Tuesday 15 January 2019

योजनांचा लाभ अल्पसंख्याक समाजातील प्रत्येक नागरिकांमार्फत पोहोचण्यासाठी अधिकाधिक प्रस्ताव सादर करा -- उपजिल्हाधिकारी कमलाकर फड

जालना, दि. 15 – अल्पसंख्याक समाजाच्या उन्नतीसाठी शासनामार्फत अनेकविध योजना राबविल्या जातात.  या योजनांचा लाभ अल्पसंख्याक समाजातील प्रत्येक नागरिकांमार्फत पोहोचण्यासाठी योजनांचे प्रस्ताव अधिकाधिक संख्येने सादर करण्याचे आवाहन उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) कमलाकर फड यांनी केले.
          जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा अल्पंसख्याक कल्याण समितीच्या त्रैमासिक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी श्री फड बोलत होते.
          यावेळी शेख इमाम शेख बाबु, डॉ. रियाज, शहा आलम खान, शेख अफसर शेख, फय्याज खान पठाण, फरहान अन्सारी, फईम कुरेशी, शेख महेबुब, शेख अजीज आदींची उपस्थिती होती.
          प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अल्पसंख्याक समाजातील लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्यात आला असुन सन 2016-17 मध्ये 782 तर सन 2017-18 मध्ये 169 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
          अल्पसंख्याक समाजाला शासनाच्या अधिकाधिक सुविधांचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी अशासकीय सदस्यांमार्फत करण्यात आली.  यावेळी अल्पसंख्याक समाजातील बेरोजगारांना मुद्रा योजनेसह शासनाच्या विविध योजनेतुन उद्योग, व्यवसायासाठी अधिकाधिक कर्ज उपलब्ध करुन देण्यात यावे, 8 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन भत्ता तसेच अपना घर व ख्वाजा गरीब नवाज कौशल्य विकास योजना जिल्ह्यात राबविण्यात याव्यात.  अल्पसंख्याक शाळांसाठी निधी मंजुर आहे. परंतू जागा उपलब्ध नसल्याने शाळेचा प्रश्न प्रलंबित असुन तो मार्गी लावण्यात यावा, उर्दू शाळांमध्ये मराठी विषयक शिकवण्यासाठी 17 शाळांमध्ये 24 शिक्षकांना कंत्राटी पद्धतीवर नियुक्ती देण्यात आली असुन यामध्ये वाढ करण्यात यावी.
गावांच्या विकासासाठी निधी देण्याबरोबरच घरकुल योजना, पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण योजनेमध्ये शंभर विद्यार्थ्यांच्या मर्यादेत वाढ करण्यात यावी, 15 कलमी कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात यावा, जिल्ह्यास स्वतंत्र वक्‌फ बोर्ड अधिकाऱ्याची नेमणुक, ख्रिश्चन समाजाला रस्त्यासाठी देण्यात आलेली जमीन ताब्यात देण्यात यावी  आदी मागण्या मांडण्यात आल्या.  
          यावेळी नायब तहसिलदार श्रीमती मयुरा पेरे, शिक्षणाधिकारी (निरंतर) श्री दातखील, पोलीस निरीक्षक एन.टी. पाटील,  औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे के.एस.गोरे,कौशल्य विकास विभागाचे सु.दी. उचले  यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
***  

No comments:

Post a Comment