Tuesday 15 January 2019

पिण्याचे पाणी, जनावरांना चारा व मजुरांना काम देण्यासाठी यंत्रणांनी समन्वयाने व गतीने काम करावे - पालकमंत्री बबनराव लोणीकर


जालना, दि. 15 – राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी जिल्ह्याच्या विकासाबाबत विविध योजनेंतर्गत झालेल्या कामाचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांकडून घेतला. जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असुन या परिस्थितीमध्ये पिण्याचे पाणी, जनावरांना चारा व मजुरांच्या हाताला काम उपलब्ध करुन देण्यासाठी यंत्रणांनी समन्वयाने व गतीने काम करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
            यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राहुल लोणीकर, अपर जिल्हाधिकारी प्रकाश खपले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मुकीम देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, जिल्हा पुरवठा अधिकारी राजीव नंदकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय माईनकर, जिल्हा नियोजन अधिकारी वै.र. कुलकर्णी, परतुरचे उप विभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
            पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की,  जिल्हयात दुष्काळी परिस्थिती असुन या परिस्थितीमध्ये मजुरांचे स्थलांतर होऊ नये तसेच त्यांच्या गावातच त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा यादृष्टीकोनातुन मग्रारोहयोच्या माध्यमातुन मागेल त्याला काम उपलब्ध करुन देण्यात यावे.  मागणी करुनही काम मिळाले नाही अशी मजुरांची तक्रार येणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी दिले.  मग्रारोहयोअंतर्गत 11 कलमी कार्यक्रम राबविण्यात येतो. या योजनेंतर्गत अहिल्यादेवी सिंचन विहिर, अमृतकुंड शेततळे, भूसंजिवनी नाडेप कंपोस्टींग, भू संजीवनी व्हर्मी कंपोस्टींग, कल्पवृक्ष फळ लागवड, नंदनवन वृक्ष लागवड, समृद्ध गावतलाव, अंकुर रोपवाटीका, निर्मल शौचालय, निर्मल शोषखड्डा व समृद्ध गाव योजना या 11 कलमी कार्यक्रमाची माहिती तळागाळातील जनतेला होण्यासाठी या कार्यक्रमाचे प्रचार, प्रसार करण्यात यावा.  गावोगावी मेळावे घेण्यात येऊन या 11 कलमी कार्यक्रमांतर्गत कोणकाणते कामे करण्यात येतात,  याचा लाभ कशा प्रकारे देण्यात येतो याची माहिती देण्यात यावी.  वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना एक हजार पाचशे मोफत वृक्षांचा पुरवठा करण्यात आला होता. या वृक्षांची निगा चांगल्या प्रमाणात राखण्यात येते काय, वृक्षांना पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे काय, लागवड करण्यात आलेल्या वृक्षापैकी किती झाडे जीवंत आहेत याची तपासणी करण्याचे निर्देशही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी संबंधित यंत्रणेला दिले.
            शासनाने जालना जिल्ह्यास दरवर्षी साडेचार हजार सिंचन विहिरी उभारण्याचे उद्दिष्ट दिले होते.  गेल्या काळात केवळ दोन हजार विहिरी करण्यात आल्या आहेत.  अधिकाऱ्यांच्या उदासिनतेमुळे गतकाळात या विहिरी होऊ  न शकल्याची खंत व्यक्त करत ऑनलाईन मस्टर भरण्याची जबाबदारी ग्रामसेवकांची असुन गटविकास अधिकाऱ्यांनीही यामध्ये वैयक्तिक लक्ष घालुन या सिंचन विहिरी गतीने पुर्ण करण्याचे निर्देश देत जिल्ह्यात किती विहिरी मंजुर होत्या, त्यापैकी किती विहिरी पुर्ण करण्यात आल्या, किती विहिरींचे मस्टर ऑनलाईन करण्यात आले आदी माहिती संकलित करण्याचे निर्देशही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी दिले.
            बैठकीस सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.  


No comments:

Post a Comment