Monday 10 September 2018

गुणवत्तापूर्ण शिक्षणावरच भर – केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर





            जालना, दि. 10 – देशाला प्रगतीच्या दिशेने नेण्याची बीजे शिक्षणातच असुन नाविन्यपूर्ण शोध, अनुसंधान या बाबींवर भर देऊन देशाच्या प्रगतीसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर देण्यात येत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले.
            जालना एज्युकेशन सोसायटीचे आर.जी. बगडिया कला, एस.बी. लखोटीया वाणिज्य व आर. बेझंजी विज्ञान महाविद्यालयाच्या हिरक महोत्सव सांगता समारंभप्रसंगी जेईएस महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना श्री जावडेकर बोलत होते.
            कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार रावसाहेब दानवे यांची उपस्थिती होती तर प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर, पदुम राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, आमदार नारायण कुचे, आमदार अतुल सावे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु प्रो. डॉ. बी.ए. चोपडे, प्र. कुलगुरु प्रो. डॉ. अशोक तेजनकर, पुरुषोत्तम बगडिया,फुलचंद भक्कड, हेमेंद्र लखोटीया, जवाहर काबरा, रसायन तंत्रज्ञान केंद्राचे कुलगुरु डॉ. यादव, वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवतराव कराड, भास्करराव दानवे, भास्करराव आंबेकर, रामेश्वर भांदरगे-पाटील, घनश्याम गोयल, किशोर शितोळे आदींची उपस्थिती होती.
            केंद्रीय मंत्री श्री जावडेकर म्हणाले की, भारताच्या स्वातंत्र्यानंतर देशात राष्ट्रीय शिक्षणाची चळवळ अनेक थोर नेत्यांनी सुरु केली.  त्यामुळेच आज आपण शिक्षण क्षेत्रात प्रगत आहोत.  शिक्षण ही देशाला तारुण नेणारी बाब असुन शिक्षणामध्ये गुणवत्ता हीच प्राथमिकता असुन सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलीला जिल्हाधिकारी पदापर्यंत पोहोचवण्याची ताकद केवळ शिक्षणामध्ये असुन शिक्षण क्षेत्रात चांगले काम करणाऱ्या संस्थांना विविध योजनांच्या माध्यमातुन बळकट करण्याचा शासनाचा प्रयत्न असुन देशातील प्रत्येक विद्यार्थ्याला चांगले व दर्जेदार शिक्षण मिळावे शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी शासन अनेकविध उपक्रम राबवित असल्याचेही  केंद्रीय मंत्री श्री जावडेकर यांनी यावेळी सांगितले.

            प्रत्येकाला शिक्षण मिळाव यासाठी स्वयंम सारखा उपक्रम सुरु करण्यात आला असुन या माध्यमातुन प्रत्येक इच्छुकाला ऑफलाईन व ऑनलाईन शिक्षण देण्याच काम करण्यात येत असुन या माध्यमातुन 23 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.  9 वी ते पदव्युत्तरपर्यंत शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला डिजिटल बोर्डच्या माध्यमातुन शिक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात येत असुन प्रत्येकाला शाश्वत नोकरीची हमी देणाऱ्या कौशल्य विकास प्रशिक्षणावरही भर देण्यात येत असल्याचेही केंद्रीय मंत्री           श्री जावडेकर यांनी यावेळी सांगितले.
            पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, गेल्या साठ वर्षामध्ये जेईएस महाविद्यालयाने मोठी प्रगती केली असुन अनेक विद्यार्थी या महाविद्यालयाने घडविले आहेत. समाजातील प्रत्येक गोरगरीब  व सर्वसामान्यांच्या पाल्याला दर्जेदार शिक्षण मिळून स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी कौशल्यावर आधारित शिक्षण देण्याच काम केंद्रीय मंत्री श्री जावडेकर यांच्या पुढाकाराने होत असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
            राज्यमंत्री श्री खोतकर म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर दहा ते अकरावर्षानंतर जेईएस महाविद्यालयाची स्थापना झाली असुन गेल्या 60 वर्षाच्या कालखंडामध्ये या महाविद्यालयाने अनेक गुणवंत विद्यार्थी घडविण्याची काम केलं.  याच महाविद्यालयातून आपणही शिक्षण घेतले असुन महाविद्यालयानेच आपल्याला संस्काराची शिदोरी दिल्याचे सांगत महाविद्यालयाच्या उन्नतीसाठी सर्वतोपरी मदत करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
            अध्यक्षीय भाषणात खासदार रावसाहेब दानवे म्हणाले की, ज्या काळात शिक्षणाच्या अपुऱ्या संधी होत्या त्या काळात जेईएस महाविद्यालयाने जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले. महाविद्यालयाने दिलेली शिक्षणाची शिदोरी आयुष्यभर  पुरणार असल्याचे सांगत शिक्षणाच्या बाबतीत जिल्हा मागे असुन जिल्ह्याचा सर्वांगिण विकास होत असताना जिल्हा शैक्षणिक विकासातही अग्रेसर राहण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत.  जिल्ह्यात आयसीटी महाविद्यालय सुरु करण्यात आले असुन कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देण्यासाठी स्कील डेव्हलपमेंट इनस्टीट्युटही सुरु करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
            यावेळी संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम बगडिया तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु प्रो. डॉ. बी.ए. चोपडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
            कार्यक्रमाचे संचलन सुरेश केसापुरकर यांनी केले तर आभार प्राचार्य डॉ. जवाहर काबरा यांनी मानले.
            कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी यांच्यासह जेईएस महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थीनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
*******

No comments:

Post a Comment