Saturday 12 September 2020

गोरगरीबांना आरोग्याच्या सेवा अधिक दर्जेदार मिळण्यासाठी जिल्हा व ग्रामीण रुग्णालयाच्या सक्षमीकरणावर भर ऑक्सीजन प्लँटचा जालना पॅटर्न संपुर्ण राज्यात राबवणार - पालकमंत्री राजेश टोपे

 




            जालना, दि. 12 - जिल्ह्यातील सर्वसामान्य गोरगरीब व्यक्तीला आरोग्य सेवा दर्जेदार व अधिक चांगल्या प्रमाणात तसेच जलद गतीने मिळाव्यात यासाठी जिल्हा रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालयाच्या सक्षमीकरणावर देण्यात येत असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी केले.

            जिल्हा रुग्णालयात नवीन 40 आय.सी.यु. खाटांचा शुभारंभ पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते आज दि. 12 सप्टेंबर रोजी करण्यात आला.

            यावेळी आमदार कैलास गोरंट्याल, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे,  जिल्हा पोलिस अधीक्षक एस. चैतन्य, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, जिल्हा शल्यचिकित्सक श्रीमती अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, डॉ. संजय जगताप आदींची उपस्थिती होती

            पालकमंत्री राजेश टोपे म्हणाले, जिल्ह्यातील सर्वसामान्य व गोरगरीब मोठ्या विश्वासाने जिल्हा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येत असतात. या रुग्णांना आरोग्याच्या सेवा अधिक चांगल्या प्रमाणात मिळाव्यात यासाठी जिल्हा व ग्रामीण रुग्णालयांच्या सक्षमीकरणासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आला आहे.  जालना येथील कोव्हीड रुग्णालयामध्ये कोविड बाधितांवर उपचार करण्यासाठी यापूर्वीच 250 खाटा राखीव ठेवण्यात आल्या असुन यामध्ये 40 आय.सी.यु खाटांची व्यवस्था आहे. आज नव्याने 40 आय.सी.यु खाटांचा शुभारंभ करण्यात आला असुन या ठिकाणी सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या परिसरामध्ये बंद्यांसाठी स्वतंत्र अशा आय.सी.यु. कक्षाची उभारणी करण्यात येत असुन या ठिकाणी नव्याने सुसज्ज असे शस्त्रक्रियागृहाचीही उभारणी करण्यात येत आहे.  रुग्णांसोबत येणाऱ्या नातेवाईकांना राहण्याचा मोठा प्रश्न निर्माण होत असल्याने नातेवाईकांसाठी धर्मशाळेचीही उभारणी करण्यात येत असल्याचेही पालकमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी सांगितले.     

ऑक्सीजन प्लँटचा जालना पॅटर्न संपुर्ण राज्यात राबवणार

            जालना येथील जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना योग्य दाबाने व पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा यादृष्टीकोनातुन सीएसआर फंडातुन 50 लक्ष रुपये खर्चुन 20 के.एल. क्षमता असलेल्या लिक्वीड ऑक्सिजन प्लँटची उभारणी करण्यात आली असल्याने रुग्णांना याचा मोठा लाभ होत असल्याचे सांगत ज्या जिल्ह्यामध्ये 200 पेक्षा अधिक खाटांची संख्या आहे अशा प्रत्येक रुग्णालयामध्ये लिक्वीड ऑक्सिजन प्लँटची उभारणी करण्याचे निर्देश त्या त्या जिल्हा प्रशासनाला देण्यात आले असल्याची माहितीही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी दिली.

            महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना संदर्भात श्री टोपे म्हणाले, प्रत्येक जिल्ह्यामध्ये मल्टीस्पेशालिटी असलेल्या रुग्णालयाची या योजनेसाठी निवड करण्यात आली असून या योजनेत एकूण 977 पॅकेजेस असुन  कोरोनावर उपचार करण्यासाठी श्वसनाच्या होणाऱ्या त्रासासंदर्भात 20 पॅकेजेस  आहेत.  या पॅकेजेसमध्ये न बसणाऱ्या रुग्णांना शासनाने ठरवुन दिलेल्या दरापेक्षा अधिक रक्कम रुग्णालयांना घेता येणार नाही.  रुग्णालयाकडून अधिकचे पैसे घेतले जात असतील तर त्या रुग्णालयांना पाचपट दंड आकारण्याच्या सुचनाही देण्यात आल्या असल्याचे पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी सांगितले.

*******

No comments:

Post a Comment