Monday 30 May 2022

पीएम केअर्स फॉर चिल्ड्रेन योजनेबाबत पंतप्रधानांचे ऑनलाईन मार्गदर्शन पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते ११ अनाथ बालकांना प्रमाणपत्र वाटप बालकांसोबत पालकमंत्री यांनी साधला दिलासादायक संवाद सर्वतोपरी सहकार्य करण्याचे दिली ग्वाही

 




 

            जालना, दि. 30 (जिमाका) ---  कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या देशभरातील अनाथ बालकांना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाईन उपस्थितीत पीएम केअर्स फॉर चिल्ड्रेन योजनेंतर्गत महत्वाच्या कागदपत्रांचे वाटप करण्यात आले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमास जिल्ह्यातील 11 अनाथ बालके यावेळी उपस्थित होते. त्यांना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते आरोग्य विमा कार्ड, टपाल खात्यात ठेवलेल्या रकमेचे पासबुक आणि पंतप्रधानांचे मुलांना संदेशपत्र अशा साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी पालकमंत्री यांनी बालकांसोबत दिलासादायक संवाद साधला.

            यावेळी आमदार बबनराव लोणीकर, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा परिषेदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती.आर.एन.चिमंद्रे यांच्यासह  महिला बाल कल्याण विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

            पंतप्रधानांनी यावेळी तुमच्या स्वप्नांच्या पंखांना बळ देण्यासाठी संपूर्ण देश तुमच्या सोबत आहे. पुस्तक हे तुमचे मार्गदर्शक असून साहसाने तुम्ही आयुष्यात येणारे अडथळे पार कराल. स्वत:वर विश्वास ठेवा. फिट इंडिया आणि खेलो इंडिया अभियानाशी जोडले जा. योगासनांना आपल्या जीवनात एक महत्वाच स्थान आहे ते करीत जा, असा संदेश बालकांना उद्देशून दिला. कोरोनामुळे जालना जिल्ह्यात दोन्ही पालक गमावलेल्या मुला-मुलींची संख्या 11 आहे. हे सर्व आज उपस्थित होते. त्यांना आरोग्य विमा कार्ड, टपाल खात्यात ठेव  ठेवलेल्या रकमेचे पासबुक आणि पंतप्रधानांचे शुभेच्छा पत्र अशा साहित्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

            पालकमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी बालकांसोबत आस्थेवाईपणे संवाद साधत त्यांच्या आरोग्य आणि शाळेच्या प्रवेशाबरोबरच  शिक्षणाविषयी मनमोकळा संवाद साधला, आपलेपणाच्या भावनाने जिल्हा प्रशासन आपल्याला सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे यावेळी सांगितले. तुम्ही  चांगला अभ्यास करा आणि विविध क्षेत्रात आपला नावलौकिक मिळवा, यासाठी मदतीसह आमच्या शुभेच्छा आहेत. चांगले नागरिक बनण्यासाठी शिक्षण पूर्ण करा. समाज आपल्या सोबत आहे. तुमच्या अडचणी सोडविण्यासाठी आम्ही सर्वजण आहोत, असा दिलासाही श्री. टोपे यांनी उपस्थित बालकांना दिला.

कोविड – 19 या महामारीमुळे ज्या बालकांच्या दोन्ही पालक / कायदेशीर पालक / दत्तक पालकांचे निधन होऊन अनाथ झालेल्या बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी अर्थसहाय्य उपलब्ध व्हावे यासाठी मा. पंतप्रधान यांनी पीएम केअर्स फॉर चिल्ड्रेन या योजनेची घोषणा दि. 29 मे 2021 रोजी केली. या योजनेचे उद्दीष्ट दि. 11 मार्च 2020 ते दि.28 फेब्रुवारी 2022 या कालावधीत कोविड – 19 च्या संसर्गामुळे ज्या बालकांनी त्यांचे दोन्ही पालक / कायदेशीर पालक / दत्तक पालक गमावले आहेत अशा बालकांना आधार देणे हे आहे.

            या योजनेचा उद्देश या बालकांची सर्व समावेशक काळजी व शाश्वत रीतीने संरक्षण सुनिश्चित करणे आणि आरोग्य विम्याद्वारे आरोग्य सक्षम करणे, त्यांना शिक्षणाद्वारे सक्षम करणे.तसेच त्यांना त्यांच्या वयाच्या 23 वर्षे पुर्ण झाल्यावर स्वयंपुर्ण अस्तित्वासाठी आर्थिक पाठबळ देणे हे आहेत.

            जालना जिल्हयात कोविड – 19 संसर्गामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची संख्या 11 आहे. सदर बालके या योजनेसाठी पात्र असुन त्यांना योजनेचा लाभ मिळवुन देणेसाठी खालीलप्रमाणे कार्यवाही पुर्ण झालेली आहे.

            Pmcaresforchildren.in या संकेतस्थळावर दोन्ही पालक गमावलेल्या एकूण 11 बालकांची नोंदणी करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर मा.बाल कल्याण समितीची यांस मंजुरी घेऊन मा.जिल्हाधिकारी यांची देखील सदर पोर्टलवर ऑनलाईन मान्यता घेण्यात आलेली आहे. सदर बालकांचे व मा.जिल्हाधिकारी यांचे संयुक्त खाते मुख्य पोस्ट कार्यालयात उघडण्यात आले आहे.

            पीएम केअर अंतर्गत बालक व मा.जिल्हाधिकारी यांचे संयुक्त पोस्ट खात्यात दोन्ही पालक गमावलेल्या सर्व 11 बालकांच्या त्यांच्या वयोगटानुसार रक्कम दि. 26 एप्रिल 2022 रोजी जमा झालेली आहे. त्याबाबतचे पासबुक, हेल्थ कार्ड, स्नेह पत्र, मा.पंतप्रधान यांचे बालकांना पत्र व सदर योजनेची माहितीपत्रिका असलेली कीट बालकांना पालकमंत्री यांच्या हस्ते आज  वितरीत करण्यात आली.

कार्यक्रमास जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गजानन इंगळे, बाल न्याय मंडळाचे सदस्य ॲड.अश्विनी धनावत व रामदास जगताप, अधिक्षक अमोल राठोड, आदींसह सचिन चव्हाण, विनोद दाभाडे,  सुरेखा सातपुते, प्रतिभा सुरडकर, रेणुका चव्हाण आदी कर्मचारी उपस्थित होते. 

-*-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment