Saturday 12 September 2020

गोरगरीबांना न्याय देण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सकारात्मक दृष्टीकोन व स्वयंप्रेरणेने काम करावे - पालकमंत्री राजेश टोपे

 



      जालना दि.12 (जिमाका):- सर्वसामान्य व्यक्तीला केंद्रबिंदु मानुन शासनामार्फत अनेकविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात.  शासन सेवेत राहुन सर्वसामान्यांची सेवा करण्याची संधी प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्याला मिळते. केवळ शासकीय नोकरी न करता समाजाप्रती आपलेही काही देणे लागते या भावनेतुन सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गोरगरीबाला न्याय मिळवुन देण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन ठेवत स्वयंप्रेरणेने काम करण्याच्या सुचना राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी केल्या.

            घनसावंगी मतदारसंघातील जालना तालुक्यात असलेल्या 42 गावांच्या विविध प्रश्नांच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री श्री टोपे बोलत होते.

            यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तम वानखेडे, उपाध्यक्ष महेंद्र पवार, आरोग्य सभापती कल्याण सपाटे, कृषी सभापती  विष्णुपंत गायकवाड, समाजकल्याण सभापती श्री परसुवाले,जि.. सदस्य सोपान पाडमुख, उपविभागीय अधिकारी श्री. सानप, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता श्री देशपांडे, महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री. राठोड आदींची प्रमुख उपस्थिती होती.

            पालकमंत्री श्री टोपे म्हणाले, घनसावंगी मतदारसंघाच्या सर्वांगिण विकासासाठी आपण सातत्याने प्रयत्नशिल असुन विकासाच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची तडजोड स्वीकारली जाणार नसल्याचे स्पष्ट करत जिल्हा व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी गोरगरीबांना शासन योजनांचा लाभ देत असताना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी.  सर्वसामान्य व्यक्ती कार्यालयात एखादे काम घेऊन आल्यास त्याला सौजन्याची वागणुक द्यावी.  आपण ज्या कार्यालयात काम करतो ते कार्यालय स्वच्छ व नीटनेटकं असण्याबरोबरच आपल्या ज्ञानाचा उपयोग जनकल्याणासाठी करावा. अधिकाऱ्यांनी केवळ कार्यालयात बसुन काम न करता तालुकास्तरवर तसेच ग्रामीण भागात आठवड्यामधुन किमान दोन वेळेस भेट देऊन त्या ठिकाणी असलेल्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देशही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

            घनसावंगी मतदारसंघामध्ये असलेल्या ४२ गावातील नागरिकांना आरोग्याच्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात यादृष्टीकोनातुन प्रलंबित असलेली कामे प्राधान्याने पुर्ण करण्यात यावीत.  ही कामे करत असताना ती गुणवत्तापुर्ण, दर्जेदार तसेच जलदगतीने पुर्ण करण्यात यावीत. यासाठी निधीची कमतरता भासत असेल तर निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे सांगत ग्रामीण रुग्णांलयामध्ये दैनंदिन स्वच्छता राहील, याकडेही अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याच्या सुचना त्यांनी यावेळी केल्या. जिल्ह्यातील दिव्यांगांची माहिती घेण्यासाठी सर्व्हेक्षण करण्यात यावे.  तसेच ज्यांना दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र मिळालेले नसेल अशांसाठी येत्या काळात कँपचे आयोजन करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

            जनतेला योग्य दाबाने व सुरळीतपणे वीजेचा पुरवठा व्हावा यासाठी ज्या ठिकाणी ट्रान्सफार्मवर ताण येत असेल त्या ठिकाणी अतिरिक्त ट्रान्सफार्मर बसविण्यात यावेत. त्याचबरोबर शेतांमध्ये वस्ती करुन राहणाऱ्यांची मोठी संख्या आहे.  परंतु या ठिकाणी सातत्याने वीजेचा पुरवठा खंडित होत असल्याने प्रत्येक फिडरला एसडीटी बसविण्यात यावेत.  अनेक ठिकाणी वीज वाहुन नेणाऱ्या तारा अत्यंत जीर्ण झाल्या आहेत.  त्याठिकाणी ए.बी. केबल बसविण्यात यावेत.  जालना जिल्ह्यामध्ये सोलार पार्क करण्यासाठी मोठा वाव असल्याचे सांगत गायरान जमिनीवर सोलार पार्क उभारणीसाठी प्रयत्न करण्यात यावेत. सन 19-20 मध्ये जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातुन उपलब्ध करुन देण्यात आलेल्या निधीतील कामे अद्यापही पुर्ण झाले नसल्याने नाराजी व्यक्त करत जिल्ह्यात ज्याही एजन्सी वेळेत काम पुर्ण करत नसतील अशांवर कडक कारवाई करण्याच्या सुचना करुन जालन्यासाठी पारेषण विभागाचे स्वतंत्र असे विभागीय कार्यालय नुकतेच मंजुर करण्यात आले असल्याची माहितीही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी दिली.

            रस्ते या विकासाच्या वाहिन्या आहेत. दळणवळणामध्ये रस्त्यांची मोठी मोलाची भूमिका असते. जिल्ह्यात असलेल्या विविध रस्त्यांची, शासकीय ईमारतींची तसेच ईतर विविध विकासाची कामे बांधकाम विभागाने गुणवत्तापुर्ण व दर्जेदार करण्याच्या सुचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या.

            यावेळी पालकमंत्री श्री टोपे यांनी कृषि विभाग, मृद व जलसंधारण विभाग, सामाजिक वनीकरण या विभागांचाही विस्तृत आढावा घेत अधिकाऱ्यांना सुचना केल्या.

            बैठकीस सर्व संबंधित विभागांचे जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.

*******

No comments:

Post a Comment