Tuesday 24 May 2022

सुरक्षित व सुरळीत वाहतुकीसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात -- जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

 




जालना, दि. 24 (जिमाका) :- सुरक्षित व सुरळीत वाहतुकीसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, असे  निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले.  जालना शहरात रस्त्याच्याकडील असणारी  अतिक्रमणे काढण्याबरोबरच रस्त्यावर मोकाट जनावरांच्या संचाराला आळा घालणे,  वाहतुक सिग्नल, पार्किंग सुविधा उपलब्ध करुन देणे तसेच वर्दळीच्या ठिकाणी गतीरोधक टाकावेत. शहरातील मुख्य ठिकाणी सीसी टीव्ही कॅमेरे बसवावेत. वाहतुकीचे नियम मुलांना कळावेत यासाठी जालना शहरात ट्रॅफिक गार्डनची संकल्पना राबवावी, अशा सुचनाही त्यांनी केल्या.

जिल्हयातील वाहतुकीच्या समस्या व उपाययोजनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. राठोड बोलत होते. बैठकीस अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, शहर वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक जी.एस. शिंदे, ग्रामीण वाहतुक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक एस.बी.सानप, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे, मोटार वाहन निरीक्षक उदय सांळुखे, महामार्ग सुरक्षा पथकाचे  सहायक पोलीस निरीक्षक अभय दंडगव्हाळ, राष्ट्रीय महामार्गाचे उपअभियंता एस.बी. जैस्वाल, जालना नगर पालिकेचे मुख्याधिकारी नितीन नार्वेकर आदींसह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड म्हणाले की, शहरातील सार्वजनिक रस्त्यांवर बसणाऱ्या मोकाट जनावंरामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने नगर परिषदेने तातडीने कार्यवाही करावी. तसेच जालना शहरात अनेक ठिकाणी रस्त्यावर बेकायदेशीर अतिक्रमणे आहेत. या अतिक्रमणांमुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. शहरातील वाहतुक सुरळीत व्हावी यासाठी बेकायदेशीर असलेली अतिक्रमणे नगरपालिकेने पोलीस विभागाच्या सहकार्याने तातडीने हटवावीत. बंद सिग्नल सुरु करावेत. सिग्नल बसविण्यात आलेल्या ठिकाणी झेब्रा क्रॉसिंग, रोडच्यामध्ये रस्ता दुभाजकाचे पांढरे पट्टे यासह आवश्यक त्या बाबींसह हे सिग्नल सुरु राहतील, याची दक्षता घ्यावी.

शहरामध्ये पी१ पी२ पार्किंग व्यवस्था सुरु करावी. नो पार्किंग, नो एन्ट्री आदी साईन बोर्ड तातडीने उभारण्यात येऊन पी१ पी२ पार्किंगची कडक अंमलबजावणी होईल, यादृष्टीने नियोजन करण्याबरोबरच शहरामध्ये नो हॉकर्स झोन घोषित करुन जालना शहराच्या मुख्य चौकांमध्ये सीसीटीव्ही बसवावेत. शहरामध्ये अनाधिकृतपणे लावण्यात येणाऱे बॅनर, पोस्टर्स तातडीने काढुन टाकण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी केली.

जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, रिक्शाचालकांना  शिस्त लावावी. रिक्शा चालकांकडे गणवेश, बॅच आहेत का तसेच रिक्शाच्या आतील भागात रिक्शाच्या क्रमांकासह  अत्याआवश्यक संपर्क क्रमांक नोंदविलेले आहेत का, याची तपासणी करावी. विना परवाना रिक्शावर कार्यवाई  करावी.  देऊळगावराजा रस्त्यावरील उडडान पुलाच्या बाजुने असणाऱ्या सर्व्हीस रोडचे काम तातडीने पूर्ण करावे. मुलांना वाहतुकीचे नियम कळावेत, यासाठी  जालना शहरात  नगर पालिकेने  ट्रॅफिक गार्डनची  संकल्पना प्रत्यक्षात राबविण्याकरीता तातडीने कार्यवाही करावी, असे त्यांनी सांगितले.

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment