Monday 28 June 2021

आरटीपीसीआर चाचण्यांबरोबरच लसीकरणाची गती वाढवा जिल्ह्यातील बालरुग्णालयांना आरटीपीसीआर किटस मोफत उपलब्ध करुन देत कोव्हीडची लक्षणे असलेल्यांची चाचणी करा मंठा येथे लिक्विड ऑक्सिजन प्लँट बसवा -पालकमंत्री राजेश टोपे

 



            जालना, दि. 28 (जिमाका):-  जालना जिल्ह्यामध्ये कोव्हीडच्या अनुषंगाने होत असलेल्या चाचण्यांची संख्या अंत्यत कमी प्रमाणात असुन लसीकरणाची गतीही कमी आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात आरटीपीसीआर चाचण्यांबरोबरच लसीकरणाचा वेग वाढविण्यात यावा. जिल्ह्यातील सर्व बालरुग्णालयांना आरटीपीसीआर चाचण्यांच्या किटस मोफत उपलब्ध करुन देण्यात येऊन दवाखान्यात उपचारासाठी येणाऱ्यांना   कोव्हीडची लक्षणे असल्यास अशा प्रत्येकाची चाचणी करण्यात यावी.  तसेच मंठा येथे लिक्विड ऑक्सिजन प्लँट बसविण्याचे निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य कुटूंबकल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिले.

            जालना जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री श्री टोपे बोलत होते.      यावेळी  जिल्हा पोलीस अधिक्षक विनायक देशमुख, अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे , निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके,उप विभागीय अधिकारी संदीपान सानप, उप विभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव, उप विभागीय अधिकारी श्री कोरडे, उपजिल्हाधिकारी अंजली कानडे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र परळीकर, जिल्हा शल्यचित्किसक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पद्मजा सराफ, डॉ. प्रताप घोडके, नगर परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी नार्वेकर, अन्न औषध विभागाच्या श्रीमती अंजली मिटकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

सहवासितांचा काटेकोरपणे शोध घेत आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या वाढवा

            जालना जिल्ह्यामध्ये आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या समाधानकारक नसुन बाधित व्यक्तींच्या लोरिस्क हायरिस्क सहवासितांचा शोध घेऊन त्यांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात याव्यात.  जालना जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात चाचण्यांची संख्या वाढविण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येऊन दरदिवशी करण्यात येणाऱ्या चांचण्यांचे उद्दिष्टही त्यांना देण्यात आले आहे.  जालना जिल्ह्याचा कोरोनाचा पॉझिटीव्हीटी दर हा आजघडीला जरी कमी असला तरी हा दर भविष्यात वाढु नये यासाठी चाचण्यांची संख्या वाढलीच पाहिजे, अशा स्पष्ट सुचना देत जिल्ह्यात जी बालरुग्णालये आहेत अशा प्रत्येक बालरुग्णालयांना आरटीपीसीआर चाचण्यांचे किट मोफत उपलब्ध करुन देऊन ज्या बालकांना सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी अशा प्रकारची कोव्हीडची लक्षणे असतील अशा प्रत्येकाचे तपासणी करण्याच्या सुचनाही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी दिल्या.  

लसीकरणाचा वेग वाढवा

            कोरोनाचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी मास्क, सुरक्षित अंतराचे पालन याबरोबरच लसीकरणही तेवढेच महत्वाचे आहे.  जालना जिल्हा लसीकरणाच्या बाबतीमध्ये ईतर जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये मागे राहू नये यासाठी ग्रामीण भागात लसीकरणाबाबत अधिक दक्षपणे जनजगृती करण्यात यावी.  जिल्ह्यात लसीकरणासाठी 200 केंद्र सुरु करण्यात येऊन सातही दिवस लसीकरण केले जाईल, यादृष्टीने नियोजन करण्याबरोबरच दैनंदिन लसीकरणाचे उद्दिष्ट ठरवुन देण्यात यावे.  लसीकरणाच्या या राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये प्रत्येक नगरपालिका, नगरपंचायत, तहसिल कार्यालय, उप विभागीय कार्यालयांनी हिरिरीने सहभाग नोंदवत ही मोहिम यशस्वी करावी.  नगरपालिकांच्या नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांना लसीकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी सहभाग नोंदविण्याबाबत पत्र देण्यात यावे.  तसेच ग्रामपातळीवर तलाठी ग्रामसेवक यांना लसीकरणाचे उद्दिष्ट ठरवुन देण्यात यावे. दैनंदिन उद्दिष्टापेक्षा कमी लसीकरण झाल्यास कारवाईच्या सुचनाही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी दिल्या.

निर्बधांची कडक अंमलबजावणी करा

            राज्य शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्बंध कडक केले आहेत.  सायंकाळी 5 वाजेनंतर मुक्त संचारास बंदी करण्यात आली आहे.  लग्नसमारंभ तसेच सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार  नाही. तसेच विनामास्क कोणीही फिरणार नाही, यादृष्टीने काळजी घेत शासनाच्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन होईल, याची दक्षता घेण्याच्या सुचनाही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी केल्या.  

*******

No comments:

Post a Comment