Tuesday 18 May 2021

लसीच्या उपलब्धतेनुसार गावपातळीवर लसीकरण सत्राचे नियोजन करा -- मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे

जालना, दि. 18 :-  जिल्ह्यात होत असलेले कोव्हीड लसीकरण हे शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे तंतोतंत पालन करुन करण्यात यावे. तसेच लस वाया जाणार नाही याची दक्षता घेण्यात येऊन लसीच्या उपलब्धतेनुसार गावपातळीवर लसीकरण सत्राचे आयोजन करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे यांनी दिले.

            जिल्हा कार्यबल गटाच्या बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आले होते.  त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना श्री सवडे बोलत होते.

            यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष कडले, मुख्याधिकारी नितीन नार्वेकर, डॉ. सोनखेडकर, डॉ. भोसले आदींची उपस्थिती होती.

            मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सवडे म्हणाले, नियोजित लाभार्थी यादीनुसार व शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करत लसीकरण करण्यात यावे.  सद्यस्थितीमध्ये केवळ 45 वर्षावरील वयोगटाकरिताच लस उपलब्ध असुन कोविन पोर्टलप्रमाणे हेल्थ वर्कर व फ्रंटलाईन वर्कर यांचे लसीकरण 18 ते 44 वयोगटात असल्यास लसीकरण होणार नाही.  18 ते 44 वयोगटातील नागरिकांनी लसीकरण केंद्रावर येऊ नये व गर्दी करु नये.  लसीच्या उपलब्धतेनुसार गावपातळीवरही लसीकरण सत्राचे नियोजन करण्याच्या सुचनाही श्री सवडे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना यावेळी केल्या.

                                                                      - *-*-*-*-*-*- 

No comments:

Post a Comment