Friday 25 January 2019

प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न दुष्काळग्रस्त गावातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाची 2 हजार 900 कोटींची मदत शेतकऱ्यांना लवकरच मदतची रक्कम मिळणार · प्रधानमंत्री मुद्रा योजनेत जिल्ह्यातील लाभार्थ्यांसाठी 403 कोटी रुपयांची प्रकरणे मंजुर · पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत जिल्हयासाठी 700 कोटी रुपयांचा निधी -- पालकमंत्री बबनराव लोणीकर


            जालना, दि. 26 –अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यातील आठ तालुक्यातील 972 गावात दुष्काळ घोषित करण्यात आला आहे.  या परिस्थितीच्या अनुषंगाने दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या गावांमध्ये विविध सवलती लागू करण्यात आल्या आहेत.  केंद्राच्या निकषाप्रमाणे दुष्काळ जाहीर झालेल्या गावातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी केंद्र शासनाकडे सुमारे 7 हजार 900 कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठविला आहे. केंद्राची मदत जाहीर होईपर्यंत शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या निधीतून मदत देण्याचा निर्णय राज्य शासनाने नुकताच घेतला असुन 2 हजार 900 कोटी रुपयांचा निधी विभागीय आयुक्त स्तरावर वितरीत करण्यात आला असुन लवकरच तो शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.
      भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 69 व्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री श्री लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आले.  त्याप्रसंगी जनतेला उद्देशुन  दिलेल्या शुभेच्छा संदेशाप्रसंगी पालकमंत्री श्री लोणीकर बोलत होते.
            यावेळी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, रामेश्वर भांदरगे, जिल्हाधिकारी प्रकाश खपले, जिल्हा पोलीस अधीक्षक एस. चैतन्य,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मुकीम देशमुख, जिल्हा पुरवठा अधिकारी राजीव नंदकर उप विभागीय अधिकारी केशव नेटके, आदींची उपस्थिती होती.
            पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की,  राज्य निवडणूक आयोगाच्या पुढाकाराने 26 जानेवारी ते 10 फेब्रुवारी, 2019 या कालावधीत लोकशाही व सुशासन पंधरवडा साजरा करण्यात येत आहे.  लोकशाही प्रक्रियेतील स्थानिक स्वराज्य संस्थांचे स्थान, अधिकार, जबाबदाऱ्या, कर्तव्य आणि त्यांच्या निवडणुकांचे गांभीर्य अधोरेखित व्हावे आणि लोकशाहीचा पाया मजबुत व्हावा, हा या पंधरवाडा साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक स्वराज्य संस्था हा लोकशाहीचा पाया आहे. तो मजबुत झाला पाहिजे.  त्याद्वारे शेवटच्या घटकापर्यंत विकासाची फळे पोहचली पाहिजेत. यासाठीच स्थानिक स्वराज्य संस्थांचे स्थान आणि जबाबदारी महत्वाची असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
            जून ते सप्टेंबर या कालावधीत पर्जन्याची तुट, उपलब्ध भूजलाची कमतरता, दूरसंवेदन विषयक निकष, वनस्पती निर्देशांक,मृद आर्द्रता, पेरणीखालील क्षेत्र व पिकांची परिस्थिती या घटकांचा विचार करुन शासनाने गंभीर व मध्यम स्वरुपाचा दुष्काळ घोषित केला आहे.  जिल्ह्यातील आठ तालुक्यातील 972 गावात दुष्काळ घोषित करण्यात आला आहे.  या परिस्थितीच्या अनुषंगाने दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या गावांमध्ये जमीन महसुलात सुट, सहकारी कर्जाचे पुनर्गठण, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू विजबिलात 33.5 टक्के सुट, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथीलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे आदी उपाययोजना लागू करण्यात आल्या असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.  
            टंचाईच्या काळात जनतेला मुबलक प्रमाणात पाण्याचा पुरवठा होण्यासाठी प्रशासनामार्फत उपाययोजना करण्यात येत असुन जिल्ह्यातील आठ तालुक्यातील 116 गावे व 06 वाड्यांना 22 शासकीय व 133 खाजगी टँकरच्या माध्यमातुन पाणी पुरवठा करण्यात येत आहे.  तसेच 121 गावातील 207 विहिरींचेही अधिग्रहण करण्यात आले आहे. मागणीनुसार टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याच्या सुचना जिल्हा प्रशासनास देण्यात आल्या असुन जिल्ह्यातील एकुण 6 लाख 97 हजार 398 लहान व मोठ्या जनावरांना मार्चअखेरपर्यंत पुरेल एवढ्या चाऱ्याच्या निर्मितीसाठी ज्वारी, मका व बाजरी पिकांचे बियाणे लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले आहेत.  त्याव्यतिरिक्त 350 क्विंटल मका बियाण्यांची मागणी शासनाकडे नोंदविण्यात आली असल्याचेही त्यांनीयावेळी सांगितले.
        महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातुन जिल्ह्यात मागेल त्याला काम उपलब्ध करुन देण्यात येत आहे. 35 हजार 754 कुटूंबातील 72 हजार 753 मजुरांना या योजनेंतर्गत कामे उपलब्ध करुन देण्यात आली असुन जिल्ह्यातील 779 ग्रामपंचायतीमध्ये रोजगार हमी योजनेची कामे करण्यात येत असुन 407 कामांवर 9 हजार 100 मजुरांची उपस्थिती आहे. मजुरांनी कामाची मागणी केल्यास तातडीने काम उपलब्ध व्हावे यादृष्टीकोनातुन 22 हजार 246 कामे सेल्फवर मंजुर करुन ठेवण्यात आली आहेत.
        छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील 1 लाख 53 हजार 768 लाभार्थ्यांना  आजपर्यंत 827 कोटी 18 लाख 66 हजार रक्कमेची कर्जमाफी झाली झाली असुन पात्र व गरजूला शेतकऱ्याला लाभ मिळेपर्यंत ही योजना सुरु राहणार आहे. शासन सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाहीही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी दिली.
        टंचाई परिस्थितीवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत असुन या अभियानांतर्गत सन 2015-16 मध्ये 212 गावांची निवड करुन 5 हजार 310 कामे पुर्ण केली आहेत.  सन 2016 मध्ये 186 गावांची निवड करुन 4 हजार 500 कामे पुर्ण करण्यात आली असुन सन 2017-18 मध्ये 149 गावांची निवड करुन 2 हजार 11 कामे पुर्ण केली आहेत. सन 2018-19 मध्ये 206 गावांची निवड करुन जलसंधारणाची कामे करण्यात येत आहेत. या कामांमुळे 1 लाख 5 हजार 969 टी.सी.एम. पाणी साठवण क्षमता निर्माण झाली असल्याचे सांगत शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी मागेल त्याला शेततळे ही योजना वरदान ठरत असुन या योजनेत जालना जिल्हा अग्रेसर आहे.  आतापर्यंत 7 हजार 35 शेततळे पुर्ण करण्यात येऊन यावर  30 कोटी 27 लक्ष इतका निधी खर्च करण्यात आला आहे.  या शेततळयांच्या माध्यमातुन 2 कोटी 5 लक्ष 74 हजार घनमीटर पाणी साठवण क्षमता निर्माण झाली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
मराठवाड्यातील टंचाईची समस्या कायमची सोडविण्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड योजना  राबविण्यात येत आहे. तेलंगणा, गुजरात या राज्यासह इस्त्राईल या देशाच्या धर्तीवर पिण्यासाठी शुद्ध पाणी, शेतीसाठी व उद्योगासाठी पाणी यासाठी एकत्रित ग्रीड करण्यात येणार आहे. इस्त्राईल शासनाची राष्ट्रीय कंपनी असलेल्या मेकोरोड या कंपनी बरोबर करार केलेला असून कंपनीने शासनाला डीपीआरही सादर केला आहे. मराठवाड्यातील पिण्याचे शुद्ध पाणी, शेतीचे पाणी व उद्योगासाठी पाणी यांची समस्या कायमस्वरुपी सोडविण्यासाठी शासन कटीबध्द असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.  
        जिल्ह्यातील ग्रामीण दळणवळणाचा दर्जा सुधारण्यासाठी राज्य शासन सतत प्रयत्नशिल आहे.  जालना जिल्ह्यात रस्ते विकासासाठी आजपर्यंत जवळपास 7 हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असुन या निधीच्या माध्यमातुन जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे सुरु आहेत.  शेगाव ते पंढरपूर या 430 किलोमीटर अंतराच्या पालखी मार्ग रस्त्याचे कामही वेगाने सुरु आहे.  जिल्ह्यातुन 95 किलोमीटरचा हा रस्ता जात असुन यामुळे शेतकऱ्यांचा माल कमी वेळात व कमी पैशात बाजारपेठेमध्ये पोहोचण्याबरोबरच बेरोजगारांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होणार होऊन वारकऱ्यांचीही सोय या मार्गामुळे होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
            राष्ट्रपिता महात्मा गांधी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज यांनी आयुष्यभर जनतेला स्वच्छतेचा संदेश दिला.  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही संपूर्ण देश स्वच्छ व सुंदर करण्याचे आवाहन केले.  पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यात 68 लक्ष शौचालयांची उभारणी करुन महाराष्ट्र राज्य देशात प्रथम क्रमांकावर आले असुन उभारण्यात आलेल्या शौचालयांचा नागरिकांनी नियमित वापर करण्यासाठी धर्मगुरुंच्या माध्यमातुन राज्यभर प्रबोधन करण्यात येणार आहे.  नागरिकांना देण्यात आलेल्या शौचालयाचा वापर प्रत्येकाने करावा व स्वच्छ व सुंदर महाराष्ट्र घडविण्यास हातभार लावण्याचे आवाहनही पालकमंत्र्यांनी यावेळी केले.
            देशातील तरुणाईला रोजगार व त्या अनुषंगाने आत्मविश्वास देण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री मुद्रा योजना सुरु केली आहे.  या योजनेमार्फत बेरोजगारांना कर्ज पुरवठा करुन त्यांना व्यवसायासाठी प्रोत्साहित केले जात  असुन या योजनेची चांगली फलश्रुती समोर येत असुन मागील दोन वर्षात या योजनेंतर्गत जिल्ह्यातील लाथार्थ्यांची 403 कोटी रुपयांची प्रकरणे मंजुर करण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
            दिव्यांगांच्या कल्याणासाठी राज्य शासन अनेक कल्याणकारी योजना राबवित आहे. या योजनांचा लाभ दिव्यांगांना अधिक सुलभतेने घेता यावा या दृष्टीकोनातुन संपुर्ण राज्यात दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियान राबवुन त्या माध्यमातुन दिव्यांगांना वैश्विक ओळखपत्र वाटपाच्या नोंदणीसाठी तालुकास्तरावर शिबीराचे आयोजन करण्यात येणार असुन याचा दिव्यांगाना फायदा होणार असुन  या वर्षापासुन एक दिव्यांग व्यक्ती व दिव्यांगांसाठी कार्य करणाऱ्या संस्थेला जिल्हास्तरावर दिव्यांग प्रेरणा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
            महाराष्ट्र राज्याला छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा लाभला आहे. या थोर महापुरुषांनी दाखविलेल्या समतेच्या मार्गानेच सामाजिक न्याय विभाग आणि राज्य शासन वाटचाल करीत आहे. या दुर्बल घटकांचा विकास करण्यासाठी समाजातील मुला-मुलींना चांगले शिक्षण देण्यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत शैक्षणिक सुविधा व योजना राबविण्याबरोबरच सामाजिक आणि आर्थिक स्तर उंचावण्यासाठीही योजना राबविण्यात येत असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
            गेल्या चार वर्षात पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत भरीव कामगिरी करण्यात आली असुन राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत  1 हजार 340 गावांच्या 900 कोटी रुपयांच्या 1 हजार 251 योजना पुर्ण करण्यात आल्या आहेत.  मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत 608 कोटी रुपयांच्या 211 योजना मंजुर असुन 177 योजनांची कामे सुरु करण्यात आली असुन जालना जिल्ह्याला पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत 700 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. जलस्वराज्य टप्पा 2 मध्ये औरंगाबाद व नांदेड जिल्ह्यातील 14 योजना मंजुर असुन त्यासाठी 113 कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात आहेत.  या निधीच्या माध्यमातुन सर्व कामे वेगाने करण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
            राज्य शासनाने गोरगरीबांच्या आरोग्यासाठी महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना सुरु केली असुन या योजनेमध्ये जे लाभार्थी उपचार घेण्यासाठी निकषात बसत नाहीत अशा गरजुंसाठी केंद्र शासनाने आयुष्यमान भारत ही योजना जाहीर केली असुन या योजनेच्या माध्यमातुन जवळपास 10 कोटी कुटूंबांना लाभ मिळणार असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
यावेळी पालकमंत्र्यांनी परेडचे निरीक्षण केले.  परेडमध्ये पोलीस दल, राज्य राखीव पोलीस बल गट, महिला पोलीस दल, होमगार्ड, बँडपथक, महिला सुरक्षा दामिनी पथक, दंगल नियंत्रण पथक, अग्निशामक दलासह विविध विभागाच्या चित्ररथांचा समावेश होता.
            यावेळी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक एस. चैतन्य,पोलीस उपअधीक्षक सोपान बांगर, पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांच्यासह पोलीस विभागातील अधिकारी कर्मचारी, जिल्हा माहिती अधिकारी एस.के. बावस्कर, माहिती सहाय्यक अमोल शिवकांत महाजन, कॅमेरामन अनिल परदेशी तसेच आरोग्य विभाग,लघु उद्योग, कृषि विभाग, दिव्यांग पुरस्कार, स्काऊट गाईड यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थीनींचा पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
            कार्यक्रमाचे संचलन निशिकांत मिरकले यांनी केले.  कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी, स्वातंत्र्य सैनिक, नागरिक, पत्रकार,विद्यार्थी, विद्यार्थीनीची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
*******


No comments:

Post a Comment