Monday 15 October 2018

टंचाईसदृष्य परिस्थितीचा उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी घेतला आढावा


जालना, दि. 15 - जिल्ह्याच्या जालना व अंबड तालुक्यातील पीक परिस्थितीची पहाणी करुन टंचाईसदृष्य परिस्थितीचा राज्याचे उद्योग व खनिकर्म मंत्री सुभाष देसाई यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात प्रशासनातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला.
यावेळी जिल्हाधिकारी  रवींद्र बिनवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, उप विभागीय अधिकारी केशव नेटके, तहसिलदार बिपीन पाटील, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विजय माईनकर यांच्यासह सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.
उद्योगमंत्री श्री देसाई म्हणाले की, जिल्हयाच्या जालना व अंबड तालुक्यातील पीक परिस्थितीची नुकतीच पहाणी केली असुन कापूस, तुर, सोयाबीन पीके पाण्याअभावी नष्ट झाल्याचे चित्र आहे.  अशा परिस्थितीमध्ये मजुरांच्या हाताला काम देणे अत्यंत आवश्यक आहे.  मजुरांचे स्थलांतर होणार नाही यासाठी रोजगार हमी योजनेच्या कामांचा विस्तार वाढवुन या माध्यमातुन जलसंधारणाची अधिकाधिक कामे हाती घेण्यात यावीत.  मागेल त्याला शेततळे ही अत्यंत प्रभावी योजना असुन शेततळे देतांना शेतकऱ्यांना प्लास्टीकसाठीही अनुदान मिळण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात यावेत.  पीकविमा तसेच बोंडअळी अनुदान मिळण्यामध्ये शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असुन बँका शेतकऱ्यांकडील कर्जाचा वसुलीसाठीही तगादा लावत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत.  पाऊस नसल्याने परिस्थिती गंभीर बनत चालली असुन शेतकऱ्यांची अडवणुक होणार नाही यासाठी जिल्ह्यातील बँक अधिकाऱ्यांची  तातडीने बैठक घेऊन माहिती देण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
जिल्ह्यात असलेले पाण्याचे उदभव राखून ठेवण्याबरोबरच पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी गावागावात पाणी साठवण टाक्यांची उभारणी करण्यात यावी.  तसेच जनावरांसाठीच्या चाऱ्याचाही प्रश्न भेडसावणार असुन यासाठीही आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश उद्योगमंत्री श्री देसाई यांनी यावेळी दिले.
जलधोरणामध्ये पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्यात आले आहे.  परंतू रोजगाराच्या दृष्टीकोनातुन उद्योग बंद होऊ नयेत यासाठी उद्योगालाही पाणी देणे तितकेच महत्वाचे असुन समन्यायी पाण्याचे वाटप होणे गरजेचे आहे.  यासाठी एमआयडीसी अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक आयोजित करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी जिल्ह्याच्या परिस्थितीची माहिती पॉवर पॉईंटच्या माध्यमातुन मंत्री महोदयांना दिली.
*******



No comments:

Post a Comment