Monday 9 May 2022

बि-बियाणे, रासायनिक खतांची अधिक दराने विक्री होणार नाही याची दक्षता घ्यावी -- पालकमंत्री राजेश टोपे * नानाजी देशमुख कृषि संजिवनी योजनेच्या कामात प्रलंबितता ठेवू नका. * जिल्ह्यात कृषि योजनांना अधिक गती द्या

 










            जालना, दि.9(जिमाका): -  खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात बियाणे व खतांचा वेळेत पुरवठा करावा. बियाणे, रासायनिक खतांची अधिक दराने विक्री होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. तसेच शेतकऱ्यांना विहित वेळेत पीककर्ज उपलब्ध होऊन जिल्ह्याला देण्यात आलेले पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण होईल, यादृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य, कुटूंबकल्याण, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिले.

            जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात खरीप हंगाम  2022 पूर्वतयारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना  पालकमंत्री श्री टोपे बोलत होते.

यावेळी आमदार बबनराव लोणीकर, आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार,  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भीमराव रणदिवे ए.जे. बोराडे, कल्याण सपाटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री राजेश टोपे म्हणाले की, खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांकडून बि-बियाणे, रासायनिक खतांची मोठ्या प्रमाणात मागणी होत असते. शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे बि-बियाणे, खतांचा पुरवठा करण्यात यावा.  बियाण्यांचा पुरवठा करतेवळी ते उच्चप्रतीचे व दर्जेदार असेल याची खात्री करण्यात यावी.  बोगस बियाणे, खतांचा पुरवठा होणार नाही याची आवश्यक ती काळजी घेण्यात यावी.  तसेच बियाणे व खते निश्चित केलेल्या दरानुसारच विक्री होतील, याचीही काळजी घेण्याच्या सूचना पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी केल्या.

शेतकऱ्यांना शेतीच्या मशागतीसाठी पीककर्जाची निकड भासते असते. जिल्ह्यातील प्रत्येक गरजू व पात्र शेतकऱ्याला विहित वेळेत पीककर्ज उपलब्ध होईल, यादृष्टीने संबंधित विभागांनी कर्ज वाटपाचे नियोजन करावे.  पीककर्जासंदर्भात विविध बँकांसोबत  समन्वय साधुन त्यांना देण्यात आलेले उद्दिष्ट पुर्ण होईल, यासाठी पाठपुरावा करण्यात यावा.  ज्या बँकां त्यांना देण्यात आलेले उद्दिष्ट पुर्ण करणार नाहीत, अशा बँकांमधील शासकीय ठेवी तातडीने काढून घेण्यात याव्यात व या बँकांची तक्रार रिजर्व्ह बँकेकडे करण्यात यावी. शेतकऱ्यांच्या शेतीपंपाला वीज जोडणीही वेळेत मिळेल यासाठीही आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सुचनाही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.

नानाजी देशमुख कृषि संजिवनी योजना ही शेतकऱ्यांच्या हिताच्यादृष्टीने अत्यंत उपयुक्त अशी योजना आहे.  या योजनेच्या माध्यमातुन कृषिविषयक कामांना देण्यात येणाऱ्या पूर्वसंमती मंजुरीमध्ये शेतकऱ्यांना अनेक अडचणी येत असल्याच्या तक्रारी येत आहेत.  ही अतिशय गंभीर बाब असुन शेतकऱ्यांना कामांसाठी पूर्वसंमती ही वेळेत मिळाली पाहिजे.  या योजनेमध्ये कुठल्याही प्रकारची प्रलंबितता राहणार नाही, याची काळजी घेण्यात यावी. या कामात हयगय अथवा दिरंगाई करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या सुचना करत  या योजनेंतर्गत बंद करण्यात आलेल्या बाबी पुन्हा सुरु करण्यासाठी मंत्रालयीन स्तरावर पाठपुरावा करुन त्या सुरु करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी सांगितले. 

 जालना जिल्ह्यात कृषि विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांना अधिक गती देण्याची गरज असुन विविध योजनांमध्ये अधिकाधिक निधी खर्च होऊन त्याचा लाभ प्रत्यक्ष शेतकऱ्यांना मिळेल, यादृष्टीने कृषि विभागाने नियोजन करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

याप्रसंगी आमदार बबनराव लोणीकर, आमदार नारायण कुचे यांनीही कृषि विषयक अनेक प्रश्न मांडून ते तातडीने सोडविण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी भीमराव रणदिवे हे खरीप हंगाम 2022 मध्ये करण्यात आलेल्या पूर्वतयारीची माहिती देताना म्हणाले की, खरीप हंगाम 2022 मध्ये जिल्ह्यात 6.13 लक्ष हेक्टर क्षेत्रावर पीक पेरणीचे नियोजन करण्यात आले असुन 1.66 लक्ष क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे. बियाणे बदल दरानुसार 71 हजार 142 क्विंटल बियाणे आवश्यक असुन शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बियाणे पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे.

जालना जिल्ह्यास 2.13 लक्ष मे.टन रासायनिक खतांचे आवंटन मंजूर असुन आतापर्यंत 28 हजार 620 मे.टन रासायनिक खतांचा पुरवठा झाला आहे.  १ एप्रिल, 2022 रोजी 58 हजार 397 मे.टन मागील खतसाठा उपलब्ध असुन आजअखेर जिल्ह्यात 87 हजार 017 मे. टन उपलब्ध असुन 77 हजार 802 मे.टन एवढा साठा शिल्लक आहे.  शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे रासायनिक खतांचा पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.  रासायनिक खताच्या वापरामध्ये बचत करण्यासाठी जिल्ह्यात नॅनो युरीया, मिश्र खताचा वापर, बायो फर्टीलायझर यांचा वापर करुन रासायनिक खताच्या बाबीमध्ये जिल्ह्यात 10 टक्के खत बचत मोहिम राबविण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

            सर्वप्रथम कृषि विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या विविध घडीपुस्तिकांचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन  तसेच कृषिविषयक माहिती देण्याऱ्या ब्लॉगचा शुभारंभही करण्यात आला.  तसेच कृषी पुरस्कृत प्राप्त शेतकरी रावसाहेब ढगे, रायसिंग सुंदरडे, सुचिता शिनगारे व अभयकुमार काळुंके या शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कृषि विभागाच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती व जनजागृती वाहनांस हिरवी झेंडी दाखवून या उपक्रमांचा शुभारंभही पालकमंत्र्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला. यामध्ये नॅनो युरिया वापर वाढविणे (ईफ्को), रासायनिक खतांचा संतुलित वापर व मिश्र खत तयार करणे मोहिम (कृभको), शेंद्रीय बोंडअळी व्यवस्थापन मोहिम (निजुविडू) तसेच  छत्रपती शिवाजी महाराज महिला बतचगट, माळीपिंपळगाव यांच्यामार्फत बांधावर खत वाटप मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.

            बैठकीस सर्व संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी तसेच शेतकऱ्यांची उपस्थित होती.

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment