Monday 8 October 2018

संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने सज्ज रहावे - पालकमंत्री बबनराव लोणीकर यांचे निर्देश




जालना, दि. 08 –  जिल्ह्यात गेल्या 30 दिवसापासून पावसाचा खंड आहे. पावसाची अशीच परिस्थिती राहील्यास जिल्ह्यात दुष्काळसदृष्य परिस्थितीनिर्माण होण्याची शक्यता असल्याने संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहून हे काम मिशन मोडवर करण्याचे निर्देश राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले.
संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या बाबतीत करावयाच्या उपायोजनांबाबत आढावा बैठकीचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजन करण्यात आले होते.  त्याप्रंसगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री श्री लोणीकर बोलत होते.
            यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, उप विभागीय अधिकारी केशव नेटके, ब्रिजेश पाटील, उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय माईनकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, जिल्ह्यात गेल्या 30 दिवसापासून पावसाचा खंड आहे.  अशीच परिस्थिती राहिल्यास जिल्ह्याला मोठ्या संकटाचा सामना करावा लागणार आहे.  आजघडीला जिल्ह्यातील धरण, साठवण तलाव, लघु तलावातील पाण्याची पातळी अत्यंत खोल गेली आहे.  त्यामुळे संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा तसेच मजुरांच्या हाताला काम देण्यासाठी यंत्रणांनी आवश्यक त्या सर्व उपायोजना करण्यासाठी नियोजन करावे.  तालुकास्तरावर अधिकारी तसेच ग्रामस्तरावर काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बैठका घेऊन उपाययोजनांबाबत सुचना देण्यात याव्यात.
संभाव्य दुष्काळी परिस्थितीमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठ्यासाठी मागणीप्रमाणे पुरवठ्याचे नियोजन करण्यात यावे.  ज्या ठिकाणी पाण्याचे स्त्रोत उपलब्ध आहेत. अशा ठिकाणच्या विहिरी, बोअर आदी अधिग्रहित करण्यासाठी कार्यवाही करुन उपलब्ध पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करण्यात यावा.  संभाव्य दुष्काळी परिस्थितीमध्ये मजुरांचे स्थलांतर रोखण्यासाठी मजुरांच्या हाताला त्यांच्याच गावात काम मिळण्यासाठी रोजगार हमी योजनेची कामे मोठ्या प्रमाणात मंजुर करुन घेण्यात यावीत.  रोजगार हमी योजनेंतर्गत 11 कलमी कार्यक्रम राबविण्यात येत असुन हा कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याचे नियोजन करण्यात यावे.  सर्व यंत्रणांनी रोहयोची अधिकाधिक कामे सुरु करण्याच्यादृष्टीने आवश्यक त्या सर्व कार्यवाही करण्याच्या सुचनाही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी दिल्या.
जिल्ह्याची नजर आणेवारी जाहीर करण्यात आलेली असुन अंतिम आणेवारी करण्यासाठी पीक कापणी प्रयोग अत्यंत महत्वाचा आहे.  हा प्रयोग करत असताना शासनाच्या निर्देशानुसार करण्याचे निर्देश देत जालना जिल्ह्याने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, बोंडअळी अनुदान वाटप, पीकविमा वाटप यासारख्या बाबींमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने काम केले आहे.  संभाव्य दुष्काळी परिस्थिती उदभवल्यास यामध्येसुद्धा जिल्ह्याने अत्यंत नियोजनबद्धरित्या काम करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याच्या सुचनाही पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी यावेळी दिल्या.
                       जिल्हाधिकारी श्री बिनवडे म्हणाले की,  जिल्ह्याची 50 टक्क्यापेक्षा कमी नजर आणेवारी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.  अंतिम आणेवारी डिसेंबरपर्यंत जाहीर करावयाची असल्याने सर्व यंत्रणांनी गतीने काम करण्याच्या सुचना करत  जलयुक्त शिवार अभियानाची कामे याच कालावधीत चांगल्या पद्धतीने होऊ शकणार असल्याने ती हाती घेण्यात यावीत.  तसेच बोअर, विहिर अधिग्रहण तसेच टँकरद्वारे पाणी पुरवठ्यासाठीची सर्व कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याबरोबरच मजुरांच्या हाताला काम मिळण्यासाठी रोहयोच्या कामांचे तातडीने नियोजन करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.
बैठकीस सर्व उप विभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
***

No comments:

Post a Comment