Sunday 7 October 2018

शासनाच्या योजना तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी "युवा माहिती दूत" उपक्रमात विद्यार्थ्यांनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे - डॉ.जे.डी. काबरा




जालना, दि. 6 – शासन सर्वसामान्यांसाठी अनेकविध कल्याणकारी योजना राबविते.  या योजनांचा लाभ तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी "युवा माहिती दूत" या उपक्रमात अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जेईएस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे.डी.काबरा यांनी केले. महाराष्ट्र शासनाचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, युनिसेफ व राष्ट्रीय सेवा योजनेच्या संयुक्त विद्यमाने जालना येथील जेईएस महाविद्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय "युवा माहिती दूत" कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत डॉ. काबरा बोलत होते.
व्यासपीठावर जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलूरकर, राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. सोमीनाथ खाडे, प्रा. डॉ. भगवानसिंग डोभाळ आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी डॉ. काबरा म्हणाले की, शासन सर्वसामान्यांसाठी अनेकविध कल्याणकारी योजना राबवित आहे.  शासनाच्या योजनांची माहिती नसल्याने याचा लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही.  सर्वसामान्यांना शासनाच्या योजनांची माहिती होऊन त्याचा लाभ मिळावा या उद्देशान युवा माहिती दूत उपक्रम राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी राष्ट्रीय सेवा योजना 1969 पासून कार्यरत असुन ग्रामीण भागाचा सर्वसमावेशक विकास होण्यासाठी विद्यार्थ्यांनी अधिकाधिक संख्येने युवा माहिती दूत उपक्रमात सहभागी होण्याचे आावाहनही डॉ. काबरा यांनी यावेळी केले. जिल्हा समन्वयक  डॉ. सोमीनाथ खाडे यांनी प्रास्ताविकात युवा माहिती दूत उपक्रमाची माहिती देताना म्हणाले की, समाजातील गोरगरीबांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्यासाठी हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असुन समाजाचे आपले काही देणे लागते या भावनेतुन विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपक्रमात सहभाग नोंदविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलूरकर यांनी सादरीकरणाद्वारे "युवा माहिती दूत" या उपक्रमाविषयी तपशीलवार विवेचन केले. यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने तयार केलेल्या तीन चित्रफितीद्वारे उपक्रमाची माहिती देण्यात आली. यावेळी प्राध्यापकांनी उपस्थित केलेल्या शंकाचे निरसन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भोकरदन येथील मोरेश्वर महाविद्यालयाचे प्रा. डॉ. गोवर्धन मुळूक यांनी केले तर आभार लालबहादुर शास्त्री महाविद्यालयातीचे प्रा. राम खालापुरे यांनी मानले.  यावेळी सहभागी कार्यक्रम अधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजनाचे कार्यक्रम अधिकारी, प्राध्यापक तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते.
-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment