Tuesday 2 May 2023

 

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये 1 हजार 581 प्रकरणे निकाली

 

जालना, दि. 2 (जिमाका) :-  राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली यांनी निर्देशित केल्यानूसार जिल्हा व सत्र न्यायालय जालना येथे विविध प्रकरणाबाबत दि.30 एप्रिल 2023 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रीय लोकअदालतीत एकुण 1 हजार 581 प्रकरणे निकाली काढण्यात आली तर तडजोडीअंती 9 कोटी 69 लाख 47 हजार 14 रुपयांची रक्कम जमा झाली, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव पी.पी.भारसाकडे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

प्रलंबित दिवाणी व फौजदारी प्रकरणे, मोटार वाहन अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, तसेच धनादेशाचा अनादर संदर्भातील प्रकरणे, कौटूंबिक वादाची प्रकरणे, बीएसएनएल दावा दाखल पुर्व प्रकरणे यासाठी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. लोकअदालतीमध्ये जिल्ह्याच्या मुख्यालयी 8 पॅनल ठेवण्यात आले त्यावर पॅनल प्रमुख म्हणुन सर्व न्यायाधीशांनी काम पाहिले.  यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्षा व्ही. एम. मोहिते, जिल्हा न्यायाधीश ए.डी.देव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव पी.पी.भारसाकडे तसेच न्यायाधीश, पॅनल सदस्य व न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.

            जालना येथील कौटुंबिक न्यायालयातील राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये एकुण 2 प्रकरणात सन्मानजनक तडजोड होवून प्रकरणे निकाली काढण्यात आली.  त्यामधील 2 प्रकरणातील जोडप्यांनी परस्परांमधील वाद सामंजस्याने मिटवून घटस्फोटाचा मार्ग सोडून पुन्हा संसार करण्याचा निर्णय घेतला. तसचे पक्षकारांच्या उत्स्फुर्त प्रतिसादामुळे राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे निकाली निघाले. पॅनल सदस्य म्हणून विधीज्ञांनी तसेच सरकारी अभियोक्ता यांनी काम पाहिले. लोक अदालत यशस्वीतेसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातील व न्यायालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. असे सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment