Monday 1 May 2023

महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते संपन्न

 







 

जालना, दि. 1 (जिमाका) :-  महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 63 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते जालना येथील पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर सोमवार दि. 1 मे 2023 रोजी सकाळी 8 वाजता संपन्न झाले.  

यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, पोलिस अधिक्षक डॉ.अक्षय शिंदे, अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, ‍निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी रविंद्र परळीकर,  यांच्यासह स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, नागरिक आदी उपस्थित होते.

ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत व लगेचच ‘गर्जा महाराष्ट्र माझा…’ हे राज्यगीत पोलीस वाद्यवृंदाच्या तालावर सादर करुन राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. ध्वजारोहण व राष्ट्रध्वज मानवंदनेनंतर पोलीस दलाने संचलन केले. या संचलनात पोलीस दल, गृहरक्षक दल, महिला पोलीस दल, होमगार्ड आदींनी पोलीस वाद्यवृंदाच्या तालावर संचलन केले.

आपल्या शुभेच्छा संदेशात जिल्हाधिकारी डॉ. राठोड म्हणाले की, 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली असून संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीच्या लढ्यात अनेक हुतात्म्यांनी बलिदान दिले आणि मराठी भाषिक प्रदेश असलेले आपले महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले.  भारतीय संघराज्यातील एक प्रगत राज्य म्हणून महाराष्ट्राचे वेगळे महत्त्व आहे. महाराष्ट्र हे पूर्वीपासुनच पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जाते.  स्वराज्याचे प्रणेते छत्रपती शिवाजी महाराज, सामाजिक सुधारणेचे प्रणेते महात्मा जोतिराव फुले, सामाजिक समतेचा पाया रचणारे छत्रपती राजर्षी शाहू महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह आपल्या राज्याला विविध समाजसुधारकांची वैभवशाली परंपरा लाभलेली आहे.  सांस्कृतिक, वैज्ञानिक, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, क्रीडा, साहित्य अशा विविधांगी क्षेत्रात महाराष्ट्रातील विविध महान व्यक्तींनी उल्लेखनीय योगदान दिलेले आहे.  हा प्रगतीचा वारसा भविष्यात अधिक समृद्ध होण्याच्या यादृष्टीने आपण सर्व कृतीशील राहून आपल्या महाराष्ट्राच्या लौकिकात  भर टाकणारी वाटचाल एकमेकांच्या साथीने करुयात, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

भाषणापूर्वी जिल्हाधिकारी यांनी पोलीसांची मानवंदना स्विकारली. यावेळी अनुकंपा तत्वावरील उमेदवार व सरळसेवेने नियुक्ती झालेल्या उमेदवारांना प्रातिनिधीक स्वरुपात   जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड  यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

यामध्ये अविनाश ताराचंद चव्हाण, अमोल बालाजी तळेकर, अरविंद अरुण वनगुजर, नम्रता किशोर वाघमारे यांना तलाठी या पदावर तर सचिन इयोब कांबळे व राजश्री सुधीर साळवे यांना शिपाई पदावरील नियुक्तीपत्राचे वितरण करण्यात आले. तसेच औरंगाबाद विभागातील भूमि अभिलेख कार्यालयात सरळसेवा भरती 2021 द्वारे निवड झालेल्या उमेदवारांपैकी भक्ती राजेंद्र खोजे, उमेश आत्माराम चव्हाण, वैभव डिगांबर मरकड, आकाश सोमनाथ रहाणे, आशिष शंकर ताडेवार आणि कोमल अंबादास शिरसाठ यांना भूकरमापक पदावरील  नियुक्तीपत्रे वितरीत करण्यात आले.

तसेच राज्याच्या पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह सहायक पोलिस उपनिरीक्षक संतोष धायडे, पोलिस हवालदार लक्ष्मीकांत आडेप, मंदा पवार, चालक पोलिस हवालदार भालचंद्र बिनोरकर, जयसिंग बैस, पोलिस अंमलदार धीरज भोसले यांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते यावेळी प्रदान करण्यात आले.  

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment