Thursday 4 October 2018

विविध विकास कामांचा राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी घेतला आढावा विकासकामे जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश





          जालना, दि. 4 – विविध विकास योजनांसाठी शासनामार्फत मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात येतो. या निधीचा विनियोग विहित वेळेत करण्यात यावा.  त्याचबरोबर अपूर्ण असलेल्या योजनांची कामे जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी दिले.
          जिल्हा परिषदेच्या सभागृहात विविध विकास कामांचा आढावा राज्यमंत्री श्री भुसे यांनी जिल्हा परिषदेच्या सर्व शाखा प्रमुखांकडून घेतला. त्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
          यावेळी पदुम राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, उपाध्यक्ष सतीष टोपे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्पसंचालक सुरेश बेदमुथा आदींची प्रमुख उपस्थिती होती.
          राज्यमंत्री श्री भुसे यांनी जिल्हा परिषदेच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या आढावा घेताना म्हणाले की, प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातुन समाजातील प्रत्येक बेघर व्यक्तीला त्याच्या स्वत:च्या हक्काचे व स्वप्नातील घरकुल उपलब्ध करुन देण्यात येत असुन 2011 च्या आर्थिक सर्वेक्षणामध्ये अनेक कुटूंबांच्या नावाचा समावेश झालेला नाही.  ज्यांची नावे या यादीमध्ये आलेले नसतील अशा कुटूंबांकडून नमुना ड भरुन घेण्यात यावेत. ही प्रक्रिया येत्या 15 तारखेपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
          जालना जिल्ह्यात एमएसआरएलएम अंतर्गत 13 हजार 386 बचतगट कार्यरत आहेत. बचतगटांचे बँकेत खाते उघडल्याशिवाय त्यांना विविध उद्योग सुरु करण्यासाठी निधी पुरवठ्यामध्ये अडचणी येतात. जिल्ह्यात 996 बचतगटांचे बँकखाते अद्याप उघडले नसुन बँक अधिकाऱ्यांनी या गटांचे खाते तातडीने उघडण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
          सध्या जिल्ह्यात पाऊस नाही.  परतीचा पाऊसही नाही पडल्यास मोठ्या संकटाचा सामना करावा लागणार आहे.  या पार्श्वभूमीवर पाणी पुरवठ्याच्या ज्या योजना अपुर्ण आहेत त्या तातडीने पुर्ण करण्याचे निर्देश देत कामात हयगय अथवा दिरंगाई करणाऱ्याविरुद्ध कडक कारवाई करण्याचा इशाराही राज्यमंत्री श्री भुसे यांनी यावेळी  दिला.
          यावेळी प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, आपले सरकार केंद्र, स्वच्छतागृह, जलयुक्त शिवार अभियान, ग्रामीण पाणी पुरवठा, ग्रामीण रस्ते, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, अस्मिता योजना, जनसुविधा योजना, महिला व बालकल्याण विभागाच्या योजना, आरोग्य सुविधा यासह विविध योजनांचा सविस्तर आढावाही राज्यमंत्री श्री भुसे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांकडून घेतला.
          यावेळी राज्यमंत्री श्री खोतकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर यांनीही विकास कामे जलगदतीने करण्याच्या सुचना उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.
          बैठकीस जिल्हा परिषदेमधील सर्व विभागांचे पदाधिकारी तसेच सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
*******
         
           


No comments:

Post a Comment