Wednesday 11 May 2022

श्रीक्षेत्र राजुरेश्वर महागणपती मंदिर परिसरातील विकास कामे जलदगतीने पूर्ण करावीत ---- जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

 





जालना, दि. 11 (जिमाका) :- जालना जिल्हयातील सुप्रसिध्द तीर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणारे श्रीक्षेत्र राजुरेश्वर मंदिर परिसरात करण्यात येत असलेली पायाभूत सुविधांची कामे दर्जेदार, गुणवत्तापूर्ण तसेच विहित वेळेत जलदगतीने पूर्ण करण्यात यावीत. तसेच या क्षेत्राला ‘अ’ वर्ग ग्रामीण तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळण्यासाठी आवश्यक असणारे  सर्व निकष पूर्ण करण्याचे  निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले.

            राजुर येथे आज जिल्हास्तरीय कार्यकारीणी समितीची तीर्थक्षेत्र विकास आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. राठोड बोलत होते.

            यावेळी  जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती कल्पना क्षीरसागर, पोलीस उपअधीक्षक आय.एस. बहुरे, भाऊसाहेब भुजंग, प्रशांत दानवे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील सुर्यवंशी, नायब तहसिलदार श्री दांडगे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

            जिल्हाधिकारी डॉ. राठोड म्हणाले की, श्रीक्षेत्र राजुरेश्वर या ठिकाणी अनेकविध विकासकामे करण्यात येत आहेत.  ही कामे दिलेल्या वेळेत पूर्ण करण्यात यावीत. मंदिरात प्रवेशासाठी तीन ठिकाणी प्रवेशद्वार उभारण्यात येत असुन मुख्य प्रवेशद्वार अधिक आकर्षक पद्धतीने तयार करण्यात यावे.  या ठिकाणी येणाऱ्या वाहनांची गर्दी होऊ नये यासाठी सुसज्ज अशी पार्किंग सुविधा, भाविकांसाठी प्रसाधनगृहे, पाण्याची व्यवस्था करावी. मुख्य प्रवेशव्दाराच्या ठिकाणी सुशोभीकरण करावे. मंदिर परिसरात सध्या मोठयाप्रमाणात विकासकामे सुरु आहेत. या कामांपैकी अंतिम टप्प्यात असलेली कामे जसे की, भोजनगृह, पालखी मार्ग, शॉपींग कॉम्प्लेक्स,  यात्री विसावा केंद्र, सभागृह यांची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत.  जी कामे अदयाप सुरु करण्यात आलेली नाहीत त्यांची टेंडर प्रक्रीया पूर्ण करुन कामाला सुरुवात करावी. सर्व कामांचा वेळोवेळी आढावा घेतला जाणार आहे, त्यामुळे विकास कामांमध्ये दिरंगाई करु नये.

            बैठकीत सुरुवातीला मंदिर आराखडयाबाबत सादरीकरण करण्यात आले. आराखडयातील मंजूर कामांच्या प्रगतीचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. यावेळी  केंद्र शासनाच्या पर्यटन विभागाच्या ‘प्रासाद’  या योजनेतंर्गत प्रस्तावित करावयाच्या  प्रारुप आराखडयावर चर्चा करण्यात आली. तसेच श्रीक्षेत्र राजुरेश्वर महागणपती मंदिर ‘अ’ वर्ग ग्रामीण तीर्थक्षेत्रामध्ये दर्जोन्नत करण्याबाबत  चर्चा करुन शासनाकडे प्रस्तावित करण्यासाठीही चर्चा झाली.

            बैठक सुरु होण्यापूर्वी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी मंदिर परिसरात सुरु असलेल्या विकासकामांची पाहणी केली. यामध्ये भोजनशाळा, पालखी मार्ग, शॉपींग कॉम्प्लेक्स,  यात्री विसावा केंद्र, मुख्य सभागृहाची  पाहणी करुन  प्रलंबित असणारी कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकारी व कंत्राटदारांना दिले.

            बैठकीस सर्व संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment