Friday 26 October 2018

जलमित्र पुरस्कारांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते वितरण जलयुक्त शिवार अभियानात समाजातील प्रत्येकाने हिरिरीने सहभाग नोंदवावा - पालकमंत्री बबनराव लोणीकर



            जालना, दि. 26 –  गत चार वर्षापासून जिल्ह्यात शाश्वत पाणी साठे निर्मितीवर भर देऊन जलयुक्त शिवार अभियानाची दर्जेदार अशी कामे करण्यात आली असुन येणाऱ्या काळातही जलयुक्त शिवार अभियानात समाजातील सर्व संस्था, पदाधिकारी, अधिकारी व नागरिकांनी हिरिरीने सहभाग नोंदवावा, असे आवाहन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.
            जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन 2015-16 या वर्षात उत्कृष्ट काम करणाऱ्या गाव, तालुका, पत्रकार, अधिकारी व कर्मचाऱ्यांना जलमित्र पुरस्कार पालकमंत्री यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात देण्यात आला.  त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री श्री लोणीकर बोलत होते.
            व्यासपीठावर आमदार नारायण कुचे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, महाजन ट्रस्टच्या नुतन देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे, भगवान म्हात्रे, निवृत्ती डाके पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय माईनकर आदींची उपस्थिती होती.
            पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, गेल्या चार वर्षात जिल्ह्यात 400 कोटी रुपये खर्चून जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातुन जलसंधारणाची दर्जेदार अशी कामे करण्यात आली आहेत. या कामात शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांबरोबरच सेवाभावी संस्था, नागरिक, माध्यमे यांचाही मोठा वाटा राहिला आहे.  जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातुन करण्यात आलेल्या कामामुळे 43 हजार 662 टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला असल्याचे सांगत या अभियानात ज्यांनी उत्कृष्ट कार्य केले अशांचा सत्कार करण्यात आला असुन त्यांची प्रेरणा घेऊन या कामात अधिकाधिक सहभाग वाढावा हे काम अधिक चांगल्या पद्धतीने व्हावे हा यामागचा उद्देश असल्याचे सांगत सर्व सत्कारमुर्तींचे अभिनंदन करत माध्यमांनी या योजनेस चांगल्याप्रकारे प्रसिद्धी दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदनही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी केले.
            राज्यात शंभर दिवस पडणाऱ्या पावसाचे प्रमाण शंभर तासावर आले असुन या परिस्थितीला निसर्गाला दोष देऊन चालणार नाही तर यासाठी आपणच कारणीभूत आहोत.             वाढते प्रदुषण तसेच वृक्षांची होणारी कत्तल या परिस्थितीला कारणीभूत आहे.  पाऊस पाडण्यासाठी कारणीभुत असलेल्या 51 प्रजातींची झाडे लावण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत असुन शासनाने वृक्ष लागवडीवर भर दिला असुन जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींना जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातुन मोफत रोपांचा पुरवठा करण्यात आला असुन ही वृक्षे जगवण्यासाठी ग्रामपंचायतींनी पुढाकार घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
            काकडासारख्या डोंगराळ भाग असलेल्या गावात अधिकाऱ्यांच्या पुढाकारातून पाणी साठवण्याचे मोठे काम करण्यात आले असल्याचे सांगत या गावात असलेल्या दगडांच्या खदानीमध्ये डोंगराचे पाणी वळवुन पाण्याचा संचय करण्यात आला.  या गावात आजही पाणी साठलेले असल्याचे सांगत अधिकाऱ्यांनी अशा प्रकारच्या नाविन्यपुर्ण कल्पना राबविण्याची गरज असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
            बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपोटी शासनाने 275 कोटी 37 एवढा निधी मंजूर केला असुन त्यापैकी 186 कोटी एवढा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला होता.  आणखीन 90 कोटी रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला असुन तो लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
            आमदार नारायण कुचे म्हणाले की, शाश्वत पाणीसाठे निर्मितीसाठी शासनाने जलयुक्त शिवार अभियान राबविण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाचे काम अत्यंत चांगल्या पद्धतीने करण्यात आले असुन येणाऱ्या काळातही या अभियानाचे काम अधिक चांगल्या पद्धतीने व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
            जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर म्हणाले की, जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाची कामे सर्व गावातून करण्यात यावीत.  तसेच जिल्ह्यातील दुष्काळसदृष्य परिस्थतीचा मुकाबला करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाच्या बरोबरीने काम करण्यासाठी सज्ज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
            जिल्हाधिकारी श्री बिनवडे म्हणाले की, जलयुक्त शिवार अभियान हा शासनाचा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प आहे.  सर्व विभागांनी एकत्रितपणे येऊन या अभियानाच्या माध्यमातुन दर्जेदार अशी कामे केली आहेत.  अभियानाच्या सुरुवातीच्या काळात या योजनेस पाहिजे त्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला नाही परंतू या अभियानात कामे झाल्यानंतर व त्याचे दृष्य परिणाम ज्या वेळेस दिसु लागली त्या वेळेस प्रत्येक गावाला याचे महत्व पटुन आपल्या गावात जलयुक्तची कामे करण्यासाठी गावकऱ्यांनी पुढाकार घेतला.  गतवर्षीप्रमाणेच यावर्षीसुद्धा जलयुक्त शिवार अभियानाची कामे चांगल्या पद्धतीने व्हावी यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगत माध्यमांनी या अभियानास चांगली प्रसिद्धी दिल्याबद्दल त्यांचे आभारही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केले.
तालुका, गावे,पत्रकार व अधिकारी, कर्मचाऱ्यांना पुरस्कार
            जलयुक्त शिवार अभियानामध्ये सन 2015-16 मध्ये जालना तालुक्यास प्रथम क्रमांकाचे पाच लक्ष रुपयांचे बक्षिस देण्यात आले. मंठा तालुक्यातील किनखेडा हे गाव प्रथम आले. द्वितीय पुरस्कार जालना तालुक्यातील सामनगावला जाहीर करण्यात आला तर तृतीय पुरस्कार अंबड तालुक्यातील दुनगावाला देण्यात आला. चौथ्या क्रमांकाचे बक्षिस बदनापुर तालुक्यातील म्हात्रेवाडीस तर पाचव्या क्रमांकाचे बक्षिस घनसावंगी तालुक्यातील गुरुपिंप्रीस देण्यात आले.
            जलयुक्त शिवार अभियानामध्ये उत्कृष्ट लिखाण करणाऱ्या विभाग व जिल्हास्तरावरील पहिला क्रमांकाचा पुरस्कार बाबासाहेब शेषराव डोंगरे यांना देण्यात आला तर द्वितीय पुरस्कार दिव्य मराठीचे शहर प्रतिनिधी बाबासाहेब लाला डोंगरे यांना तर तृतीय क्रमांकाचा पुरस्कार दै. आनंदनगरीचे विशेष प्रतिनिधी सतीष पाटेकर यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  जलयुक्त शिवार अभियानात उत्‍कृष्ट काम केल्याबद्दल मंठा येथील कृषि सहाय्यक आर.आर. आघाव यांना पुरस्कार देण्यात आला. जलसंधारण अधिकारी श्री डोणगावकर यांनी या अभियानात उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल पालकमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कारही यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय माईनकर यांनी केले.
            कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी, पत्रकार यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
-*-*-*-*-*-


No comments:

Post a Comment