Friday 21 January 2022

राज्यस्तरीय बैठक; सर्वसाधारण योजना-2022-23 जालना जिल्हयासाठी 275 कोटींची तरतूद ! नाविन्यपूर्ण योजनेच्या कामाचे उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून कौतुक !

 



           

            जालना, दि. 21 (जिमाका)  --- सन 2022-23 या आर्थिक वर्षात  जालना जिल्ह्याकरिता  जिल्हा वार्षिक (सर्वसाधारण)  योजनेसाठी  275 कोटी रुपयांचा निधी  उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री  अजित पवार यांनी मंजूर केला. जिल्हयात  विकासाच्या विविध योजना  प्राधान्याने राबविण्यात याव्यात, असे निर्देश  त्यांनी यावेळी दिले. या संदर्भात आज ऑनलाईन पद्धतीने  झालेल्या बैठकीत श्री. पवार यांनी जालना जिल्ह्यातील नाविन्यपूर्ण योजनेच्या अंतर्गत करण्यात आलेल्या कामाचे कौतुकही केले.

            जिल्हा वार्षिक योजनेची राज्यस्तरीय आढावा बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या मुंबई येथील दालनात  आज पार पडली. यावेळी  जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे उपस्थित होते. तर जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तमराव वानखेडे,  आमदार कैलास गोरंटयाल, जिल्हा पोलीस अधीक्षक  विनायक देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी  सुनिल सूर्यवंशी उपस्थित होते.

            जालना जिल्ह्यास जिल्हा वार्षिक योजनेसाठी (सर्वसधारण) सन २०२२ -२०२३ करीता 215 कोटी 32 लक्ष  रुपयांचा नियतव्यय मर्यादा ठरवून दिलेली होती. मात्र पालकमंत्री राजेश टोपे, लोकप्रतिनिधी  व जिल्हा प्रशासनाच्या वाढीव निधीची  मागणी विचारात घेता सर्वसाधारण  योजनेत 275 कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्यात  येईल, असे  श्री. पवार यांनी सांगितले.

            पालकमंत्री श्री. टोपे यांनी मानव निर्देशांकात जालना जिल्हा कमी असल्याने तसेच सिंचनामध्ये  कायम अनुशेष असल्या कारणाने जिल्हयाला वाढीव निधी मिळावा, अशी मागणी केली.  दरम्यान‍, श्री. पवार म्हणाले की, सर्वसाधारण योजनेतंर्गत निधी खर्च करताना उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विभागातील जिल्ह्याला  50 कोटींचा अतिरिक्त निधी दिला जाईल, त्यामुळे जिल्हयाने वेळेत निधी खर्च करण्याबरोबरच आयपीएस प्रणालीवर माहिती भरणे, जिल्हा नियोजनच्या बैठका वेळेत घेणे, नाविण्यपूर्ण योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे आणि अनुसूचित जाती व जमातींसाठी असणाऱ्या योजनेच्या निधीचा विनियोग वेळेत करावा, असे  श्री. पवार यांनी यावेळी सांगितले.

             बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत  सन 2021-22 या  वर्षात झालेल्या खर्चाचा आढावा सादर केला. तसेच सन 2022-23 वर्षासाठी तयार करण्यात आलेल्या आराखडयाची माहिती  दिली. सन 2021-22 या वर्षात नाविन्यपूर्ण योजनेतंर्गत जालना जिल्हयातील सात तालुक्यांमध्ये  ए.जी. वाहिनीला एसडीटी बसविण्याच्या  उपक्रमाचे श्री. पवार यांनी यावेळी कौतुक केले.

-*-*-*-*-*-*-

 

 

No comments:

Post a Comment