Tuesday 22 January 2019

3 कोटी 80 लक्ष रुपयाच्या कामाचे राज्यमंत्री श्री खोतकर यांच्या हस्ते भूमिपुजन उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातुन गोरगरीबांना चांगल्या आरोग्य सेवा द्या रामनगर येथे तालुकास्तरीय क्रीडांगणाची उभारणी कर - राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर



            जालना, दि. 22 – रामनगर येथे  तीन कोटी 80 लक्ष रुपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातुन  समाजातील गोर-गरीबांना चांगल्या प्रकारच्या आरोग्य सेवा मिळाव्यात. तसेच रामनगर व परिसरातुन चांगले खेळाडु निर्माण व्हावेत यासाठी रामनगर येथे सर्व सोईनींयुक्त असे क्रीडांगण उभारण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, मस्त्यव्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी केले.
            रामनगर येथे अर्थसंकल्प निधीतुन 3 कोटी 80 लक्ष रुपये खर्चुन उभारण्यात येणाऱ्या उपजिल्हा रुगणालयाच्या ईमारतीचे भूमिपुजन राज्यमंत्री श्री खोतकर यांच्या हस्ते करण्यात आले.  त्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
            व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुध्द खोतकर, भास्कर अंबेकर, ए जी बोराडे,पांडूरंग डोंगरे, पंडीत भुतेकर, संतोष मोहिते, तुकाराम शेजुळ, मुरली अप्पा  शेजुळ, मुरली आबा थेटे, श्रीकांत घुले, तुलशीराम काळे, यादवराव राऊत, कमलाकर कळकुंबे, बाबुराव खरात, सोपानराव शेजुळ, शिवाजी शेजुळ, मधुकर मोठे, सुनिल कांबळे, गणेश मोहिते, श्री गवळे नाना, रामजी काळे, गजानन म्हस्के, प्रभाकर शेजुळ, हरीभाऊ शिंदे, कदीर भाई, तहसीलदार बिपीन पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक मधुकर राठोड, कार्यकारी अभियंता श्री चांडक आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
            राज्यमंत्री श्री खोतकर म्हणाले की, ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्याच्या चांगल्या सेवा मिळाव्यात या दृष्टीकोनातुन रामनगर येथे उपजिल्हा रुग्णालय उभारण्यात येत आहे.  या रुग्णालयाच्या माध्यमातुन रामनगरसह परिसरातील अनेक गावातील नागरिकांना या रुग्णालयाचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. आजघडीला खासगी रुग्णालयाच्या माध्यमातुन आरोग्य सेवा घेण्यासाठी मोठया प्रमाणात पैसा खर्च करावा लागतो.  या रुग्णालयाच्या माध्यमातुन रुग्णांना अधिकाधिक चांगल्या सेवा उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी या रुग्णालयावर राहणार  असल्याचेही राज्यमंत्री श्री खोतकर यांनी यावेळी सांगितले.
            आरोग्याच्या बाबतीत प्रत्येकाने सजग राहण्याची गरज असल्याचे सांगत राज्यमंत्री श्री खोतकर म्हणाले की,  आज तरुणाई अनेक व्यसनांच्या आहारी जात आहे.  व्यसनांमुळे अनेक आजारांचा सामना करावा लागत असुन आरोग्य संपत्ती जपण्यासाठी व्यसनापासुन दूर राहणे गरजेचे असल्याचेही सांगत रामनगर व परिसरातुन अनेक चांगले खेळाडू निर्माण व्हावेत तसेच त्यांच्यामार्फत जिल्ह्याचा,राज्याचा व देशाचा नावलौकिक व्हावा यादृष्टीकोनातुन रामनगर येथे सर्व सोईंनीयुक्त असे क्रीडांगण उभारण्यात येणार असल्याचेही राज्यमंत्री श्री खोतकर यांनी यावेळी सांगितले.
            जालना मतदारसंघामध्ये अनेकविध विकासाची कामे करण्यात येत असल्याचे सांगत मतदारसंघामध्ये पाणी पुरवठा, विद्युत विकास, रस्ते विकास तसेच जलसंधारणाची अनेक कामे  करण्यात येत आहेत.  कल्याणी नदीच्या पुनरुज्जीवनाचे काम हाती घेण्यात आले असुन या नदीवर जवळपास 37 बंधारे उभारण्यात येणार आहेत.  यामुळे कल्याणी नदीच्या पुनरुज्जीवनाचे काम पुर्ण झाल्यानंतर पाणी साठवण क्षमता वाढुन परिसरातील तीन हजार एकरपेक्षा अधिक जमीन ओलिताखाली येण्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याबरोबरच  या भागातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मोठ्या प्रमाणात मदत होणार असल्याचेही राज्यमंत्री  श्री खोतकर यांनी यावेळी सांगितले.
            पशुपालनाविषयी जनजागृती व्हावी आणि पशुपालकांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी  जालना येथे 2 ते 4 फेब्रुवारीला अखिल भारतीय स्तरावरील भव्य पशु- पक्षी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे असुन या प्रदर्शनामध्ये आपल्या राज्यातील तसेच अन्य राज्यातील उत्तमोत्तम आणि जास्त दुध देणाऱ्या जातीच्या गायी व म्हशी तसेच शेती व ओढ कामासाठी अतिशय चांगली व उपयुक्त असलेले बैल, विविध जातींचे अश्व, वेगवेगळ्या जातींच्या वेगवेगळ्या राज्यातील शेळ्या व मेढ्या, परस कुक्कुट पालन व व्यावसायिक कुक्कुट पालन यासाठी उपयुक्त असलेल्या वेगवेगळ्या जातींच्या कोंबड्या, व्यावसायिक वराह पालनासाठी उपयुक्त  असलेले विदेशी व संकरीत जातींचे वराह, वेगवेगळ्या जातींचे कुत्रे अशा सर्व प्रकारच्या पशुधनाचा प्रदर्शनामध्ये सहभागी होणार आहे. जातिवंत घोड्या पासून ते सश्यापर्यंत सर्व पशुधन या प्रदर्शनात असणार आहेत. सुलतान, युवराज यासारख्या कोट्यावधी रुपये किंमतीच्या रेड्यांचा सहभाग हे विशेष आकर्षण असणार आहे.  या कार्यक्रमास जास्तीत नागरिकांनी अधिकाधिक संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही राज्यमंत्री  श्री खोतकर यांनी यावेळी केले .
            याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, भास्कर आंबेकर यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा शल्य‍ चिकित्सक डॉ. एम.के. राठोड यांनी केले.
            सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन तसेच कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.
            कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी तसेच ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
*******
   



No comments:

Post a Comment