Monday 15 October 2018

जालना व अंबड तालुक्यातील पीक परिस्थितीची उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडून पहाणी


जालना, दि. 15 –  राज्याचे उद्योग, खनिकर्म मंत्री सुभाष देसाई यांनी आज दि. 15 ऑक्टोबर रोजी जालना व अंबड तालुक्यातील आंतरवाला, गोलापांगरी, शेवगा व लालवाडी या गावांना भेटी देऊन तेथील शेतपिकांची पहाणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधुन झालेल्या नुकसानीची माहिती घेतली.
यावेळी भास्कर आंबेकर, माजी आमदार संतोष सांबरे, लक्ष्मण वडले, शिवाजी चोथे, ए.जे. बोराडे, पांडूरंग डोंगरे, संतोष मोहिते, बाबा मोरे, भाऊसाहेब पाऊल बुधे, बाबासाहेब इंगळे, बप्पासाहेब गोल्डे, राजेंद्र भोसले, अशोक गरडे हनुमान धोंडे, भाऊसाहेब घुगे, उप विभागीय अधिकारी केशव नेटके, तहसिलदार बिपीन पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय माईनकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
उद्योग मंत्री श्री देसाई यांनी सर्वप्रथम जालना तालुक्यातील आंतरवाला येथील शेतकरी लिलाबाई बुचाटे यांच्या शेतीस भेट देऊन त्यांच्या शेतातील कापूस पिकाची पहाणी केली. त्यानंतर याच गावातील शेतकरी लिंबाजी दगडूजी जाधव व राधाबाई उबाळे यांच्या शेतीस भेट देत कापूस व तुर या पिकांची पहाणी करुन झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. गोलापांगरी येथील शेतकरी सिताराम कावळे यांच्या शेतातील कापूस या पिकाची पहाणी केली. अंबड तालुक्यातील शेवगा या गावातील शेतकरी अशोक सराळे व लालवाडी येथील शेतकरी राधाबाई किसन बघाटे यांच्या शेतातील कापूस व तुर पीकांची पाहणी  करुन झालेल्या नुकसानीची माहिती घेत बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेऊन नुकसानीच्या भरपाईची रक्कम मिळाली काय याबाबत विचारणा केली.  तसेच स्वस्तधान्य दुकानामार्फत मिळणारे धान्य, शेतीसाठीची पाणी उपलब्धता याबाबत माहिती घेऊन शासनाकडून काय मागणी आहे याबाबत शेतकऱ्यांशी संवाद साधुन उद्योगमंत्री श्री देसाई यांनी माहिती जाणुन घेतली.
यावेळी बोलताना उद्योगमंत्री श्री देसाई म्हणाले की, पाणी नसल्यामुळे कापुस, तूर, सोयाबीन ही पीके संपूर्णपणे नष्ट झाल्याचे पहावयास मिळाले.  आजघडीला या पीकांच्या लागवडीसाठी झालेला खर्चही निघेल का नाही अशी परिस्थिती आहे.  मराठवाड्यातील तालुक्यांमध्ये अशा प्रकारचे पाहणी दौरे आयोजित करण्यात आले असुन या परिस्थितीची माहिती मंत्री मंडळाच्या बैठकीत मांडण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याचा प्रस्ताव मांडण्यात येणार असुन स्वस्तधान्य दुकानांमार्फत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या धान्यामध्ये वाढ करुन अधिकचे धान्य उपलब्ध करुन देण्याबाबतचा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे.  बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या ज्या शेतकऱ्यांना अद्यापही नुकसान भरपाई मिळालेली नाही ते तातडीने उपलब्ध करुन देण्याबरोबरच ज्या अधिकाऱ्यांनी या कामात हयगय केली असेल त्यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव मांडण्यात येणार असल्याचेही उद्योगमंत्री            श्री देसाई यांनी यावेळी सांगितले.
*******    




No comments:

Post a Comment