Wednesday 25 May 2022

पक्या पावतीशिवाय बियाणे व खताची खरेदी करू नका तक्रारीसाठी नियंत्रण कक्षाचा संपर्क क्रमांक 9823915234, टोल फ्री क्र. 18002334000

 


     जालना, दि. 25 (जिमाका) :- खरीप हंगामास लवकरच प्रारंभ होणार असून शेतकऱ्यांकडून      बी- बियाणे व खते खरेदी करण्यास सुरुवात झाली आहे. बियाणे, खते खरेदी करताना शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी परवानाधारक कृषी सेवा केंद्रातून खते, बियाणे व किटकनाशके खरेदीच्या वेळी रीतसर पक्की पावती घेऊनच खरेदी करावी, असे आवाहन कृषी विकास अधिकारी भिमराव रणदिवे यांनी केले आहे.

खरीप हंगामात बनावट बियाणे, खते व  औषधाची जादा दराने  विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी जिल्हास्तरावर कृषि विकास अधिकारी जिल्हा परिषद हे पथक प्रमुख व तालुकास्तरावर तालुका कृषि अधिकारी हे पथकप्रमुख असून असे एकूण नऊ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. भरारी पथक जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांवर अचानक भेटी देऊन कृषी सेवा केंद्राची तपासणी करणार आहेत. तपासणीच्या वेळी दुकानात बनावट कृषि निविष्ठा किंवा अनियमितता आढळून आल्यास कारवाई करणार आहे. असे श्री. रणदिवे यांनी सांगितले आहे.

शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि किटकनाशकेबाबत काही तक्रार असल्यास जिल्हास्तरावरील कृषि विकास अधिकारी यांचे कार्यालयतील नियंत्रण कक्षात दूरध्वनीद्वारे किंवा लेखी तक्रार करावी, जिल्हास्तरावरील नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक 9823915234 टोल फ्री क्र. 18002334000 हा आहे. तसेच प्रत्येक तालुका स्तरावर पंचायत समिती येथे कृषि विभागात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

      शेतकऱ्यांनी निविष्ठा खरेदीच्या वेळी काही तक्रार असल्यास ‍किंवा जादा दराने विक्री कृषी सेवा केंद्रचालकाकडून होत असल्यास त्वरित तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा पंचायत समितीच्या कृषी विभागात संपर्क करावा. कोणतेही बियाणे खते किंवा कीटकनाशके जादा दराने विक्री करताना आढळून आल्यास अशा कृषी सेवा केंद्र चालकावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल तसेच पॅकिंगवर नमूद वजनाइतके बियाणे किंवा खत आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी भरारी पथकात  वजन मापे निरीक्षकांचा समावेश असून वजनाची पथकाकडून तपासणी करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांनी बियाणे खते किंवा कीटकनाशक खरेदी करताना कृषी सेवा केंद्राचा नोंदणी क्रमांक असलेली पक्की पावतीघ्यावी. दुकानदाराकडून शेतकऱ्यांनी खरेदी करताना कच्ची पावती घेतल्यास वाढीव दराने बियाणे खरेदी केली असल्यास किंवा बियाणाची उगवण पेरणीनंतर कमी आल्यास याबाबतची शेतकऱ्यांना तक्रार करण्यास तसेच कृषी विभागास संबंधित बियाणे कंपनी किंवा कृषी केंद्रावर कारवाई करण्यास अडचणी येतात, त्यामुळे शेतकऱ्यांनी रीतसर खरेदीची पक्की पावती घेऊनच कृषी निविष्ठांची खरेदी करावी, असे आवाहनही कृषि विकास अधिकारी भीमराव रणदिवे व मोहिम अधिकारी अनिल कुलकर्णी यांनी केले आहे.

-*-*-*-*-*-*-

 

 

No comments:

Post a Comment