Thursday 16 December 2021

कोरोनाचा धोका टाळण्यासाठी कोविड प्रतिबंधक लसीकरणाची गती वाढवावी ---- अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे * व्यापारी, हॉटेल, पेट्रोलपंपचालकांनी लसीकरणाचे प्रमाणपत्र तपासावे * लसचा दुसरा डोस घेण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन दयावे * लसीकरणासाठी नगरसेवकांचे सहकार्य घ्यावे * लसीकरणाबाबत सर्व आस्थापनांनी दर्शनी भागावर बोर्ड लावावेत * विदयार्थ्यांकडून आई-वडिलांचे लसीकरण प्रमाणपत्र मागवावे * विविध परवाने देताना लसीकरण प्रमाणपत्र अनिवार्य करावे

 


जालना, दि. 16 (जिमाका) कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉनचा धोका टाळण्यासाठी कोविड प्रतिबंधक लस  घेणे अत्यंत आवश्यक आहे. जालना शहरात लसीकरणाची गती वाढविण्यासाठी व्यापारी, हॉटेलचालक, पेट्रोलपंपचालकां प्रशासनास सहकार्य करावे, ज्या ग्राहकांनी लसीकरण केले, त्यांचे दक्षतेने लसीकरणाचे प्रमाणपत्र तपासूनच त्यांना सेवा दयावी तसेच येणाऱ्या ग्राहकांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी केले.  विविध प्रकारचे परवाने देणाऱ्या विभागांनी परवाना देताना किंवा नूतनीकरण करताना लसीकरण प्रमाणपत्र कागदपत्रांसोबत अनिवार्य करावे, अशी सूचनाही त्यांनी केली.

कोविड लसीकरण मोहिमेबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत श्री. पिनाटे बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी (रोहयो) तथा जालना शहर लसीकरण मोहिमेचे पालक अधिकारी रविंद्र परळीकर आदींसह तहसिलदार, मुख्याधिकारी, व्यापारी, हॉटेलचालक, पेट्रोलपंपचालक संघटनेचे पदाधिकारी, विविध विभागांचे कार्यालय प्रमुख उपस्थित होते.

श्री. पिनाटे म्हणाले की, लसीकरणाचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाण फार कमी आहे.  ही चिंताजनक बाब आहे. जालना शहरात एक लाख 5 हजार व्यक्तींनी दुसरा डोस घेणे बाकी आहे. दुसरा डोससाठी पात्र लोकांनी जबाबदारीने  डोस घ्यावा. दरम्यान, ग्राहकांना सेवा देणाऱ्या सर्व आस्थापनांनी लस घेतलेल्या ग्राहाकांनाच सेवा देण्याबाबत दक्षता घ्यावी. आपल्या दुकान किंवा आस्थापनेच्या दर्शनी भागावर कोविड प्रतिबंधक लस घेणे अनिवार्य आहे आणि लस घेतलेल्या ग्राहकांनाच सेवा देण्यात येईल, अशाप्रकारचे बोर्ड लावावेत. स्वस्त धान्य दुकानदारांनीसुध्दा ग्राहकांचे लसीकरण प्रमाणपत्र तपासूनच त्यांना धान्याचे वितरण करावे. नगर पालिका मुख्याधिकाऱ्यांनी नगरसेवकांच्या सहकार्याने लसीकरणाबाबत मोठया प्रमाणात जनजागृती करावी. शिक्षकांनी विदयार्थ्यांकडून आपल्या आईवडिलांचे लसीकरण  प्रमाणपत्र मागवावे. कामगार अधिकाऱ्यांनी औदयोगिक क्षेत्रातील कामगार व असंघटीत कामगार यांचे प्राधान्याने लसीकरण करण्यावर भर दयावा. महत्त्वाचे म्हणजे विविध परवाने देणाऱ्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी नवीन परवाना देताना किंवा परवाना नूतनीकरण करताना लसीकरणाचे प्रमाणपत्र कागदपत्रांसोबत अनिवार्य करावे. हे प्रमाणपत्र असल्याशिवाय परवाना देऊ नये. आरटीओने पथकामार्फत वाहनचालक, रिक्शाचालक यांचे लसीकरण प्रमाणपत्र तपासवे. 31 डिसेंबरपर्यंत लसीकरणाचे उदिष्ट पूर्ण होईल, यादृष्टीने संबंधित विभागप्रमुखांनी काटेकोर नियोजन करण्याची सूचना श्री. पिनाटे यांनी केली.

श्री. परळीकर म्हणाले की, कोरोनाचा नवा व्हेरियंट ऑमिक्रॉन अतिशय धोकादायक आहे. यापासून बचावासाठी लसीकरण हाच  प्रभावी उपाय आहे. नागरिकांनी लसीकरणासाठी अजिबाबत टाळाटाळ करु नये. यापासून कुठल्याही प्रकारचा धोका नाही. लस अतिशय सुरक्षित असून सर्वांसाठी मोफत उपलब्ध आहे. सर्व व्यापारी, आस्थापना तथा दुकानदार, हॉटेल, पेट्रॉलपंपचालकांनी आपली जबाबदारी समजून ग्राहकांचे लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र तपासूनच त्यांनी सेवा दयावी. विभागप्रमुखांनी देखील परवाना देताना लसीकरण प्रमाणपत्राची नागरिकांकडे आवर्जुन मागणी करावी. याबाबत कुठल्याही प्रकारची दिरंगाई करु नये.

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment