Wednesday 5 January 2022

कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेचा अनुभव पहाता अर्ली डिटेक्शन व अर्ली ट्रीटमेंट या सुत्रीचा प्रभावीपणे वापर करा - जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

 



           जालना दि. 5 (जिमाका) :-   राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे.  जालना जिल्ह्यातसुद्धा कोरोनाबाधितांची संख्या वाढत असुन ही चिंतेची बाब आहे.  कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेचा अनुभव पहाता अर्ली डिटेक्शन व अर्ली ट्रीटमेंट या सुत्रीचा प्रभावीपणे वापर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले.

                जिल्हा टास्क फोर्स तसेच खासगी कोव्हीड केअर रुग्णालय व डेडीकेटेड कोव्हीड केअर हेल्थ सेंटर यांच्या प्रमुखांच्या आढावा बैठकीचे जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रंसगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ. राठोड बोलत होते.

                यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.‍विवेक खतगावकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

                जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड म्हणाले, कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असुन ही गंभीर व चिंतेची बाब आहे. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये कोरोनाबाधितांवर उपचार करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तसेच अनेक चांगले, वाईट अनुभवही आले. कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश असलेल्या समितीकडून कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी ट्रीटमेंट प्रोटोकॉल तयार करण्यात येऊन शासनाकडून तो सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांना देण्यात आलेला आहे.  उपचारासाठी देण्यात आलेला प्रोटोकॉल व कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेतील अनुभवांची जोड देत कोरोनाबाधितांवर उपचार करण्यात यावेत.  ताप, सर्दी, खोकला यासारखी कोव्हीडसदृष्य लक्षणे असल्यास रुग्णांची तातडीने आटीपीसीआर तपासणी करण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी यावेळी दिल्या.

                जालना जिल्ह्यामध्ये आठ खासगी रुग्णालयांना डेडीकेटेड कोव्हीड हॉस्पीटल म्हणुन मान्यता देण्यात आली असुन                   31 रुग्णालयांना डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे.  प्रत्येक डेडीकेटेड कोव्हीड हॉस्पीटलमध्ये असलेल्या खाटा या ऑक्सिजनसुविधा युक्त असणे गरजेचे असल्याने प्रत्येक डेडीकेटेड कोव्हीड हॉस्पीटलच्या खाटांना ऑक्सिजन सुविधायुक्त करण्याची कार्यवाही येत्या 15 दिवसात पुर्ण करण्याबरोबरच डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्येसुद्धा अधिकाधिक ऑक्सिजन सुविधा असलेल्या खाटांची सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.

                धुळे, नासिक, अहमदनगर, भंडारा या ठिकाणी असलेल्या रुग्णालयांमध्ये गतकाळात दुर्घटना घडलेल्या आहेत.  जालना जिल्ह्यात अशा प्रकारची कुठलीही दुर्घटना घडू नये यासाठी प्रत्येक खासगी रुग्णालयांनी फायर, इलेक्ट्रीकल व स्ट्रक्चरल ऑडीट करुन घेत ऑडीटमध्ये काढण्यात आलेल्या त्रुटींची तातडीने पूर्तता करुन अग्निशमन अधिकाऱ्यांकडून नाहरकत प्रमाणपत्र प्राप्त करुन घेण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी केल्या.

                राज्यातील प्रत्येक खासगी रुग्णालयांना कोव्हीड बाधितांवर उपचार करण्यासाठी तसेच प्रयोगशाळांमधुन तपासणीसाठीचे दर शासनामार्फत ठरवुन देण्यात आलेले आहेत.  शासनामार्फत ठरवुन देण्यात आलेल्या दराप्रमाणेच उपचाराचे तसेच प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या चाचणीचे दर आकारण्यात यावेत.  शासन दरापेक्षा एकही रुपया अधिकचा न आकारण्याच्या सुचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.

                खासगी दवाखान्यामध्ये उपचार घेत असलेल्या प्रत्येक कोरोनाबाधित रुग्णांची माहिती प्रशासनाला देणे बंधनकारक आहे.  त्यासाठी  सीसीएमएस पोर्टल विकसित करण्यात आलेले असुन रुग्णालयात दाखल झालेले रुग्ण, संदर्भीत केलेले रुग्ण् तसेच मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती दैनंदिन पोर्टलवर अपलोड होईल, यादृष्टीने प्रत्येक रुग्णालयाने काळजी घेण्याच्या सुचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केल्या.

                यावेळी शासकीय व खासगी रुग्णालयांच्या डॉक्टरांनीसुद्धा उपचारादरम्यान त्यांना येत असलेल्या अडचणी, अनुभव जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडले.    बैठकीस डीसीएच, डीसीएचसीचे सर्व प्रमुख, टास्कफोर्सचे सर्व सदस्य व जिल्हा रुग्णालयातील तज्ज्ञांची उपस्थिती होती. 

\-*-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment