Friday 4 February 2022

सर्व सुविधांनीयुक्त पाच फिरत्या दवाखान्यांचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न गोरगरीब व गरजुंना फिरत्या दवाखान्यांचा लाभ होणार - पालकमंत्री राजेश टोपे * फिरत्या रुग्णालयातुन जिल्ह्याच्या सर्व तालुक्यातील नागरिकांची तपासणी करणार * कोरोनाबाधितांना फिरत्या रुग्णालयाच्या माध्यमातुन कोरोना किटचे वाटप * सामाजिक दायित्व निधीतुन राज्याच्या ईतर जिल्ह्यातही हा उपक्रम राबवणार

 







            जालना, दि. 4 (जिमाका) :-  ग्रामीण भागातील जे नागरिक आरोग्य तपासणीसाठी तालुका तसेच जिल्हास्तरावर येऊ शकत नाहीत, अशा गोरगरीब व गरजुंना अत्याधुनिक व सर्व सोई-सुविधांनी युक्त असलेल्या फिरत्या दवाखान्यांचा मोठा लाभ होणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंबकल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी केले.

                आय.सी.आय.सी.आय. फाऊंडेशनच्या सहकार्याने जालना जिल्ह्यासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या आधुनिक व सर्व  सोई-सुविधांनी युक्त अशा पाच फिरत्या दवाखान्यांचे लोकार्पण पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते आज जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात करण्यात आले, त्याप्रसंगी माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.

                यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पद्मजा सराफ, जिल्हा लसीकरण अधिकारी श्रीमती जयश्री भुसारे, कौस्तुभ बुटाला, आशिष रंजन,सारंग मोदी, नरेश चौधरी, प्रतिक आचार्य  आदींची उपस्थिती होती.

                पालकमंत्री राजेश टोपे म्हणाले की, आय.सी.आय.सी.आय  फाऊंडेशनच्या सामाजिक दायित्व निधीतुन देण्यात आलेल्या या फिरत्या दवाखान्यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. येत्या ४ महिन्यांच्या कालावधीत या फिरत्या दवाखान्यांच्या माध्यमातुन जिल्ह्याच्या आठही तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्याबरोबरच त्यांना मोफत स्वरुपात औषधीही उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.  फिरते दवाखाने नागरिकांना प्राथमिक उपचारासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. भारतामध्ये प्रथमच या फिरत्या दवाखान्यामध्ये मोबाईल ट्रॅकिंग सिस्टीम तसेच डॉक्टर-पेशंट ॲप या आधुनिक पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे.  या फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातुन सर्वसामान्य नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी, मोफत औषधी उपलब्ध करण्याबरोबरच मोफत फस्टएड व ड्रेसिंग सुविधा उपलब्ध होणार असुन या दवाखान्यातुन मधुमेह, उच्च रक्तदाब तपासणीही मोफत स्वरुपात करण्यात येणार आहे.

या फिरत्या दवाखान्यामध्ये कोव्हीड चाचणीची सोयही उपलब्ध होणार आहे.  आजघडीला कोरोनाबाधित रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असल्याने जवळपास 95 टक्के रुग्ण घरीच राहुन उपचार घेत आहेत.  या रुग्णांना फिरत्या वाहनाच्या माध्यमातुन मास्क, सॅनिटायजर तसेच आवश्यक असणाऱ्या औषधींचा समावेश असलेली कोरोना किटही उपलब्ध करुन देण्यात येणार असुन येणाऱ्या काळात राज्यातील ईतर जिल्ह्यातही सामाजिक दायित्व निधीतून अशाच प्रकारचा उपक्रम राबविण्याचा मानस असल्याचेही पालकमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी सांगितले.

आझादी का अमृत महोत्सवांतर्गत जिल्हा प्रशासनामार्फत विशेष उपक्रम राबविण्यात येत असुन याअंतर्गत जिल्ह्यातील कोरोनाबाधितांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधुन त्यांच्या प्रकृतीची  चौकशी  करण्याबरोबरच उपचाराबाबत मार्गदर्शनही करण्यात येत असल्याचे सांगुन प्रत्येक जिल्ह्याने असा अभिनव उपक्रम राबविण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी केल्या.

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment