Friday 14 December 2018


जिल्ह्यातील विविध विकास कामांचा
पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी घेतला आढावा
शेगाव-पंढरपुर मार्गाच्या कामात
कुठल्याही प्रकारची तडजोड स्वीकारणार नाही
रस्त्याच्या दर्जात व गुणवत्तेमध्ये फरक पडल्यास कंत्राटदारावर कारवाई करणार
                                               - पालकमंत्री बबनराव लोणीकर

            जालना, दि. 14 – जालना जिल्ह्यातील विविध विकास कामे तसेच दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांसदर्भात राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी 6 तास मॅरेथॉन बैठक घेतली. शेगाव-पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा आढावा घेत महामार्गाचे काम दर्जेदार व गुणवत्तापूर्णच करण्यात यावे.  या महामार्गाच्या कामात कुठल्याही प्रकारची तडजोड स्वीकारली जाणार नसल्याचे स्पष्ट करत रस्त्याच्या दर्जात व गुणवत्तेमध्ये फरक पडल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे खडेबोलही पालकमंत्री            श्री लोणीकर यांनी कंत्राटरास सुनावले.
            या बैठकीस जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राहूल लोणीकर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी,  प्रकल्प संचालक सुरेश बेदमुथा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय माईनकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मुकीम देशमुख,  कार्यकारी अभियंता अजय सिंग, उप विभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, तहसिलदार श्रीमती सुमन मोरे, मेघा इंजि. इन्फ्रा लिमिटेड, हैद्राबादचे मधुसुदन राव, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी            श्री कोकणी यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
            पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, शेगाव ते पंढरपुर हा 2 हजार कोटी रुपये खर्चून रस्ता तयार करण्यात येत आहे.  या रस्त्याच्या दर्जासंदर्भात नागरिकांकडून तक्रारी प्राप्त होत आहेत.  या रस्त्याच्या गुणवत्तेमध्ये व दर्जामध्ये कुठल्याही प्रकारची तडजोड स्वीकारली जाणार नाही. 
..2..
रस्त्याचे काम करत असताना शासनाने ठरवुन दिलेले निकष व नियमांप्रमाणेच करण्यात यावे. या रस्त्याच्या कामासाठी आवश्यक असणारी वाळूची मागणी जिल्हा प्रशासनास कळवण्यात यावी.  जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येणाऱ्या वाळुच्या लिलावामध्ये सहभाग नोंदवुन आवश्यक असणारी वाळुची रॉयल्टी शासनाकडे भरणा करण्यात येऊन वाळुची उचल करावी व साठवणुक करुन ठेवण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी उपस्थित कंत्राटदारांना दिले. त्याचबरोबरच रस्त्याच्या कामांसाठी आवश्यक असणारा मुरुम हा पाझर तलावांमधुन घेता येऊ शकतो.  प्रशासनामार्फत या संदर्भात मंजुरी घेण्यात यावी.  यामुळे पाझर तलावांमधील गाळ निघुन मोठया प्रमाणात पाण्याचा संचय होण्याबरोबरच रस्त्याच्या कामासाठी आवश्यक असणारा मुरुमही वेळेवर उपलब्ध होईल.
            पर्यटन विकास आराखड्यासंदर्भात आढावा घेताना पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, जिल्ह्यात पर्यटन विकासाला मोठा वाव आहे.  जिल्ह्यात अनेक देवस्थानी अशी आहेत ज्या ठिकाणी हजारो भाविक हजेरी लावत असतात.  या ठिकाणचा विकास केल्यास भाविकांना आवश्यक असणाऱ्या सुविधा मिळण्याबरोबरच बेरोजगारांच्या हाताला मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणारअसल्याने जिल्ह्यातील शंभु महादेव-नांगरतास तसेच गोखुरेश्वर या तीर्थक्षेत्राचा विकास करण्यासाठी 25 कोटी रुपयांचा आराखडा तयार करुन शासनास सादर करण्यात यावा.  त्याचबरोबर निळकंठेश्वर, वटेश्वर, चतुर्वेदेश्वर, रेणुकादेवी व दर्गा या क्षेत्रांचाही प्रस्ताव एकत्रितरित्या तयार करुन शासनास सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
            वीजेमध्ये बचत होण्याच्या दृष्टीने शासनामार्फत सर्व शासकीय कार्यालयांमध्ये एलईडी दिवे बसविण्यात येणार आहेत.  जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयांनी आपल्या कार्यालात एलईडी दिवे बसवुन घेण्याच्या सुचना करत नगरपालिका क्षेत्रामध्येही एलईडी बसवुन घेण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
            दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेऊन पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, वीजेचे देयक न भरल्यामुळे ज्या  पाणी पुरवठा योजनांचा वीज पुरवठा खंडित केला आहे तो नियमित करण्याचा मंत्री मंडळाच्या बैठकीत
..3..
निर्णय घेण्यात आला असल्याने जिल्ह्यातील खंडीत करण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनांना तातडीने वीज जोडणी करण्याबरोबरच नव्याने झालेल्या योजनांनाही तातडीने वीज जोडणी देण्यात यावी.  मनरेगाच्या माध्यमातुन मागेल त्याला काम उपलब्ध करुन देण्याचे निर्देश देत आवश्यक त्या ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचे निर्देशही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी दिले. जनावरांच्या चारानिर्मितीसाठी लोअर दुधना प्रकल्पाशेजारी असलेल्या दोन हजार हेक्टरवर चारानिर्मिती करण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी मान्यता दिली असुन त्यासाठी आवश्यक असणाऱ्या बियाण्यासाठीही निधीही उपलब्ध करुन दिला आहे.  चारानिर्मिती करण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांची बैठक आयोजित करुन त्यांना चारा निर्मितीसाठी प्रोत्साहित करण्यात यावे.  निर्मिती केलेला चारा शासन शेतकऱ्यांकडून विकत घेणार असुन मराठवाड्याला पुरेल एवढ्या चाऱ्याची निर्मिती या प्रकल्पाशेजारील शेतीमध्ये होऊ शकते, असेही पालकमंत्री श्री लोणीकर  यांनी यावेळी सांगितले.
            राष्ट्रीय रुरबन मिशनसंदर्भात आढावा घेताना पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, राष्ट्रीय रुरबन अभियानाच्या माध्यमातुन परतूर तालुक्यातील आष्टीसह 16 गावांचा 185 कोटी रुपयांच्या माध्यमातुन सर्वांगिण विकास करण्यात येत असुन करण्यात येत असलेल्या कामांची पहाणी केंदाच्या पथकाने नुकतीच भेट देऊन केली आहे. संपुर्ण देशभरात आष्टी व 16 गावात करण्यात येत असलेले काम हे उत्कृष्ट दर्जाचे असल्याची भावना या पथकाने व्यक्त केली असल्याचे सांगुन या प्रकल्पाचा सुधारित आराखडा 300 कोटी रुपयांचा करुन शासनास सादर करण्यात येणार आहे.  या प्रकल्पात काम केलेल्या सर्व विभागाचे अभिनंदन करुन यापुढे राष्ट्रीय रुरबन मिशनचे काम अधिक गतीने व दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
            या बैठकीस सर्व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
*******
           







No comments:

Post a Comment