Thursday 13 December 2018

ध्वजदिन निधीस सढळ हस्ते मदत करा - अपर जिल्हाधिकारी प्रकाश खपले


            जालना, दि. 13 - देशाच्या रक्षणासाठी जवान आपल्या प्राणांची बाजी लावून सिमेवर लढत असतात. त्यांच्या त्याग व बलिदानामुळेच आपण सुरक्षित आहोत. जवानांच्या कुटूंबियांच्या व निवृत्त सैनिकांच्या पूनर्वसनासाठी ध्वजदिन निधीतून कल्याणकारी योजना राबविण्यात येत असल्याने या ध्वजदिन निधीस सर्वांनी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी प्रकाश खपले यांनी केले.
            जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने महासैनिक लॉन, जालना येथे आयोजित ध्वजदिन निधी संकलनाचा अपर जिल्हाधिकारी श्री खपले यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. त्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी बोलत होते.
            यावेळी व्यासपीठावर जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी स.ह. केंजळे, पोलीस निरीक्षक राजेंद्रसिह गौर, सेवानिवृत्त कर्नल ए.एस. पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एम.के. राठोड आदींची उपस्थिती होती.
            अपर जिल्हाधिकारी श्री खपले म्हणाले की, ध्वजदिन निधीच्या माध्यमातून माजी सैनिक तसेच त्यांच्या अवलंबितांसाठी कल्याणकारी योजना राबविण्यात येतात.  सैनिकांप्रती ऋण व्यक्‍त करण्याची संधी ध्वजदिन निधीच्या माध्यमातून सर्वसामान्यांना होत असल्याने नागरिकांनी या निधीस अधिकाधिक मदत करावी.  या वर्षात जिल्ह्याला देण्यात आलेले ध्वजदिन निधीचे उद्दिष्ट पूर्ण झाले असल्याचे सांगत पुढील वर्षामध्ये उद्दिष्टापेक्षा अधिक प्रमाणात ध्वजदिन निधी संकलित करण्यात येईल, असेही अपर जिल्हाधिकारी श्री खपले यांनी यावेळी सांगितले.
            कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हासैनिक कल्याण अधिकारी स.ह. केंजळे यांनी  ध्वजदिन निधी संकलनाचे महत्तव विषद करत जालना जिल्हा ध्वजदिन निधी संकलनामध्ये अग्रेसर असुन जिल्ह्यातील 68 शासकीय कार्यालयाने निधी संकलनामध्ये मदत करतात.  गतवर्षी पोलीस विभागाने सर्वाधिक निधी संकलन केले असल्याचे सांगत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत माजी सैनिकांसाठी करण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली.
            या कार्यक्रमात ऑपरेशन मेघदुतमध्ये शहिद झालेले सुरेश केशवराव कदम यांचे वीरपिता केशवराव कदम तसेच ऑपरेशन रक्षकमध्ये शहिद झालेले पंडितराव लहाने यांच्या वीरपत्नी श्रीमती लिलाबाई लहाने यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.   तसेच माजी सैनिकांच्या पाल्यांच्या शैक्षणिक खर्चाच्या प्रतिपूर्तीचे धनादेशही मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. ध्वजदिन संकलनाचे उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल विविध कार्यालय प्रमुखांचाही मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तु देऊन सत्कार करण्यात आला.
            सर्वप्रथम  मान्यवरांनी शहिद जवानांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
            या कार्यक्रमास जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील वरिष्ठ लिपीक विनायक अनाळकर, लिपीक तुकाराम काकडे, कल्याण संघटक सिताराम सोनुने, विनायक केंद्रे, शेख युनुस शेख गुल्जार, सुभाष रगडे, साहेबराव तोरमल यांच्यासह जिल्ह्यातील माजी सैनिक, वीरमाता, वीरपत्नी, सैनिकांचे कुटूंबिय, अधिकारी-कर्मचारी सैनिकी शाळेचे विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते




No comments:

Post a Comment