Tuesday 15 January 2019

विविध समित्यांच्या कामांचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

जालना, दि. 15 – शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवुन त्याचा लाभ तळागाळातील सर्वसामान्यांना मिळण्यासाठी गठित करण्यात आलेल्या‍ विविध समित्यांच्या कामाचा आढावा राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत घेतला.
            जिल्हा वसतीगृह निरीक्षण समितीचा आढावा घेताना पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की,  जिल्हास्तरावरील शासकीय वसतीगृहा मधील विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी सोडविण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली निरीक्षण समित्या स्थापन करण्यात आली असुन या समितीमध्ये अशासकीय सदस्यांचाही समावेश करण्यात आला आहे. जालना जिल्ह्यामध्ये दहा शासकीय वसतीगृहे असून तीन शासकीय निवासी शाळा आहेत. तसेच जिल्हा परिषदेचे तेरा  शासकीय वसतीगृहे खाजगी संस्थामार्फत कार्यरत आहेत. या वसतीगृहामध्ये मुला-मुलींना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांची तपासणी करण्याच्या सुचना देत या मुला-मुलींना देण्यात येणारे जेवण हे चांगल्या दर्जाचे आहे काय यासाठी अचानक वसतीगृहांना भेट देऊन तपासणी करण्यात यावी. तसेच या वसतीगृहाच्या दुरुस्तीसाठी निधीची आवश्यकता असल्यास तसा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे तातडीने सादर करण्याच्या सुचना देत यासाठी निधीची कमतरता भासु दिली जाणार नसल्याचेही पालकमंत्री             श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
            बैठकीसाठी उपस्थित असलेले अशासकीय सदस्य अंकुश आबा बोराडे, विक्रम माने यांचा यावेळी पालकमंत्री श्री लोणीकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण शिवकांत चिकुर्ते यांची उपस्थिती होती.  
            वृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन योजना समितीचा आढावा घेताना पालकमंत्री बबनराव लोणीकर म्हणाले की, जिल्हास्तरीय समितीकडून दरवर्षी 60 कलावंत अनुदानासाठी निवडण्यात येतात. त्यामध्ये 40 पुरुष व 20 महिला यांचा समावेश असतो. या कलावंतांना दरमहा दीड हजार रुपये मानधन शासनाकडून देण्यात येते. आतापर्यंत जालना जिल्ह्यात एकूण 1 हजार 76 कलावंतांना मानधन मंजूर करण्यात आले आहे. सन 2017-18 मध्ये 60 कलावंत निवडण्यात आले असुन  सन 2018 19 कलावंतांची निवड सध्या बाकी आहे ती  तातडीने करण्याचे निर्देश यावेळी पालकमंत्र्यांनी दिले.
            बैठकीसाठी उपस्थित असलेले अशासकीय सदस्य  गणपत वारे, डॉ.संजय उमाकांत पुरी, संतुकराव रंगनाथ आढावणे, रामदास  मोतीराम डाखुरकी, ज्ञानेश्वर माऊली  गव्हाणे, प्रभाकर कोंडीबा भारते, विष्णु राघुजी कंटुले यांचा पालकमंत्री श्री लोणीकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अब्दुल मुकीम देशमुख यांची उपस्थिती होती.
            जिल्हा दक्षता समितीचा आढावा घेताना पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, स्वस्त धान्य दुकानामार्फत वाटप करण्यात येणारे धान्य गरजु व गोरगरीब लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी ई-पॉसच्या माध्यमातुन धान्य वाटपासाठी जालना जिल्ह्याने पुढाकार घेण्यासाठी सातत्याने विभागाला सुचना देण्यात आल्या असल्याचे सांगत आजघडीला जिल्ह्यातील 1 हजार 280 स्वस्त धान्य दुकानातुन ई-पॉसद्वारे धान्याचे वाटप करण्यात येत असल्याचे सांगत जिल्ह्यातील 59 हजार 731 लाभार्थ्यांना उज्वला गॅस योजनेंतर्गत गॅसचे वाटप करण्यात आले असुन जिल्ह्यातील अधिकाधिक लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्याचे निर्देशही यावेळी अधिकाऱ्यांना दिले.
            या बैठकीस उपस्थित असलेले अशासकीय सदस्य श्रीमती कमल तुल्ले, जिजाबाई जाधव, कचरु रगडे, संजय ठाकरे, गोविंद पंडित, बी.डी. पवार, शिवाजी खंदारे, रामराव लावणीकर यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी भुजंगराव गोरे, जिल्हा पुरवठा अधिकारी राजीव नंदकर उपस्थित होते.
            पालकमंत्री पाणंद रस्ता योजनेमध्ये जालना जिल्ह्यात एकूण 165  प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत जालना जिल्ह्यासाठी एकूण दीड कोटी निधी प्राप्त झाला असून प्रत्येक महसूल विभागासाठी 37 लक्ष रुपये निधी वाटप करण्यात आलेला आहे.  सर्व यंत्रणांनी तातडीने कारवाई करुन पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेअंतर्गत तातडीने रस्ते कामे हाती घेण्याचे निर्देशही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी दिले.
*******  

           

No comments:

Post a Comment