Friday 24 December 2021

कोविडच्या नव्या ऑमिक्रोन व्हेरिएंटच्या अनुंषागाने आरोग्य यंत्रणेने सज्ज राहावे --- जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

 

 

       




जालना दि. 24 (जिमाका) --- कोविड-19 च्या नव्या ऑमिक्रोन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व रुग्णांना वेळेत उपचार मिळण्याकरीता आरोग्य यंत्रणेने सज्ज  राहावे.  रुग्णालयांत बेडस, औषधी, व्हेटिंलेटर, ऑक्सिजन यांच्या उपलब्धतेबाबत आवश्यक ते नियोजन काटेकोरपणे करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी आरोग्य विभागाच्या प्रमुखांना केली.  तसेच कोविड प्रतिबंधक लसीकरणाची गती वाढवण्याबरोबरच शहरी व ग्रामीण भागात कोविड चाचण्यांचे प्रमाण वाढवावे, असेही त्यांनी सांगितले.

कोविड-19 च्या नव्या ऑमिक्रोन व्हेरिएंटच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, उपजिल्हाधिकारी रविंद्र परळीकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर आदींसह कोविड लसीकरणाचे तालुकास्तरीय पालक अधिकारी, बांधकाम व विदयुत विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले की, कोविड-19 च्या नव्या ऑमिक्रोन व्हेरिएंटची जिल्हयात लागण होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून आरोग्य विभागाने आपली यंत्रणा सुसज्ज ठेवणे आवश्यक आहे. शहरी व ग्रामीण रुग्णालयांत बेडस, औषधी, व्हेटिंलेटर, ऑक्सिजन  हे पुरेसे प्रमाणात आहेत का, याबाबत खबरदारी घ्यावी. आवश्यक ती  यंत्रसामुग्री चालू स्थिती आहे का, हे तपासून  पहावे. मनुष्यबळाची उपलब्धता, पीपीई किट, मास्क, सॅनिटायझर, चाचण्यांच्या किट याबाबतही दक्षता घ्यावी.  

कोविड प्रतिबंधक लसीकरणाची गती वाढवण्याची सूचना करताना जिल्हाधिकारी म्हणाले की, लसीचा दुसरा डोस देण्यावर प्राधान्याने लक्ष केंद्रीत करावे. घरोघरी जाऊन लसीकरण करावे. ज्या गावात तीनशे किंवा पाचशे जणांचे लसीकरण बाकी आहे, त्याठिकाणी विशेषत्वाने लसीकरण वेगाने करण्यावर भर दयावा. लसीपासून कुणीही वंचित राहणार नाही, याची खबरदारी घ्यावी.

बैठकीत जिल्हाधिकारी यांनी जिल्हयातील सर्व शहरी व ग्रामीण भागातील शासकीय रुग्णालयांतील फायर ऑडीट, इलेक्ट्रीकल इन्सपेक्शन, स्ट्रकचरल ऑडिट  यांचाही आढावा घेतला.  रुग्णालयातील प्रलंबित इलेक्ट्रीकल आणि बांधकाम विषयक कामे जलदगतीने पूर्ण करावीत, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.

***

 

 

 

No comments:

Post a Comment