Monday 22 October 2018

जिल्ह्यातील वाडी,वस्ती, तांडे व गावांमध्ये पक्क्या व मजबुत रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यावर भर टंचाईसदृष्य परिस्थितीमध्ये शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे पालकमंत्री बबनराव लोणीकर



  जालना, दि. 22 –  देशाच्या विकासामध्ये रस्त्याची फार मोठी मोलाची भूमिका असुन दळणवळण अधिक सुलभ व जलदगतीने होण्यासाठी जिल्ह्यातील वाडी,वस्ती, तांडे व गावांमध्ये पक्क्या व मजबुत रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे. तसेच जिल्ह्यात अनेक दिवसापासून पावसाचा खंड असल्याने जिल्ह्यातील पीक परिस्थितीची पहाणी करण्यात येत असुन टंचाईसदृष्य परिस्थितीमध्ये शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.
            मौजे पाटोदा ता. परतूर येथे दैठणा-येणोरा-पाटोदा रस्त्याच्या कामाचे भूमिपुजन तसेच पाटोदा येथील स्मशानभूमीच्या कामाचे भुमिपुजन पालकमंत्री श्री लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आले . त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राहूल लोणीकर, प्रभाकर कुलकर्णी, रामेश्वर तनपुरे बद्रीभाऊ ढवळे, तुळशीराम खवल, ह.भ.प. वाघ महाराज, अंकुशराव नवल, गणेशराव खवले, रमेशवराव आढाव, नितीन जोगदंड, शिवाजी पाईकराव, संपत टकले, उप विभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, तहसिलदार श्री कदम आदींची उपस्थिती होती. 
पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, या भागात मजबुत व पक्का रस्ता व्हावा ही गावकऱ्यांची अनेक वर्षापासूनची मागणी होती.  गावकऱ्यांना दिलेल्या शब्दाची वचनपुर्ती आज या निमित्ताने होत असुन दैठणा-येणोरा-पाटोदा या रस्त्याच्या कामासाठी 2 कोटी 52 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असुन या रस्त्यामुळे परिसरातील नागरिकांची मोठी सोय होणार असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्यात पावसाचा अनेक दिवसापासून खंड असल्याने शेतीअर्थव्यवस्था तोट्यात आली आहे. पाऊस नसल्याने जिल्ह्यातील टंचाईसदृष्य परिस्थितीची पहाणी करुन अहवाल सादर करण्यात येणार आहे.  जिल्ह्यातील आठही तालुक्यातील पीक परिस्थितीची आपण पहाणी केली असुन अनेक दिवसापासून पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतपीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र आहे. या परिस्थितीचा खंबीरपणे मुकाबला करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रशासनामार्फत नियोजन करण्यात येत आहे. गावपातळीवर काम करणारे तलाठी, ग्रामसेवक व कृषि सहाय्यक यांचा शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यामध्ये मोठा वाटा असतो.  पीकविमा असो वा दुष्काळी परिस्थिती अशा परिस्थितीत झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवुन देण्यासाठी प्रत्येक गावात तसेच मंडळामध्ये पीककापणी प्रयोग करण्यात येतात.  पीककापणी प्रयोग करुन त्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर करुन शासनाकडे पाठविण्यात येतो. त्यानुसार शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम ठरविण्यात येते. त्यामुळे गावपातळीवर काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पीककापणी प्रयोग वस्तुनिष्ठ व शासनाच्या निकषानुसार करुन शेतकऱ्यांना न्याय मिळेल तसेच त्यांना अधिकाधिक भरपाई कशा पद्धतीने देता येईल, यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश देत पूर्वी पन्नास टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झाल्यास भरपाई देण्यात येत होती परंतू केंद्र शासनाने यामध्ये बदल करुन 33 टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना भरपाई देण्याचा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.   पुढे बोलताना पालकमंत्री म्हणाले की, ज्या ठिकाणी पाण्याचे स्त्रोत उपलब्ध आहेत अशी ठिकाणचे पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्याबरोबरच ज्या गावात पाण्याचे साठे उपलब्ध नाहीत अशा ठिकाणी मागेल त्याला टँकरद्वारे पाणी पुरवठ्याचे नियेाजनाबरोबरच मजुरांचा हाताला काम नसल्याने त्यांचे होणारे स्थलांतर रोखण्यासाठी मागेल त्याला काम उपलब्ध करुन देण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मजुरांना कामे उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 
            176 गावांना वॉटरग्रीडच्या माध्यमातून शुद्ध व स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी 234 कोटी रुपयांची योजना साकारली जात आहे.  त्याचबरोबरच मतदासंघातील 92 नवीन गावांचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आला असुन यासाठी 125 कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. येत्या वर्षभराच्या कालावधीत ही योजना पूर्ण करुन जालना, परतूर व मंठा तालुक्यातील गावांना शुद्ध व स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री श्री.लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातुन जलसंधारणाची विविध दर्जेदार अशी कामे करण्यात आली आहेत.  परंतू पाऊसच नसल्याने अभियानाच्या माध्यमातुन झालेल्या कामात हव्या त्या प्रमाणात पाण्याचा संचय झाला नसल्याचे सांगत येणाऱ्या काळात जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्यास निश्चितच मोठ्या प्रमाणात पाण्याचा संचय होईल, असा विश्वासही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी व्यक्त केला. 
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राहुल लोणीकर यांचीही मनोगत व्यक्त केले.  कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कार्यकारी अभियंता श्री सोनलकर यांनी रस्त्याच्या कामांविषयी माहिती दिली. 
कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
*******



No comments:

Post a Comment