Sunday 23 September 2018

आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना समाजातील गोरगरीब कुटूबांच्या स्वास्थासाठी वरदान ठरेल -पालकमंत्री बबनराव लोणीकर




            जालना, दि. 23 – देशातील 50 कोटी नागरिकांना तसेच जालना जिल्ह्यातील 1 लाख 48 हजारपेक्षा अधिक कुटूंबाना आरोग्य सेवेचा लाभ देणारी आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना समाजातील गोरगरीब कुटूबांच्या स्वास्थासाठी वरदान ठरेल, असा विश्वास राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केला.
झारखंड रांची येथून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘आयुष्मान भारत’योजनेचा राष्ट्रव्यापी शुभारंभ केला तर या योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी राज्याचे पदुम राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, खासदार रावसाहेब दानवे-पाटील, आमदार नारायण कुचे, माजी आमदार अरविंद चव्हाण, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे,रघुनाथ तौर, घनश्याम गोयल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एम.के राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते आदींची उपस्थिती होती. 
पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, आजचा दिवस देशाच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासातील ऐतिहासिक दिवस आहे. जगातील सर्वात मोठ्या अशा शासकीय आरोग्य सुरक्षा योजनेचा शुभारंभ प्रधानमंत्र्यांच्या संकल्पनेतून करण्यात आला आहे. समाजामध्ये  गोरगरीब कूटुंबांना एखादा गंभीर स्वरुपाचा आजार जडल्यास आपल्या संपुर्ण आयुष्याची कमाई या उपचारामध्ये गमवावी लागते. कधी कधी तर उपचारासाठी पैसै नसल्या कारणाने  आपला जीवही गमवावा लागतो. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजातील प्रत्येक गरिबाला उपचार मिळाला पाहिजे या विचारानेच आयुष्यमान भारत योजनेची सुरुवात केली असल्याचे सांगत या योजनेमध्ये 1 हजार 122 आजारांचा समावेश करण्यात आला असुन या कुटूंबाना प्रतिवर्षी प्रतिकुटूंब आरोग्यासाठी रु.5 लक्ष विमा सरंक्षण राहणार आहे. या योजनेअतंर्गत त्या कुटूंबाना ठराविक आजारसाठी संपूर्ण देशभरातील कोणत्याही मान्यता प्राप्त रुग्णालयात उपचार घेता येणार असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले. 
महाराष्ट्र राज्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्मयतातुन राज्याचे मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या संकल्पनेतुन समाजातील प्रत्येक गोरगरीबांना मोफत उपचार देण्याचे काम करण्यात आले असुन या योजनांचा फायदा जालना जिल्ह्यातील अनेक रुग्णांना झाल्याचे सांगत देशातील 50 कोटी जनतेसाठी सुरु केलेल्या ऐतिहासिक अशा योजनेबद्दल त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभारही यावेळी व्यक्त केले. 
राज्यमंत्री श्री खोतकर म्हणाले की, भारत देशातील सर्वसामान्य कुटूंबातील नागरिकांसाठी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना सुरु केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करत एक हजार एकशे बारा आजरांचा समावेश असलेल्या या योजनेचा फायदा जिल्ह्यातील नागरिकांनी घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
खासदार रावसाहेब दानवे म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात मोठ्या अशा शासकीय आरोग्य सुरक्षा योजनेचा शुभारंभ केला आहे.  जगातील पहिली आरोग्य सेवा योजना अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष ओबामा यांनी सुरू केली होती त्यात 10 कोटी लोकांना लाभ मिळत होता मात्र आयुष्यमान भारत योजनेमध्ये प्रधानमंत्री मोदी यांनी देशातील 50 कोटी नागरिकांचा विचार केला आहे. त्यामुळे जगातील सर्वात मोठी योजना ठरणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 
यावेळी मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात गोल्डन ई-कार्डचेही वाटप करण्यात आले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एम.के. राठोड यांनी केले.
कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी, लाभार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
*******

No comments:

Post a Comment