Sunday 28 October 2018

रस्त्यांची कामे अत्यंत उत्कृष्ठ करणार : अर्जुनराव खोतकर अग्रसेन चौक ते विशाल कॉर्नर रस्त्यासह वळणरस्त्यांच्या कामास प्रारंभ




जालना दि.28 - अग्रसेन चौक ते विशाल कॉर्नर या सिमेंटच्या रस्त्यासह शहराला आकार देणाऱ्या चहूबाजूच्या वळण रस्त्यांचे काम इतके उत्कृष्ट केले जाईल की, 25 वर्षे रस्ते खराबच होणार नाहीत, तसेच लोखंडी पुलाजवळ आणखी एक पूल आणि रामतीर्थ स्मशानभूमीजवळ नवीन पूल उभारला जाईल असे राज्यममंत्री अर्जुन खोतकर यांनी जाहिर केले.
 अग्रसेन चौक ते विशाल कॉर्नर, मंठा चौफुली ते कन्हैयानगर चौफुली आणि जालना ते सिंदखेड राजा चौक या 11 कोटी 60 लक्ष रूपये खर्चाच्या रस्त्यांचे शुभारंभ प्रसंगी राज्यमंत्री खोतकर बोलत होते. व्यासपीठावर भास्करराव अंबेकर, माजी आमदार संतोष सांबरे, उद्योजक किशोर अग्रवाल, अरूण अग्रवाल, कैलास लोया, अर्जुन गेही, भानुदास घुगे, किशोर टेकवानी, पंडिराव भुतेकर, प.स.चे सभापती पांडूरंग डोंगरे, सुखदेव बजाज, अभिमन्यू खोतकर, आत्मानंद भक्‍त, डॉ.सचदेव, सविता किवंडे,  संतोष मोहिते, दिनेश भगत, गोपाल काबलिये आदी उपस्थित होते.
राज्यमंत्री खोतकर म्हणाले की, सार्वजनिक जीवनात वावरताना एखादी महत्वाची मागणी आमच्या हातून पूर्ण झाली तर तो आमच्यासाठी आनंदाचा क्षण असतो. अग्रसेन चौक ते विशाल कॉर्नर (औरंगाबाद चौफुली) हा रस्ता अत्यंत खराब झालेला आहे. या रस्त्याचे काम सर्वप्रथम सुरू करावे, अशी शहरातील नागरिकांसह येथील उद्योजकांची मागणी होती. आज तो दिवस उजाडला असून साडे सहा कोटी रूपये खर्चून या रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण केले जाणार आहे. रामतीर्थ स्मशानभूमीसमोर आधीच्या पुलानजीक 5 कोटी रूपये खर्चून नवीन पूल केला जाणार आहे. 20 वर्षापूर्वी जालना शहराला गोलाकार वळण रस्ता माझ्याच काळात झाला आहे. असा शहराभोवती गोलाकार रस्ता औरंगाबाद, बीड वा लातूरलाही होऊ शकला नाही, या वळण रस्त्यावर तीन रेल्वेपूल उभारले आहेत. मात्र, शहरात प्रवेश करणारे रस्तेच खराब होते. ही गोष्ट खरी आहे की, प्रवासातून जालन्यात पोहोचलो, हे वाहनाच्या खडखड धडधडीतून आपोआप समजत होते, पण आता हा रस्ता अत्यंत उत्कृष्ट आणि गुळगुळीत केला जाणार आहे. संबंधित ठेकेदार अथवा अभियंत्यांना कुणी त्रास दिल्यास त्याची आपण गय करणार नाही. शहराच्या चहूबाजूचे रस्ते दर्जेदारच होतील, अशी ग्वाही खोतकर यांनी दिली.
          जालना बसस्थानकाचे काम परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या सहकार्याने आपण हाती घेतले  असून वर्षभरात बसस्थानकाचे रुप बदलून टाकू व अत्यंत आधुनिक बसस्थानक म्हणून जालन्याचा नामोल्‍लेख करावा लागेल. मी आमदार आणि अंबेकर नगराध्यक्ष असतानाच जालना ते जायकवाडी पाणीपुरवठा योजना पूर्ण होऊ शकली. न्यायालयात व्यक्‍तीश: गेलो तेव्हाच या योजनेसाठी 50 कोटीचा पहिला हप्‍ता मिळाला होता, याची आठवण खोतकर यांनी करून दिली. संभाजी उद्यान, पोहण्याचा तलाव, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह, नवीन रस्ते आणि पूल शिवसेनेच्याच काळातील आहेत. लवकरच मोती तलावात 15 कोटी रूपये खर्चून भगवान गौतम बुध्दांचा पुतळा बसविला जाणार आहे. दिवंगत पत्रकार राजेंद्र तिरूखे यांचे या रस्त्यास नाव देण्यासंबंधी नगरसेवकांना सांगितले जाईल. आमचा ‘व्हीजन’ विकासाचाच असल्याचे यावेळी खोतकर यांनी स्पष्ट केले.
           भास्करराव अंबेकर म्हणाले की, खराब रस्ते ही जालन्याची ओळख झाली आहे. जालन्याजवळ बस आली आणि ‘धडधड’ सुरू झाली की, जालना आले, हे लोक ओळखत होते. पण आता राज्यमंत्री खोतकर यांनी चहूबाजूचे रस्त्यांचे काम हाती घेतल्याने ही खराब रस्त्यांची ओळख मिटणार आहे. आपण नगराध्यक्ष असताना या शहरातील विविध विकासकामे झाली आहेत. जायकवाडीची योजना आम्ही केली नसती तर आज दुष्काळात जालन्याची स्थिती भयानक असती. राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या नेतृत्वाखाली शहरातील विकासकामे झाल्याचे सांगून त्यांनी  राज्यमंत्री खोतकर कौतुक केले.
           यावेळी संतोष सांबरे, किशोर अग्रवाल यांची भाषणे झाली. शहरातील काही प्रतिष्ठीत उद्योजक, नागरिक आणि कार्यकर्त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. संचलन आशिष रसाळ यांनी तर आभार गणेश घुगे यांनी मानले. यावेळी गोपी गोगडे, हरेश तलरेजा, योगेश रत्नपारखे, कार्यकारी अभियंता चांडक, उपअभियंता नागरे, राजू सलामपुरे, दुर्गेश कोठाठीवाले, मुरली काकड, विजय केलानी, काकडे पाटील, शेळके, भारत कौसुंदल आदी उपस्थित होते.
            खोतकर म्हणाले की, शहरातील अवाजवी मालमत्ता करासंबंधी जिल्हाधिकारी यांना बैठक लावण्यास आली सांगितले आहे, जालना शहरात  दि.19 ते 23 डिसेंबर दरम्यान त महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होणार असल्याचेही राज्यमंत्री खोतकर यांनी सांगितले.


No comments:

Post a Comment