Sunday 21 October 2018

भोकरदन व जाफ्राबाद तालुक्यातील पीक परिस्थितीची पालकमंत्र्यांकडून पहाणी शेतकऱ्यांना मदतीसाठी पदाधिकाऱ्यांनी उपाययोजनेच्या नियोजनात सहकार्य करा कामात हयगय अथवा दिरंगाई करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्याविरुद्ध कडक कारवाई - पालकमंत्री बबनराव लोणीकर



  जालना, दि. 21 –  जिल्ह्यात पावसाचा अनेक दिवसापासून खंड असल्याने शेतीअर्थव्यवस्था तोट्यात आली आहे. पाऊस नसल्याने जिल्ह्यातील टंचाईसदृष्य परिस्थितीची पहाणी करुन अहवाल सादर करण्यात येणार असुन अशा परिस्थितीमध्ये सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे येऊन शेतकऱ्यांना मदतीसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांच्या कामी सहकार्य करण्याचे आवाहन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले. 
भोकरदन व जाफ्राबाद तालुक्यातील टंचाईसदृष्य परिस्थितीची पहाणी करुन करावयाच्या उपायोजनांबाबत भोकरदन येथील नगर परिषद मंगल कार्यालयात  नियोजनाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  त्याप्रंसगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री श्री लोणीकर बोलत होते.
            यावेळी आमदार संतोष दानवे, राजेंद्र देशमुख, विलास आडगावकर, गजानन नागवे, कौतुकराव जगताप,चंद्रकांत साबळे, शिवाजी बापु सपकाळ, कैलास पुंगळे, नवनाथ दौड, रामलाल चव्हाण, कैलास गव्हाड, दीपक जाधव, कैलास सहाणे, गणेश इंगळे, मुस्तफा पठाण, दादाराव राऊत, उप विभागीय अधिकारी हरिश्चंद्र गवळी, तहसिलदार संतोष गरड, जिल्हा उपनिबंधक एन.व्ही. आघाव आदींची प्रमुख उपस्थिती होती. 
  पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, पावसाने दडी मारली आहे. पाऊस नसल्याने शेतकऱ्यांच्या पीकांचे नुकसान होत आहे. अनेक दिवसापासून पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतपीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र आहे. या परिस्थितीचा खंबीरपणे मुकाबला करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रशासनामार्फत नियोजन करण्यात येत असुन सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन नियोजनाच्या या कामात प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.
गावपातळीवर काम करणारे तलाठी, ग्रामसेवक व कृषि सहाय्यक यांचा शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यामध्ये मोठा वाटा असतो.  पीकविमा असो वा दुष्काळी परिस्थिती अशा परिस्थितीत झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवुन देण्यासाठी प्रत्येक गावात तसेच मंडळामध्ये पीककापणी प्रयोग करण्यात येतात.  पीककापणी प्रयोग करुन त्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर करुन शासनाकडे पाठविण्यात येतो. त्यानुसार शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम ठरविण्यात येते. त्यामुळे गावपातळीवर काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पीककापणी प्रयोग वस्तुनिष्ठ व शासनाच्या निकषानुसार करुन शेतकऱ्यांना न्याय मिळेल तसेच त्यांना अधिकाधिक भरपाई कशा पद्धतीने देता येईल, यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश देत पूर्वी पन्नास टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झाल्यास भरपाई देण्यात येत होती परंतू केंद्र शासनाने यामध्ये बदल करुन 33 टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना भरपाई देण्याचा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.  
            मराठवाड्यासह राज्यातील जिल्ह्यात पावसाचा मोठ खंड आहे.  पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या पीकांचे नुकसान होत आहे.  या परिस्थितीची त्या त्या जिल्ह्यातील पालकमंत्र्यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले असुन हा अहवाल केंद्र शासनाकडे सादर करण्यात येणार आहे.  त्याअनुषंगाने जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातील पीकांची पहाणी करुन नियोजनाच्या बैठकीचे आयोजन करण्यात येत असल्याचे आजपर्यंत जिल्ह्यातील सहा तालुक्यातील पीक परिस्थितीची पहाणी करण्यात आली असल्याचेही सांगत पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की,  आजघडीला जिल्ह्यातील धरण, साठवण तलाव, लघु तलावातील पाण्याची पातळी अत्यंत खोल गेली आहे.  त्यामुळे संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी लागणार आहे.  ज्या ठिकाणी पाण्याचे स्त्रोत उपलब्ध आहेत अशी ठिकाणचे पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्याबरोबरच ज्या गावात पाण्याचे साठे उपलब्ध नाहीत अशा ठिकाणी मागेल त्याला टँकरद्वारे पाणी पुरवठ्याचे नियेाजन करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीकोनातुन प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करण्याच्या सुचनाही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी दिल्या.
  पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न समोर उभा राहणार आहे.  जिल्ह्यातील चारा बाहेर जिल्ह्यात नेण्यावर बंदी आणण्याबरोबरच ज्या धरणात, प्रकल्पात पाणीसाठा उपलब्ध आहे अशा ठिकाणी चारानिर्मितीही करावी लागणार आहे.  यासाठी शेतकऱ्यांना बियाणे शासनाकडून उपलब्ध करुन देण्यासाठीचेही नियेाजन करण्यात यावे. संभाव्य दुष्काळी परिस्थितीमध्ये मजुरांचा हाताला काम नसल्याने त्यांचे होणारे स्थलांतर रोखण्यासाठी मागेल त्याला काम उपलब्ध करुन देण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात कामे मंजूर करुन ठेवण्यात यावीत. या योजनेंतर्गत 11 कलमी कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याबरोबरच मजुरांना काम मिळाले नाही अशी तक्रार येता कामा नये यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी दक्षता घेण्याच्या सुचनाही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातुन भोकरदन तालुक्यातील 52 हजार 687 लाभधारक शेतकऱ्यांच्या खात्यावर 181 कोटी 80 लक्ष इतकी रक्कम जमा करण्यात आली असुन तालुक्यातील 27 हजार 568 शेतकऱ्यांना 153 कोटी 2 लक्ष रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे.  तसेच बोंडअळीच्या प्रादुर्भावाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात 34 कोटी 26 लक्ष रुपयांचा निधी जमा करण्यात आला असुन पीकविम्यापोटी 51 हजार 370 शेतकऱ्यांच्या खात्यावर 25 कोटी 12 लक्ष रुपयांचा निधीही जमा करण्यात आला असल्याची माहितीही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी दिली. 
आमदार संतोष दानवे म्हणाले की, भोकरदन तालुक्यात असलेल्या पाण्याच्या स्त्रोतातील पाणी पातळी खोल गेलेली आहे. तालुक्यातील जनतेला मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा करण्यासाठी आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पाणी पुरवठ्यासाठीचे नियोजन करण्यात यावे. तसेच तालुक्यातील जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न समोर उभा राहणार असुन त्यासाठी आवश्यकतेनुसार चारा छावण्या उभारणीचे नियोजन करण्याबरोबरच मजुरांच्या हाताला काम देण्यासाठी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातुन काम देण्यासाठीचे नियोजन  करुन दुष्काळ निवारण कक्ष करण्याच्या सुचना करत उपाययोजनांचे प्रस्ताव तातडीने प्रशासनाकडे पाठविण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
*भोकरदन व जाफ्राबाद येथील पीक परिस्थितीची पालकमंत्र्यांकडून पहाणी*
  राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी भोकरदन तालुक्यातील सोयगाव येथील उत्तम धुराजी सहाने यांच्या शेतीस भेट देऊन त्यांच्या शेतातील मका व कापूस पीकाची पहाणी करुन त्यांच्यासोबत संवाद साधला.  तदनंतर जाफ्राबाद तालुक्यातील कोल्हापुर येथील शेतकरी शिवाजी भगवान जाधव  यांच्या शेतातील कापूस व तुर पीकाची पहाणी करुन झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. 
जाफ्राबाद येथील टंचाईसदृष्य परिस्थितीचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा
जाफ्राबाद येथील शेतपीकाची पहाणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधुन झालेल्या नुकसानीची माहिती घेतल्यानंतर पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी जाफ्राबाद येथील हिंदुस्तान लॉन येथे सर्व तालुकास्तरीय यंत्रणाकडून परिस्थितीच्या नियोजनाचा आढावा घेऊन यंत्रणांनी उपाययोजना करण्याचे निर्देश देत कामात हयगय अथवा दिरंगाई करणाऱ्यावर कारवाई करण्याचा इशारा यावेळी दिला.
शासन शेतकऱ्यांप्रती सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन शेतकऱ्यांना सातत्याने मदत करण्यासाठी प्रयत्नशिल असून शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही देत  छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातुन जाफ्राबाद तालुक्यातील 16 हजार 729 लाभधारक शेतकऱ्यांच्या खात्यावर 72 कोटी 79 लक्ष इतकी रक्कम जमा करण्यात आली असुन तालुक्यातील 14 हजार 285 शेतकऱ्यांना 73 कोटी 59 लक्ष रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे.  तसेच बोंडअळीच्या प्रादुर्भावाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात 15 कोटी 77 लक्ष रुपयांचा निधी जमा करण्यात आला असुन पीकविम्यापोटी 34 हजार 934 शेतकऱ्यांच्या खात्यावर 11 कोटी 22 लक्ष रुपयांचा निधीही जमा करण्यात आला असल्याची माहितीही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी दिली. 
यावेळी आमदार संतोष दानवे, साहेबराव कानडजे, भाऊसाहेब जाधव, भगवानराव लहाने, शिवासिंह गौतम, दीपक वाकडे, उप विभागीय अधिकारी हरिश्चंद्र गवळी, तहसिलदार जे.डी. वळवी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय माईनकर, जिल्हा उपनिबंधक एन.व्ही. आघाव, कार्यकारी अभियंता डी.एच. डाकोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. 
यावेळी तलाठी, ग्रामसेवक, कृषि सहाय्यक, यांच्यासह सरपंच व गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 

*******






No comments:

Post a Comment