Tuesday 16 May 2023

जलसंपदा संवर्धन व व्यवस्थापन क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल राष्ट्रीय जल पुरस्कारच्या सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत श्रेणीमध्ये मौजे कडेगावची तृतीय क्रमांकाच्या पुरस्कारासाठी निवड

 

 


 

जालना, दि. 16 (जिमाका) – जलसंपदा संवर्धन आणि व्यवस्थापन क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल राष्ट्रीय जल पुरस्कार-2022 च्या सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत श्रेणीमध्ये बदनापूर तालुक्यातील मौजे कडेगावची तृतीय श्रेणीच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने (जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभाग) जलसंपदा संवर्धन आणि व्यवस्थापन क्षेत्रातील विविध श्रेणींसाठी चौथ्या राष्ट्रीय जल पुरस्कार - 2022 साठी विजेत्यांची घोषणा केली आहे.

बदनापूर तालुक्यातील कडेगाव ग्रामपंचायतची राष्ट्रीय जल पुरस्कार-2022 च्या सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत श्रेणीमध्ये तृतीय क्रमांकाच्या (संयुक्त विजेता) पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. सन्मानचिन्ह,  प्रशस्तीपत्र आणि  रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

या पुरस्कारबद्दल जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, मराठवाडा शेती सहाय्य मंडळाचे विश्वस्त कृषिरत्न विजय आण्णा बोराडे, क्रीडा हैदराबादचे संचालक डॉ. व्ही. के. सिंग, प्रधान शास्त्रज्ञ डॉ. जे. व्ही. एन. एस. प्रसाद, अटारी पुणेचे तत्कालीन संचालक डॉ. लाखन सिंग, विद्यमान संचालक डॉ. एस. के. रॉय, यांनी कडेगावचे सरपंच भीमराव गंगाराम जाधव,  ग्रामस्थ आणि कृषि विज्ञान केंद्राचे अभिनंदन केले आहे. कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस. व्ही. सोनुने, कृषि अभियंता पंडीत वासरे, शास्त्रज्ञ अजय मिटकरी, राहुल चौधरी, डॉ. हनुमंत आगे, संगीता गायकवाड, सुनील कळम, शशिकांत पाटील यांनी प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

कडेगाव हे खरपुडी येथील कृषि विज्ञान केंद्र, यांनी निक्रा (NICRA- National Innovative Climate Resilient Agriculture program) प्रकल्पा अंतर्गत 2015-16 मध्ये दत्तक घेतलेले गाव असून या गावात भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार विविध हवामान अनुकूल उपक्रम राबविण्यात आले आहेत. त्यापैकी नैसर्गिक साधनसंपत्ती व्यवस्थापन या घटका अंतर्गत गावात खालील उपक्रम गावकऱ्यांच्या सहकार्याने राबविण्यात आले आहेत.

सिमेंट नाला बांधमधील गाळ काढणे,  पाझर तलावातील गाळ काढणे, भूमिगत प्लास्टिक बंधारा, कृत्रिम विहीर पुनर्भरण, विहिरींचे पुर्नभरण, शेततळयातील गाळ काढणे,  वाळूच्या गोण्या दाबून चेकडॅम, भूमिगत प्लास्टिक  बंधारे, बांधबंदिस्तीसह कमी पाण्यावर येणारी पिके जसे  तुती (रेशीम उद्योग), गव्हाऐवजी कमी पाण्यावर येबरी ज्वारी, हरभरा या पिकांना प्रोत्साहन, कापूस + मूग, सोयाबीन + तूर, अशा आंतरपीक पद्धतींना प्रोत्साहन,   सोयाबीन आणि हरभरा पिकांसाठी बीबीएफचा वापर,  कापूस पिकात ठिंबकचा वापर. पाणलोट क्षेत्र आधारित उपक्रम -  नवीन शेततळी,  शेतीचे यांत्रिकीकरण याशिवाय विविध उपक्रमांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रशिक्षण व क्षमता बांधणी करण्यात आली आहे.

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment