Tuesday 9 May 2023

जालना येथे तंबाखु व्यसनमुक्ती केंद्राचे उद्घाटन

 


 

जालना, दि. 9 (जिमाका) –  जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाभरामध्ये विविध स्तरावर तंबाखू व तंबाखुजन्य जनजागृती करण्यासाठी व कोटपा 2003 कायद्याची अंमलबजावणी विविध विभागासोबत करण्यासाठी राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रम राबविला जात आहे. राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सामान्य रुग्णालय जालनाच्या वतीने 31 मे पर्यंत जागतिक तंबाखु नकार दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

या अनुषंगाने दि. 4 मे 2023 रोजी जिल्हा रुग्णालय, जालना येथे तंबाखु व्यसनमुक्ती केंद्राचे (टीसीसी) उद्घाटन सहसंचालक (असंसर्गजन्य रोग, मुंबई) डॉ. एकनाथ माले यांच्या हस्ते फीत कापुन करण्यात आले. यावेळी  उपसंचालक, डॉ. भूषण रामटेके, जिल्हा शल्य चिकित्सक अर्चना भोसले, अति. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रताप घोडके, डॉ. मंगल मुळे यांच्या समवेत सर्व वर्ग-1 व वर्ग -2 चे डॉक्टर्स, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

तंबाखु व्यसनमुक्ती केंद्र बजाज इलेक्ट्रीक फाऊंडेशनच्या मदतीने अद्ययावत करण्यात आले आहे. जिल्ह्यामध्ये 12 ग्रामीण रुग्णालये येथे समुपदेशक यांच्या मदतीने तंबाखु व्यवसनमुक्ती केंद्र सुरु आहेत. सदर तंबाखु व्यसनमुक्ती केंद्रामध्ये तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थाचे सेवन करणाऱ्या रुग्णांना समुपदेशनाद्वारे तंबाखुमुक्त केले जाते. रुग्ण तपासणीकरीता टीसीसीमध्ये कार्बन मोनॉक्साईड मॉनीटर, रेस्पायरोमीटर तसेच मुख तपासणी करीता आवश्यक साहित्य उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.

तसेच सर्व रुग्णालय स्वच्छ ठेवण्याकरीता परिसरामध्ये व्यवसनमुक्ती पेटी (दानपेटी) ही नविन संकल्पना राबविली जात आहे. यामध्ये तंबाखु व तंबाखुजन्य  पदार्थाचे सेवन करणाऱ्या रुग्णांनी स्वेच्छेने स्वत: जवळील तंबाखुजन्य पदार्थ दानपेटीमध्ये टाकुण स्वत:ला तंबाखुमुक्त घोषीत करावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक यांनी केले.

तंबाखु व्यसनमुक्ती केंद्र

तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थाचे सेवन सोडविण्यासाठी जिल्ह्यात ग्रामीण रुग्णालये व जिल्हा रुग्णालय येथे तंबाखु व्यसनमुक्ती केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थाचा त्याग करण्यासाठी सदर व्यसनमुक्ती केंद्रामध्ये भेट देवून लाभ घ्यावा किंवा तंबाखु मुक्तीसाठी खालील पथ्य पाळावीत.

तंबाखु सोडण्याचा दिवस ठरवा. जवळचे सर्व तंबाखुजन्य पदार्थ नष्ट करा. तुम्ही तंबाखु सोडली असल्याचे घोषीत करा. नवीन गोष्टी शिका तसेच आपल्या वागण्यात नवीनपणा आणा. स्वकियांकडून प्रोत्साहन व पाठिंबा मिळवा. अपयशाने खचून जावु नका, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.  

 

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment