Wednesday 3 May 2023

अपर जिल्हादंडाधिकारी यांचे कलम 37 (1) व (3) अन्वये आदेश 17 मेपर्यंत लागू

 


             जालना दि. 3 (जिमाका) :-   जालना जिल्ह्यातील शहर व ग्रामीण भागात बुध्द पौर्णिमा उत्सव निमित्त मिरवणुका व इतर कार्यक्रम साजरे केले जातात. तसेच दि. 8 मे 2023 रोजी संकष्ट चतुर्थी असल्याने राजुर, माळाचा गणपती व मावा पाटोदा येथे गणपती मंदिर असल्याने सदर ठिकाणी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. सध्या महाराष्ट्रात राजकीय दृष्ट्या सत्ताधारी व विरोधकांत एकमेकांविरुध्द आरोप प्रत्यारोप विविध कारणावरुन सुरु आहे. मराठा आरक्षण मिळावे या मागणीसाठी तसेच शेतक-यांच्या विविध मागणीसाठी विविध संघटनांकडून आत्मदहन, उपोषण, धरणे, मोर्चे, निदर्शने, रास्तारोको इत्यादी सर्व प्रकारची आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.  या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये संपूर्ण जिल्ह्यासाठी  दि. 4 मे 2023 रोजीचे  6.00 वाजेपासून ते दि.17 मे  2023 रोजीचे रात्री 12.00 वाजेपर्यंत आदेश जारी करण्यात आला आहे.

        त्यामुळे अपर जिल्हादंडाधिकारी जालना यांना प्राप्त अधिकारानुसार पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) अन्वये शासकीय कर्तव्य पार पाडणा-या कर्मचा-यांच्या व्यतिरिक्त इतर कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी किंवा त्या आसपास शस्त्रे, लाठ्या, सोटे, बंदुके, तलवारी, भाले, चाकु व इतर शरीरास इजा अथवा अपाय करणा-या वस्तु जवळ बाळगणार नाही. तीक्ष्ण पदार्थ अथवा स्फोटके सहज हाताळता येतील अशी घातक वस्तु जवळ बाळगणार नाही. दगड किंवा इतर उपकरणे किंवा प्रवर्तक शस्त्रे गोळा करुन ठेवणार नाही किंवा जवळ बाळगणार नाही. व्यक्तींच्या किंवा समुहाच्या भावना जाणुनबुजुन दुखविण्याचे उद्देशाने असभ्यतेने भाषण म्हणणार नाही, वाद्य वाजविणार नाही, गाणे म्हणणार नाही. व्यक्तींचे किंवा शवाचे किंवा त्याच्या प्रतिकृतीचे प्रदर्शन करणार नाही. आवेषी भाषण, अंगविक्षेप,विडंबनापर नकला करणार नाही  आणि सभ्यता किंवा नितिमत्ता यास बाधा येईल किंवा ज्यामुळे राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा अराजक माजेल अशी चित्रे, निशाणी, घोषणा पत्रे किंवा कोणतीही वस्तु बाळगणार नाही  तसेच  पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (3) अन्वये  पाच किंवा अधिक व्यक्तींना जमण्यास किंवा सभा, मिरवणुका, मोर्चा काढण्यास मनाई केली आहे.    

हा आदेश कामावरील कोणताही ‍ अधिकारी किंवा कर्मचारी यांना लागु होणार नाही.  तसेच विवाह, अंत्ययात्रा आणि पोलीस अधिक्षक जालना व उपविभागीय पोलीस अधिकारी जालना, अंबड, परतुर, भोकरदन यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुका, सभा, मोर्चा यांना लागु राहणार नाही.  हा आदेश संपूर्ण जिल्ह्यासाठी  दि. 4 मे 2023 रोजीचे  6.00 वाजेपासून ते दि.17 मे  2023 रोजीचे रात्री 12.00 वाजेपर्यंत अंमलात राहील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

-*-*-*-*-*-    

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment