्री दादाजी भुसे  म्हणाले, मागील तीन ते चार आठवड्यात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मोठा पाऊस झाला आहे. तसेच गेल्या तीन-चार दिवसांपासून मोठा पाऊस पडत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.जालना जिल्ह्यामध्ये वार्षिक सरासरीपेक्षा 163 टक्के जास्त पाऊस झाला असल्याने जिल्ह्यातील कापूस, मका, तूर, मूग या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात ज्या ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे, त्या ठिकाणच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्यात यावेत. नुकसान झालेले एकही शेतीक्षेत्र पंचनाम्यापासून सुटणार नाही, याची दक्षता जिल्हा प्रशासनाने घ्यावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

        शेतकरी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून जात असून अश्या परिस्थितीमध्ये विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींनी

शेतपिकांच्या झालेल्या नुकसानीची  वस्तुस्थिती कंपनीला कळविण्याच्या सूचना करत यामध्ये दिरंगाई अथवा हयगय आढळल्यास कंपनीला जबाबदार धरण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

      सोयाबीन बियाण्याच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारीत बहुतांश  तक्रारींचे निराकरण करण्यात आले असून शासनाने यासंदर्भात कठोर पावले उचलत  संपूर्ण राज्यात सोयाबीन बनवणाऱ्या साधारणतः 80 पेक्षा अधिक कंपन्यांवर गुन्हे दाखल करून काही कंपन्यांचे  परवानेही रद्द केले असल्याची माहिती देत सोयाबीनचे घरचे बियाणे वापरण्याची सुरुवात जालना जिल्ह्याने केली असून याचे कौतुक करत प्रत्येक भागात अशाच पद्धतीने काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

     जागतिक बॅंकेच्या अर्थसहाय्याने पोखरा योजना राज्यातील 15 जिल्ह्यात राबविण्यात येते. पोखरा योजनेत 15 जिल्ह्यापैकी दहा जिल्ह्यात अत्यंत समाधानकारक काम असून या योजनेस कुठल्याही प्रकारची स्थगिती दिली नसल्याचे सांगत या योजनेचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे निर्देश कृषिमंत्री श्री भुसे यांनी यावेळी दिले.

 

        राज्यामध्ये बाळासाहेब ठाकरे स्मार्ट व्हिलेज योजना राबविण्यात येत असून या योजनेच्या माध्यमातून गट समूह तसेच फार्मर प्रोड्युसर कंपनी अंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकरी बांधवांना प्राधान्य देण्यात येणार असल्याने जिल्ह्यात अधिकाधिक गट समूह तसेच फार्मर प्रोड्यूसर कंपनी नोंदणी करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

     पी एम किसान योजनेसंदर्भात  गावनिहाय शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्यात याव्यात. ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही त्यांची माहिती जमा करण्यात येऊन अधिकाधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्याच्या सूचनाही कृषी मंत्री श्री भुसे यांनी यावेळी दिल्या.  

      यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींनी उपयुक्त अश्या सूचना केल्या.

      यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी कृषी विभागाच्या योजनांबाबतची माहिती पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यामातुन मंत्री महोदयांना दिली.  

      तत्पूर्वी बदनापूर तालुक्यातील वरुडी फाटा येथील शेतकरी  सुदाम शामराव लहाने यांच्या शेतीची प्रत्यक्ष पाहणी करत झालेल्या नुकसानीची माहितीही कृषी मंत्री दादासाहेब भुसे यांनी जाणून घेतली. यावेळी  आमदार नारायण कुचे, माजी संतोष सांबरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे,आदींसह शेतकरी उपस्थित होते.  

पोखरा योजनेअंतर्गत औजार बँकेचे कृषी मंत्रांच्या हस्ते उदघाटन                

   जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत  औजार बँकेचे उद्घाटन  कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते फित कापुन करण्यात आले यावेळी आमदार कैलास गोरंट्याल, आमदार नारायण कुचे, जिल्हा परिषद अध्यक्ष उत्तम वानखेडे , भास्कर अंबेकर आदींची उपस्थिती होती.

   यावेळी आठ शेतकरी  गटांना शेती औजारे ट्रॅक्टर, मिनी ट्रॅक्टर आदी साहित्यांचे मंत्री महोदयांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment