Thursday 13 December 2018

कुस्तीस्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे व समन्वयाने काम करावे -- राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांचे निर्देश



        जालना, दि. 13 – महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषदेच्या मान्यतेने व जिल्हा राष्ट्रीय तालीम संघ तसेच राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या पुढाकाराने 62 वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे दिनांक 19 ते 23 डिसेंबर 2018 दरम्यान जालना शहरातील आझाद मैदानावर आयोजन करण्यात आलेले असुन ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे व समन्वयाने काम करण्याचे निर्देश राज्याचे पशुसंवर्धन, मस्त्यव्यवसाय, दुग्धविकास व वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी दिले.
            62 वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात पूर्वतयारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  त्याप्रसंगी उपस्थित अधिकारी व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.
            यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, भास्कर आंबेकर, अभिमन्यू खोतकर, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक एस. चैतन्या, तालीम संघाचे अध्यक्ष किसनलाल भगत, सचिव प्रा. डॉ. दयानंद भक्त, उपाध्यक्ष लक्ष्मणराव सुपाटकर, पांडूरंग डोंगरे, प्राचार्य भागवतराव कटारे, विष्णु पाचफुले, आत्मनंद भगत, गोपाळ काबलिय, सुशिल भावसार, अंकुश पाचफुले, विकास क्षीरसागर, विक्रम कुसूंदल आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
            राज्यमंत्री श्री खोतकर म्हणाले की, या स्पर्धेत संपुर्ण महाराष्ट्रातील जिल्हयातील व महानगर पालीका क्षेत्रातील एकुण 45 संघासह 900 कुस्तिगीर, 100 संघ व्यवस्थापक व मार्गदर्शक, 125 तांत्रिक अधिकारी ( पंच), महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषदेचे 90 पदाधिकारी व प्रतिनिधी, 40 महाराष्ट्र तसेच भारतातील प्रसिध्द कुस्तीपटु, 2 भारतीय कुस्ती संघ निरीक्षक, 2 भारतीय शैली कुस्ती संघ निरीक्षक, महाराष्ट्र ऑलम्पीक निरीक्षक असे एकुण 1260 मल्ल व अधिकारी या स्पर्धेमध्ये सहभागी होणार असुन जवळपास 80 ते 90 हजार प्रेक्षक याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेदरम्यान कायदा व सुव्यवस्था आबाधित राहून स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा.  आवश्यकता भासल्यास अतिरिक्त पोलीस मनुष्यबळ उपलब्ध करुन घेण्यात यावे.  स्पर्धेदरम्यान मैदान व परिसरात स्वच्छता राहील यासाठी नगरपालिकेने योग्य ती व्यवस्था करण्याबरोबरच स्पर्धेदरम्यान मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित राहणार असल्याचे मोबाईल शौचालये या परिसरात उपलब्ध करण्याबरोबरच पुरेशा प्रमाणात स्वच्छ व शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही करण्यात यावी. त्याचप्रमाणे या स्पर्धा सकाळी व संध्याकाळच्या वेळेस असल्याने संध्याकाळी वीज पुरवठा अखंडित रहावा यासाठी विद्युत विभागाने योग्य ती दक्षता घेण्याचे निर्देशही राज्यमंत्री श्री खोतकर यांनी यावेळी दिले.
            स्पर्धेदरम्यान कुस्तीगीरांना काही दुखापत झाल्यास त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यासाठी तज्ज्ञ अशा डॉक्टरांची टीम उपलब्ध ठेवण्याबरोबरच रुग्णवाहिकाही उपलब्ध करुन ठेवण्याच्या सुचनाही राज्यमंत्री श्री खोतकर यांनी यावेळी केल्या.
            या बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एम.के. राठोड, नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती प्रमोदिनी अमृतवाड यांच्यासह पोलीस व सर्व संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.




No comments:

Post a Comment