Tuesday 4 September 2018

स्पर्धा परीक्षेमधील यशस्वीतेसाठी लोकराज्य मासिक उपयुक्त जिल्हा पुरवठा विभाग लोकराज्यमय करणार - जिल्हा पुरवठा अधिकारी राजू नंदकर







स्पर्धा परीक्षेमधील यशस्वीतेसाठी लोकराज्य मासिक उपयुक्त
जिल्हा पुरवठा विभाग लोकराज्यमय करणार
                                           - जिल्हा पुरवठा अधिकारी राजू नंदकर
          जालना, दि. 4 जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी वाचनाबरोबरच निरीक्षणही तेवढेच महत्वाचे असुन स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी होणे ही जीवनातील एक मोठी संधी आहे. ही  संधी प्राप्त करण्यासाठी लोकराज्यसारख्या मासिकाचे वाचन अत्यंत उपयुक्त असल्याचे मत जिल्हापुरवठा अधिकारी राजू नंदकर यांनी केले.
            जिल्हा माहिती कार्यालय व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने  जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या सभागृहात लोकराज्य वाचक अभियानाच्या शुभारंभ  श्री नंदकर यांच्या हस्ते करण्यात आला.  त्याप्रसंगी उपस्थित विद्यार्थी, विद्यार्थीनींशी संवाद साधताना श्री नंदकर बोलत होते.
            यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी एस.बी. हजारे, जिल्हा प्रकल्प अधिकारी के.डी. दांडगे, माहिती सहाय्यक अमोल महाजन आदींची उपस्थिती होती.
            श्री नंदकर म्हणाले की, शासनाचे मुखपत्र असलेले लोकराज्य मासिक हे अधिकृत व अचूक माहितीचा खजिना आहे. सन 2006 पासून लोकराज्यचे रुपडे बदलले असुन अत्यंत आकर्षक मांडणी, सुटसुटीत विषय, शासकीय योजनांची माहिती, मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णय व शासन निर्णय आदी माहितीचा खजिना लोकराज्यच्या माध्यमातून नाममात्र मूल्यामध्ये जनतेपर्यंत पोहोचत असुन स्पर्धा परीक्षेमध्ये हमखास यशासाठी लोकराज्यचे नियमित वाचन आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी आपले नातेवाईक, मित्र यांनाही लोकराज्य वाचनासाठी प्रेरित केले पाहिजे. लोकराज्य हे केवळ एक मासिक नसून शासनाचा माहितीस्त्रोत आहे. त्यामुळे शासकीय योजना, उपक्रमाच्या विश्वासू माहितीसाठी लोकराज्यचे नियमित वाचन करणे गरजचे असल्याचेही श्री नंदकर यांनी यावेळी सांगितले.


..2..
            सध्या स्पर्धेचे युग आहे. या स्पर्धात्मक युगात प्रत्येकाने अपडेट राहिले पाहिजे. आजघडीला 7 लाख 25 हजार विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेसाठी ऑनलाईन  नोंदणी केलेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना यश संपादन करण्यासाठी मोठी स्पर्धा असुन स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना जिद्द, चिकाटी व नियोजनपूर्ण अभ्यास करण्याची गरज असुन विद्यार्थ्यांनी दररोज तीन वृत्तपत्रांचे वाचन करण्याबरोबरच महिन्याभरात माहितीपूर्ण अशा तीन मासिकांचे वाचन करणे आवश्यक आहे.  स्पर्धा परीक्षेमध्ये चालूघडामोडींची माहिती असणे आवश्यक असुन ती आपणाला वृत्तपत्राच्या माध्यमातुन मिळत असते.  स्पर्धा परीक्षेसाठी करण्यात येणाऱ्या अभ्यासामध्ये सातत्य असणे आवश्यक असुन या परीक्षेमध्ये यश न मिळाल्यास विद्यार्थ्यांनी खचून न जाता कष्टसाध्य पद्धतीने अभ्यास करावा,  असेही त्यांनी यावेळी सांगितले.
            लोकराज्य मासिकाची उपयुक्तता व त्यातील असलेली माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने जिल्ह्यात लोकराज्य वाचक मेळावा अभियान राबविण्यात येत असुन या अभियानाला प्रतिसाद म्हणून जिल्हा पुरवठा विभागातील प्रत्येक अधिकारी, कर्मचारी तसेच स्वस्त धान्य दुकानदारांसह लोकराज्यचे चारशे वर्गणीदारांची नोंदणी करणार असल्याची ग्वाहीही श्री नंदकर यांनी यावेळी दिली.
            यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी जिल्हा ग्रंथालय अधिकारी एस.बी. हजारे, जिल्हा प्रकल्प अधिकारी के.डी. दांडगे यांनीही उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
            कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात श्री महाजन म्हणाले की, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक माध्मये, समाजमामध्ये सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात येते.   या उपक्रमाचाच एक भाग म्हणून लोकराज्य वाचक अभियान राबविण्यात येत आहे. त्याचप्रमाणे माहितीदूत उपक्रमही राज्यभर राबविण्यात येत आहे. लोकराज्य मासिकाचे अधिकाधिक वर्गणीदार होण्याबरोबरच माहितीदूत उपक्रमातही युवकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी घ्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
            कार्यक्रमाचे सुत्र संचलन व आभार राजेंद्र वाणी यांनी मानले.  कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा माहिती कार्यालयातील अनिल परदेशी, मधुकर खांडेभराड, विजय उघडे, संतोष पाखरे आदींनी परिश्रम घेतले.      कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात लोकराज्यचा स्टॉल तसेच प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास विद्यार्थी, विद्यार्थीनींची मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*******

No comments:

Post a Comment