Friday 21 December 2018

15 कोटी 16 लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ रस्ते ह्या विकासाच्या नाड्या जिल्ह्यातील विकास कामांना सहकार्य करा दळणवळणात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या रस्ते विकासावर भर रस्त्याची देखभाल व दुरुस्ती न केल्याने कंत्राटदाराकडून 25 लक्ष रुपयांचा दंड वसुल -- पालकमंत्री बबनराव लोणीकर



            जालना, दि. 21 –   रस्ते ह्या विकासाच्या नाड्या आहेत.  दळणवळणाच्या दृष्टीकोनातुन महत्वाची भूमिका बजावणाऱ्या रस्ते विकासावर भर देण्यात येत आहे. तसेच जिल्ह्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात येत असुन जिल्ह्याचा वेगाने विकास करण्यात येत आहे.  जिल्ह्यातील विकास कामांना पदाधिकारी तसेच गावकऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.
            वाटूर- जालना रस्ता डांबरीकरण तसेच वाटूर-मंठा- देवगावफाटा विशेष दुरुस्ती  या 15 कोटी 16 लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ पालकमंत्री श्री लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
            व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राहुल लोणीकर,   भुजंगराव गोरे, गणेशराव खवणे, भाऊसाहेब कदम , राजेश  म्हस्के, रामेश्वर तनपुरे, पंजाबराव बोराडे , विष्णू फुपाटे , बद्रीनारायण खवणे , बी डी पवार, गणपतराव वारे, विक्रम नाना माने, नरसिंग मामा राठोड, नागेशराव घारे, डिगंबर मुजमुले, दत्ताराव कांगणे, विठ्ठलराव काळे, सुरेश सोळंके, सुभाषराव पालवे, बाबुराव खरात, प्रकाश नानावटे, अनिल खंदारे, बंडू कवळे, महादेव बाहेकर, कल्याणराव कदम, अविनाश राठोड, राजेभाऊ वायाळ, उद्धवराववायाळ, सुभाषराव वायाळ, माधवसिंग जनकवार, संभाजी वारे, सुधाकर पडूळकर, जगदीश पडूळकर, सार्वजनिक बांधकामाचे श्री कोल्हे आदींची उपस्थिती होती.
            पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, दळणवळणामध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या रस्ते विकासासाठी मंत्रीपदाची धुरा सांभाळताच आपण जिल्ह्यातील संपुर्ण रस्त्यांची माहिती घेऊन पुढील पाच वर्षात करावयाच्या रस्त्यांचे आराखडे तयार करण्याचे निर्देश त्या त्या विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले होते.  गेल्या तीन वर्षाच्या काळात 200 गावांमध्ये पक्के व डांबरी रस्ते तयार करण्यात आली आहेत.  गावांना रस्ते व्हावेत,  शेतकऱ्यांना त्यांचा माल वेळेवर बाजारामध्ये नेण्याबरोबरच सर्वसामान्य जनतेला जलदगतीने वाहतुक करता यावी यासाठी मतदारसंघातील प्रत्येक गावात रस्ते तयार करण्यात येत आहेत.  या रस्त्यांचे काम दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करण्याचे निर्देश कंत्राटदारांना देण्यात आले आहेत.  येणाऱ्या पाच वर्षात हा रस्ता खराब झाल्यास तो दुरुस्त करण्याची जबाबदारीही या कंत्राटदारांवर निश्चित करण्यात आली असुन येणाऱ्या काळात जिल्ह्यातील वाडी,वस्ती, तांडे व गावांमध्ये पक्क्या, दर्जेदार व मजबुत रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री  श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले. तसेच जालना-वाटुर या रस्त्याची देखभाल व दुरस्ती न केल्याने 1 जुनपासुन दरदिवशी 12 हजार रुपयाप्रमाणे दंड वसुली केली जात असुन आतापर्यंत अंदाजे 25 लक्ष रुपये दंड वसुल करण्यात आला असल्याची माहितीही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी दिली.
            जिल्ह्याच्या रस्ते विकासासाठी केंद्र शासनामार्फत मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आला आहे. या माध्यमातून शहरांसह ग्रामीण भागात दर्जेदार रस्त्यांची निर्मिती करण्यात येत आहे.    राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत दिंडी मार्ग म्हणून खामगाव-लोणार-मंठा-परतूर-माजलगाव-कळंब-बार्शी-पंढरपुर-सांगोला या 430 किलोमीटरच्या रस्त्याचे काम अत्यंत वेगाने करण्यात येत आहे.  हा मार्ग पुर्ण झाल्यास  परिसराचा विकास होण्याबरोबरच बेरोजगारांना मोठ्या प्रमाणात रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार आहेत.  शेगाव ते पंढरपूर मार्गे जालना या मार्गावर गतकाळात अपघातामध्ये वारकऱ्यांना प्राण गमवावे लागले होते. विदर्भातील प्रत्येक भाविकांना पंढरपूर या श्रद्धास्थानापर्यंत  कमी वेळात पोहोचता यावे यासाठी नवीन दिंडी मार्ग होणे आवश्यक होते. त्यामुळे शेगाव ते पंढरपूर मार्गे लोणार-परतूर-माजलगाव हा मार्ग व्हावा अशी मागणी वेळोवेळी  नागपूर व दिल्ली येथे जाऊन  केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केल्याने हा रस्ता तातडीने मंजूर करण्यात आला असल्याचे सांगत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मंत्री पंकजा मुंडे, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातुन जिल्ह्यातील रस्ते विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात आला असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
            उपकेंद्रावर तसेच ट्रान्सफॉर्मरवर विजेचा अतिरिक्त ताण पडल्याने नागरिकांना व शेतकऱ्यांना पुरेसा विजेचा पुरवठा करण्यात अडचणी येत होत्या. या प्रश्नावर कायमस्वरुपी मात करण्यासाठी वीज वितरणामध्ये अत्यंत महत्वाचा घटक असलेल्या इन्फ्रास्ट्रक्चर उभारणीवर शासनाने भर दिला असून जिल्ह्यातील जनतेला व शेतकऱ्यांच्या शेतीपंपाला सुरळीतपणे वीजेचा पुरवठा होण्यासाठी जिल्ह्यासाठी नवीन 33 केव्हीचे 49 उपकेंद्रे मंजूर करण्यात आली आहेत. यापैकी 19 उपकेंद्राच्या उभारणीचे काम सुरु झाले असून 170 कोटी रुपये खर्चून जालना येथे 220 केव्ही केंद्राचे काम करण्यात येत आहे. तर परतूर येथील 220 केव्ही केंद्राचे काम पूर्ण झाले आहे. ही सर्व कामे पूर्ण झाल्यास जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांच्या शेतीपंपाला अखंडितपणे विजेचा पुरवठा होणार असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
            तेलंगणा, आंध्रप्रदेश, श्रीलंका व गुजरात राज्य तसेच इस्त्राईल देशाच्या धर्तीवर जालना, परतूर व मंठा या तालुक्यातील 176 गावांना वॉटरग्रीडच्या माध्यमातून शुद्ध व स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी 234 कोटी रुपयांची योजना साकारली जात आहे. . तसेच 92 नवीन गावांचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आला असुन यासाठी 120 कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. येणाऱ्या आठ महिन्यांच्या कालावधीत ही योजना पूर्ण करुन जनतेला शुद्ध व स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
            शासन शेतकऱ्यांप्रती सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन शेतकऱ्यांना विविध योजनेच्या माध्यमातुन मदत करत असल्याचे सांगत छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील १ लक्ष ४८ हजार ४२७ लाभार्थ्यांना जिल्ह्यातील विविध २० बँकेच्या १६२ शाखांमार्फत ७९७ कोटी इतकी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर ऑनलाईन जमा करण्यात आली आहे. तसेच सन २०१७ मध्ये बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना २७५ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला असुन ५ लाख ६४ हजार शेतकऱ्यांना पीक विम्या पोटी १७६ कोटी ८१ लक्ष इतका निधी  विविध बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे . जिल्ह्यातील शेतकऱ्यांना      २७ बँकेच्या १७४ शाखांमार्फत ९२४ कोटी २९ लक्ष रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले असल्याची माहितीही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी दिली.
            कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी तसेच ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.







No comments:

Post a Comment