Friday 7 January 2022

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर यंत्रणांनी सज्ज राहावे --- जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड * कोविड केअर सेंटर सुरु करावेत * औषधी, बेड, ऑक्सिजन यांचे काटेकोर नियोजन करावे * प्रतिबंधात्मक ओदशांची कडक अंमलबजावणी करावी * चेकपोस्ट सुरु करावेत * सर्व तपासणी पथके कार्यान्वित करा * विनामास्क आढळल्यास दंड ठोठवा * तपासणी व लसीकरणाचा वेग वाढवा

 



जालना दि. 7 (जिमाका) --- मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत असून कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता गृहित धरुन सर्व संबंधित यंत्रणांनी तात्काळ आवश्यक त्या कार्यवाहीला सुरुवात करावी, असे निर्देश  जिल्हाधिकारी  डॉ. विजय राठोड यांनी दिले. यापूर्वीचे कोविड केअर सेंटर ताब्यात घेण्यापासून ते प्रतिबंधात्मक आदेशांची कडक अंमलबजावणी करण्याची सूचना त्यांनी केली.   टेस्टींग व लसीकरणाचे प्रमाण वाढवावे.  सर्वांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करावे.   बेजबाबदारीपणे कुणीही वागू नये. सोमवारपासून कुणीही रजेवर जाऊ नये. जे रजेवर गेले आहेत, त्यांना सोमवारी तात्काळ रुजू होण्यास सांगावे, असेही जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले.

कोविड-19 च्या  अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते.  यावेळी जिल्हा परिषेदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, अप्पर जिल्हाधिकारी अकुंश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके,  अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी  डॉ. विवेक खतगावकर आदींसह उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, लसीकरण अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, शिक्षणाधिकारी उपस्थित होते.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा गंभीर धोका ओळखून  या लाटेचा तेवढयाच ताकतीने सामना करण्यासाठी सर्व  यंत्रणांनी तात्काळ तयारीला लागण्याची सूचना करताना जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की,  कोरोनाची तिसरी लाट अत्यंत धोकादायक आहे. पूर्वीपेक्षा यावेळी कोरोना रुग्णांची संख्या तिपटीने वाढताना दिसत आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे, त्यामुळे आरोग्य विभागासह सर्वच यंत्रणांनी  तात्काळ कामाला लागावे. उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, तालुका आरोग्य अधिकारी   यांनी कोविड केअर सेंटर  ताब्यात घेऊन तेथे आवश्यक त्या सुविधा सज्ज ठेवाव्यात. बेड, औषधी, स्वच्छता, वीज, पाणी, डॉक्टर, अन्य कर्मचारी यांची तातडीने या ठिकाणी उपलब्धतेबाबत कार्यवाही करावी.  रुग्णांना कुठल्याही गोष्टीची अडचण भासू देऊ नये. ऑक्सिजनच्या पुरवठयाबाबतही काळजी घ्यावी.  अतिरिक्त कोविड केअर सेंटरसाठी तहसिलदारांनी मंगलकार्यालय, महाविदयालय, आश्रमशाळा यासह इतर इमारती पाहून ताब्यात घ्याव्यात. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी उपलब्ध औषधांचा तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना तात्काळ पुरवठा करावा. रुग्णांना हलविण्यासाठी वाहने सज्ज ठेवावीत. तालुकास्तरावर खाजगी डॉक्टरांच्या तातडीने बैठका घेऊन त्यांना  सूचना कराव्यात.

जिल्हाधिकारी डॉ. राठोड पुढे म्हणाले की, कोविडच्या अनुषंगाने जारी करण्यात आलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आदेशांची पोलीस, महसूल व नगरपालिकांचे अधिकारी, तपासणी पथकांनी कडकपणे अंमलबजावणी करावी. सर्व तपासणी पथके  तात्काळ कार्यान्वित करावी. सर्व चेकपोस्ट सुरु करावेत.  सर्वांनी मास्कचा वापर प्राधान्याने करावा. कुणी विना मास्क आढळल्यास  तात्काळ दंड करावा. गर्दीचे ठिकाणं, मंगलकार्यालय या ठिकाणी विशेष तपासणी मोहिम राबवावी. दुकाने, मॉल, चित्रपटगृहे या ठिकाणी गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. कुणीही आदेशाचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास तात्काळ कारवाई करावी.

               कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाबाबत सूचना करताना जिल्हाधिकारी म्हणाले की, लसीकरणाचा वेग वाढवावा, विशेषत: लसीचा दुसरा डोस देण्यावर अधिक भर दयावा. श्री. जिंदल यांनीही 15 ते 18 वयोगटातील जास्तीतजास्त मुलांना लसीचा डोस देण्याचे निर्देश दिले.  कुणीही पात्र व्यक्ती लसीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.

-*-*-*-*-*-*-*-

 

 

No comments:

Post a Comment