Monday 7 June 2021

जालना जिल्हा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत जाऊ नये यासाठी नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे प्रशासनाने नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी - पालकमंत्री राजेश टोपे

 



            जालना, दि. 7 (जिमाका):-  आपला जिल्हा शासनाने ठरवून दिलेल्या निकषामध्ये पहिल्या स्तरात येत असल्याने जिल्ह्यात सर्वच बाबतीत शिथिलता देण्यात आली असली तरी नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन करून व्यवसाय आणि व्यवहार करणे आवश्यक आहे. अति उत्साहामुळे आपल्या कुटुंबाला आणि जिल्ह्याला आपण पुन्हा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत घेऊन जाणार नाही याची काळजी प्रत्येक नागरिकाने घ्यावी, असे आवाहन करून प्रशासनाने नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य, कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिले.

            जालना जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री श्री टोपे बोलत होते.

      यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक विनायक देशमुख, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी  प्रताप सवडे, अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे , निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके,उप विभागीय अधिकारी संदीपान सानप, उप विभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव, उप विभागीय अधिकारी श्री कोरडे, उपजिल्हाधिकारी अंजली कानडे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र परळीकर, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) श्रीमती शर्मिला भोसले, अतिरिक्त पोलीस अधिक्षक विक्रांत देशमुख, जिल्हा शल्यचित्किसक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पद्मजा सराफ, डॉ. प्रताप घोडके, नगर परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी नार्वेकर, अन्न औषध विभागाच्या श्रीमती अंजली मिटकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

               पालकमंत्री श्री टोपे म्हणाले, जालना जिल्‍ह्यामध्‍ये कोविड बाधीत रुग्‍णांचा पॉझीटीव्‍हीटी रेट हा 2.05 टक्के असून ऑक्‍सीजन बेड व्‍यापलेली टक्‍केवारी 17.65 टकके इतकी असल्‍याने जालना जिल्‍हा शासनाने घोषीत केलेल्‍या पहिल्‍या स्‍तरामध्‍ये समाविष्ट झाल्याने जिल्हृयात सर्वच बाबतीमध्ये शिथीलता देण्यात आली आहे.  परंतु तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता प्रत्येक नागरिकाने कोरोनाच्या नियमांचे काटोकोरपणे पालन करण्याची गरज असुन या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता याचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी प्रशासनाने सर्वतोपरी तयारी करण्याचे निर्देशही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी दिले. 
          म्युकरमायकोसीसच्या (काळी बुरशी) या आजारावरील उपचार सामान्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारा नसल्याने राज्य शासनाच्या महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत रुग्णांवर मोफत उपचार करण्याचा निर्णय घेतला आहे. या आजारावरील उपचारासाठी रुग्णांकडून पैसे घेतले जात नाहीत ना याची खबरदारी घेण्यात यावी.  प्रत्येक दवाखान्यात नियुक्त करण्यात आलेल्या लेखापरीक्षकांनी याबाबत दक्ष राहुन काम करण्याच्या सुचना करत ज्या खासगी रुग्णालयांची निवड राज्य शासनाच्या महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत या आजारावर उपचारासाठी करण्यात आलेली नसेल व अशा ठिकाणी जर रुग्ण म्युकरमायकोसीसच्या आजारावर उपचार घेत असतील तर अशा खासगी रुग्णालयांसाठीही या आजाराच्या उपचारांचे दर निश्चित करण्यात आले आहेत. निश्चित करण्यात आलेल्या दरापेक्षा अधिक रक्कम रुग्णांकडून घेतली जाणार नाही, याचीही दक्षता घेण्याचे निर्देश पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी दिले. 
               जालना जिल्ह्यामध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक व कोरोनाबाधितांचे प्रमाण कमी होत असले तरी यंत्रणेने गाफील न राहता कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.  हायरिक्स व लोरिस्क सहवासितांच्या चाचण्या अधिक प्रमाणात करण्यात याव्यात. तसेच गृहविलगीकरणापेक्षा संस्थात्मक विलगीकरणावर भर देण्याचे निर्देश देत कुठल्याही परिस्थितीमध्ये बाधित रुग्णांना कोव्हीड केअर सेंटरमध्ये दाखल करावे. वेळप्रसंगी पोलीस विभागाची मदत घेण्यात येऊन त्यादृष्टीने आवश्यक ते नियोजन करण्याच्या सुचनाही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी दिल्या. 

            कोरोना बाधित अथवा संशयित रुणांना कोव्हीड केअर सेंटरमध्ये सर्व सोयी-सुविधा प्राधान्याने मिळाव्यात.  या ठिकाणची स्वच्छता दररोज होईल याकडे लक्ष देण्यात यावे. तसेच या ठिकाणी ठेवण्यात येणाऱ्या रुग्णांना देण्यात येणाऱ्या जेवणाचा दर्जाही उत्तम राहील, याची दक्षता घेण्यात यावी. रुग्णांची दररोज 6 मिनिट वॉकटेस्ट घेण्यात यावी, अशा सुचनाही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी दिल्या.

*******

No comments:

Post a Comment