Tuesday 24 May 2022

दुकाने व आस्थापनांचे नामफलक मराठीत लावणे बंधनकारक

 


     जालना दि.24 (जिमाका) :-  महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियम) अधिनियम अधिसुचनेनुसार सुधारणा केली असून या अधिसुचनेनुसार आता सर्व दुकाने, व्यापारी आस्थापना, हॉटेल, करमणुकीचे ठिकाणे यांना त्यांच्या आस्थापनांच्या नावांचे नामफलक मराठीत लावणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. या अधिसुचनेनुसार आस्थापनेच्या नियोक्त्याकडे, देवनागरी लिपितील मराठी भाषेव्यतिरिक्त इतर कोणत्याही भाषेतील व लिपितील नामफलक देखील असू शकतील,

    मराठी भाषेतील अक्षरलेखन, नामफलकावर सुरुवातीलाच लिहीणे आवश्यक असेल आणि मराठी भाषेतील अक्षरांचा टंक आकार इतर कोणत्याही भाषेतील अक्षरांच्या टंक आकारापेक्षा लहान असणार नाही.  तसेच ज्या आस्थापनांमध्ये मद्य पुरविले जाते किंवा विकले जाते अशा आस्थापना, नामफलकावर महान व्यक्तींची किंवा गड किल्ल्यांची नावे लिहू नयेत.

   जालना जिल्हयातील सर्व दुकाने व आस्थापना मालकांनी वरील अधिसुचनेची काटेकोरपणे अंमलबजावणी करुन त्यांच्या आस्थापनांचे नामफलक देवनागरी लिपितील मराठी भाषेत लावावेत, असे सरकारी कामगार अधिकारी अ.मा. जाधव, यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे आवाहन केले आहे.

-*-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment