Friday 6 November 2020

जिल्हाधिकाऱ्यांनी ५ तास मॅराथॉन बैठकांद्वारे घेतला आरोग्य विभागाचा आढावा सर्वसामान्यांना आरोग्याच्या सेवा अधिक चांगल्या व दर्जेदार देण्यासाठी प्रामाणिकपणे काम करावे जिल्ह्यात दररोज किमान एक हजार आरटीपीसीआर तपासण्या झाल्याच पाहिजेत कामचुकारांवर कडक कारवाई करण्याचा ईशारा कोरोनाची लस प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यासाठी सुक्ष्म नियोजन करा - जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे

 




            जालना दि.6 (जिमाका):-  जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला आरोग्याच्या सेवा मिळाव्यात यादृष्टीने आरोग्य सेवेच्या बळकटीकरणासाठी जालना जिल्ह्यात मुबलक प्रमाणात सर्व साहित्य तसेच मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात आला असुन आरोग्य विभागातील प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्याने सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन सर्वसामान्यांना आरोग्याच्या सेवा अधिक चांगल्या व दर्जेदार देण्यासाठी प्रामाणिकपणे काम करावे. कोरोनाच्या अनुषंगाने दररोज किमान एक हजार आरटीपीसीआर तपासण्या झाल्याच पाहिजेत. सहवासितांचा शोध अचुकपणे घेण्याबरोबरच आकडेवारी नियमितपणे पोर्टलवर अपलोड होईल, याची दक्षता घ्यावी. आरोग्य सेवेच्या कामात हयगय अथवा दिरंगाई करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचा ईशाराही जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिला.         

            आरोग्य विभागाच्या विविध योजनांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  त्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री बिनवडे बोलत होते.

            यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सवडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विवेक खतगावकर, डॉ. ज्योति मुंडे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष कडले, जिल्हा क्षयरोग अधिकारी अश्वमेध जगताप, डॉ. प्रताप घोडके, डॉ. सोनखेडकर, डॉ.पाटील  आदींची उपस्थिती होती.

दररोज किमान एक हजार तपासण्या झाल्याच पाहिजेत

            कोरोनासंदर्भात आढावा घेताना जिल्हाधिकारी श्री बिनवडे म्हणाले, राज्याचे आरोग्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी सातत्याने कोरोनासंदर्भात आढावा बैठका घेऊन जिल्ह्यात दररोज किमान एक हजार तपासण्या करण्यासंदर्भात तसेच सहवासितांचा शोध अचुकपणे घेणे, मृत्यूदर कमी करण्याबाबत प्रयत्न करण्यासंदर्भात  सुचना केलेल्या आहेत.  सातत्याने सुचना करुनसुद्धा तपासण्यांची संख्या तसेच सहवासितांच्या संख्येमध्ये वाढ होताना दिसुन येत नसल्याने आरोग्य विभागाच्या कामावर तीव्र नाराजी व्यक्त करत ही अतिशय गंभीर बाब असुन जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालये, उपकेंद्रे, खासगी दवाखाने या माध्यमातुन दररोज किमान एक हजार आरटीपीसीआर तपासण्या झाल्याच पाहिजेत. त्याचबरोबरच कोरोनाबाधित रुग्णांच्या सहवासितांचा अचुकपणे शोध घेऊन एका रुग्णामागे किमान 25 सहवासितांचा शोध घेण्याबरोबरच कोरोनाच्या अनुषंगाने अद्यावत माहिती दैनंदिन पोर्टलवर अपलोड होईल, याची दक्षता घ्यावी.  कामात हयगय अथवा दिरंगाई करणाऱ्यांच्या सेवापुस्तकात नोंद घेणे, वेतनवाढ रोखणे वेळप्रसंगी विभागीय चौकशी प्रस्तावित करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी दिले.     

कोरोनासोबतचे युद्ध अजुन संपलेले नाही : काळजी घेण्याबाबत जनमानसांमध्ये जनजागृती करा

            सध्या हिवाळयाचे दिवस सुरु झाले असुन सणानिमित्त जिल्ह्यात परजिल्ह्यातुन येणाऱ्यांची संख्याही वाढणार आहे.  कोरोनासोबतचे युद्ध अजुन संपलेले नसुन लस येईपर्यंत प्रत्येकाने मास्क, सॅनिटायजरचा वापर तसेच सामाजिक अंतराचे पालन करणे गरजेचे असल्याने जनमानसामध्ये अधिक प्रभावीपणे जनजागृती करा.  ज्या व्यक्तीला सर्दी, ताप, खोकला यासारखी लक्षणे असतील अशा व्यक्तींचे तातडीने विलगीकरण करावे.  गृहविलगीकरणामध्ये असलेल्या व्यक्तींचा विलगीकरणाचा कालावधी संपलेला असता तरी अशा व्यक्तींची आशा, एएनएम यांच्याद्वारे सर्दी, खोकला, थकवा जाणवणे, ऑक्सिजनची पातळी याबाबतची नियमित तपासणी करण्यात यावी.  तपासणी करण्यात आलेल्या व्यक्तींच्या अचुक नोंदी ठेवण्यात येऊन त्याचा दैनंदिन अहवाल प्रशासनाला सादर करण्याच्या सुचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.

कोरोनाची लस प्रत्येकापर्यंत पोहोचण्यासाठी सुक्ष्म नियोजन करा

            कोरोनाची लस ज्यावेळेस उपलब्ध होईल त्यावेळी आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना ही लस टोचण्यासाठी जिल्ह्यात आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची शासनाने माहिती मागवलेली आहे.  जे खासगी रुग्णालये त्यांच्या कर्मचाऱ्यांची माहिती प्रशासनाला सादर करणार नाहीत, अशा रुग्णालयांवर कारवाई करण्याच्या सुचना करत लस उपलब्ध झाल्यानंतर जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांपर्यंत यशस्वीरित्या पोहोचविण्यासाठी त्याचे सुक्ष्म व काटेकोरपणे नियोजन करण्याबरोबरच लस देण्यासाठी प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी तयार करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी दिले.

नॉनकोव्हीड रुग्णांकडे दुर्लक्ष होणार नाही याची दक्षता घ्या

            कोव्हीड आजाराबरोबरच इतर आजार असलेल्या रुग्णांकडे दुर्लक्ष होणार नाही, याची आरोग्य विभागाने दक्षता घ्यावी.  रुग्णांना आवश्यकतेनुसार योग्य ते उपचार करण्याबरोबरच जिल्ह्यात कुष्ठरोग, टीबी, एचआयव्ही यासारखे आजार असलेल्या रुग्णांचा शोध घेऊन उपचार करण्याबरोबरच शासनाकडून विविध योजनेच्या माध्यमातुन या रुग्णांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा प्राधान्याने उपलब्ध करुन देण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी यावेळी दिले.  माझे कुटूंब, माझी जबाबदारी अभियान जिल्ह्यात राबविण्यात आले.  या अभियानामध्ये ज्या वयस्कर व्यक्तींना श्वसन, ऱ्हदयरोग, मधुमेह यासाखरे आजार आढळुन आले त्या सर्वांची येत्या आठ दिवसाच्या आत तपासणी करण्यात यावी व गरजेनुसार त्यांना कोव्हीड रुग्णालयात दाखल करण्याची कार्यवाही करण्याच्या सुचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.

लसीपासुन एकही बालक वंचित राहणार नाही

            जिल्ह्यात बालकांना बीसीजी, पेंटा, एमआर, बीसीजी, व्हिटामीन यासारख्या लसी दरवर्षी आरोग्य विभागामार्फत टोचण्यात येतात. बालकांना देण्यात येणाऱ्या लसींचे तंतोतंत नियोजन करुन लसीपासुन एकही बालक वंचित राहणार नाही. तसेच जननी सुरक्षा योजनेंतर्गत महिलांना माता व बालसंगोपनासाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते.  हे अनुदान त्यांना विहित वेळेत मिळेल, याची दक्षता घेण्याच्या सुचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या. 

सर्वसामान्यांना आरोग्याच्या सेवा अधिक चांगल्या देण्यासाठी

नाविन्यपुर्ण उपक्रम तसेच जबाबदारीने काम करा

            उपचारासाठी दवाखान्यात येणारा प्रत्येक रुग्ण डॉक्टर्स व आरोग्य सेवेतील प्रत्येक कर्मचाऱ्याकडे देवदूत म्हणुन पाहतो.  प्रत्येक शासकीय अधिकारी,कर्मचाऱ्यांला पगार घेऊन जनसेवा करण्याची संधी प्राप्त होते. त्यामुळे प्रत्येकाने केवळ आपल्या कामाकडे केवळ शासकीय कामकाज म्हणुन न पहाता समाजाप्रती आपलेही काही देणे लागते या भावनेतुन सकारात्मक दृष्टीकोन ठेवत काम करण्याची गरज आहे. समाजातील प्रत्येक नागरिकाला आरोग्याच्या सेवा अधिक चांगल्या पद्धतीने कशा देता येतील यासाठी नाविन्यपुर्ण उपक्रम राबवत जबाबदारीने काम करण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी दिल्या.

            जिल्ह्यात कोरोना रुग्णालयामध्ये नव्याने दोन सुविधा निर्माण करण्यात आल्या असुन यामध्ये कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांसाठी पोस्ट कोव्हीड ओपीड तसेच टेलिरेडीऑलॉजी ही सुविधा निर्माण करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली.

            यावेळी जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी जननी सुरक्षा योजना, कुटूंब नियोजन, प्रधानमंत्री मातृवंदन योजना, आशा वर्कर्स, राष्ट्रीय किशोर स्वास्थ कार्यक्रम, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, प्रेरणा प्रकल्प, राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रम, मानवविकास कार्यक्रम, ऊसतोड कामगार आरोग्य तपासणी या विषयावरही उपस्थित अधिकाऱ्यांकडून सविस्तर आढावा घेतला.

            या बैठकीस जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधिक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, सर्व कार्यक्रमांचे जिल्हा समन्वयकांची उपस्थिती होती.

******* 

No comments:

Post a Comment