Friday 18 January 2019

सामाजिक वनीकरण विभागाच्या जैव विविधता उद्यानास पालकमंत्र्यांची भेट जिल्ह्यात वृक्ष लागवड व संगोपनावर भर द्यावा आनंदवन प्रकल्पांतर्गत आष्टी व परतूर येथे पायलट प्रोजेक्ट राबवा - पालकमंत्री बबनराव लोणीकर




            जालना, दि. 18 – जालना देऊगावराजा रोडवर असलेल्या सामाजिक वनीकरण विभागाच्या जैव विविधता उद्यानास राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी आज प्रत्यक्ष भेट देऊन पहाणी करत जिल्ह्यात वृक्ष लागवड व संगोपनावर भर देण्याबरोबरच आनंदवन प्रकल्पांतर्गत आष्टी व परतूर येथे पायलट प्रोजेक्ट राबविण्याचे निर्देश वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
            यावेळी सामाजिक वनीकरण विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक के.बी. पांडे, वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती वृषाली तांबे, रमेश महाराज वाघ, निवृत्ती डाके, श्री नागरे आदींची उपस्थिती होती.
            यावेळी पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, राज्यातील वनाचे क्षेत्र वाढविण्यासाठी शासनामार्फत वृक्ष लागवडीवर भर देण्यात येत आहे.  जालना जिल्ह्यातही गेल्या तीन वर्षात वृक्ष लागवड मोहिम हाती घेऊन वृक्ष लागवड करण्यात आली आहे.  जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना एक हजार पाचशे रोपांचा मोफत पुरवठा करण्यात आला आहे.  परंतू ग्रामपंचायतींना देण्यात आलेली वृक्ष किती जीवंत आहेत, त्यांना पुरेशा प्रमाणात पाणी देण्यात येते काय याबाबत परीक्षण करुन अहवाल सादर करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.
            प्रत्येक जिल्ह्यातील वृक्षांचे प्रमाण वाढविण्यासाठी आनंदवन प्रकल्पाच्या माध्यमातुन वृक्ष लागवडीवर भर देण्याच्या सुचना राज्याचे वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या असुन जालना जिल्ह्यातही या योजनेच्या माध्यमातुन वृक्ष लागवडीवर भर देण्यात यावा.  पहिल्या टप्प्यामध्ये परतूर व आष्टी येथे पायलट प्रोजेक्ट राबविण्यात यावा.  या योजनेंतर्गत लागवडीच्या नियोजनाचा आराखडा तातडीने सादर करण्यात येऊन ज्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात पाणी आहे अशा ठिकाणाची निवड करण्यात यावी.  तसेच पाऊस पाडण्यासाठी कारणीभुत असलेल्या 51 प्रजातींच्या देशी वृक्षांचेच रोपण या ठिकाणी करण्याचे निर्देशही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
            यावेळी पालकमंत्री महोदयांनी सामाजिक वनीकरण विभागाच्या रोपवाटीकेचे पहाणी करुन रोपवाटीकेमध्ये कुठल्या प्रकारची रोपे आहेत या संदर्भात उपस्थित अधिकाऱ्यांकडून माहिती जाणुन घेतली.  या परिसरात पालकमंत्र्यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले.
            जैवविविधता उद्यानात वेगवेगळ्या प्रकारच्या वनांची संकल्पना राबविण्यात आलेली असुन ३४ प्रकारची विविध वने तयार करण्यात आलेली आहेत.  यामध्ये  औषधी वनस्पती उद्यान, सर्व धर्म संभाव वने, बांबू वन, राशी वन व नक्षत्र वन, पंचवटी वन,  शिव पंचायतन वने, सप्तर्षी वन, सुगंधी वन, गणेश वन, नंदनवन, अशोक वन, त्रिफळा वन, जैव इंधन वन, नैसर्गिक रंगद्रव्या वन, डिंक वन, गुलाब उद्यान, कॅक्टस गार्डन, दशमूळ वन, फुलपाखरू उद्यान, उर्जा वन, वारकरी वन, स्मृती वन, ऑक्सिजन पार्क, बालोद्यान आदी वने तयार करण्यात आली असुन हे उद्यान वनविस्तारमध्ये महत्वाचा घटक ठरत असल्याची माहिती यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी मंत्री महोदयांना दिली.
*******




No comments:

Post a Comment